सर्वांनी एकत्र राहून कामगारांच्या हिताचा योग्य निर्णय घ्यावा, विनायक राऊत यांचे प्रतिपादन
रेल कामगार सेनेचे अध्यक्ष, शिवसेना नेते विनायक राऊत यांच्या उपस्थितीत शिवसेना भवन येथे शनिवारी रेल कामगार सेना मध्य रेल्वे आणि कोकण रेल्वे यांची बैठक पार पडली. मान्यताप्राप्त संघटना कुठली असावी यासाठी मध्य रेल्वेवर होऊ घातलेल्या निवडणुकीबाबत या बैठकीत चर्चा करण्यात आली. कोकण रेल्वेत निभावलेल्या महत्त्वपूर्ण भूमिकेमुळे मध्य रेल्वेवरसुद्धा रेल कामगार सेनेच्या भूमिकेकडे दोन्ही मान्यताप्राप्त युनियनचे लक्ष लागले आहे. या पार्श्वभूमीवर आपण सर्वांनी एकत्र राहून कामगारांच्या हिताचा योग्य तो निर्णय घ्यावा, असे प्रतिपादन विनायक राऊत यांनी केले. कामगारांनी यावेळी दोन्ही मान्यताप्राप्त संघटनांबद्दल प्रतिक्रिया व्यक्त केल्या. संपूर्ण निर्णय घेण्याचे अधिकार कार्याध्यक्ष आणि सरचिटणीस पर्यायाने केंद्रीय कार्यकारिणीला देण्यात आले.
रेल कामगार सेना कार्याध्यक्ष संजय जोशी आणि सरचिटणीस दिवाकर देव यांच्या नेतृत्वाखाली पार पडलेल्या या बैठकीला मुंबई, पुणे, नागपूर, भुसावळ, सोलापूर आणि कोकण रेल्वे येथील रेल कामगार सेनेचे कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते. या बैठकीत कोकण रेल्वेवर विश्वासघात करणाऱ्या संघटनेला धडा शिकवून एनआरएमयूला समर्थन करत विजय प्राप्त केल्याबद्दल कोकण रेल्वे पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करण्यात आले. येत्या 4 ते 6 डिसेंबर या कालावधीत मध्य रेल्वेमध्ये मतदान होणार असून फॉर्म भरण्याची तारीख 25 ऑक्टोबर आहे तर अर्ज मागे घेण्याची तारीख 14 नोव्हेंबर आहे. या कालावधीमध्ये कामगारांचे हित लक्षात घेता योग्य निर्णय घेतला जाईल, असे सरचिटणीस बाबी दिवाकर देव यांनी सांगितले.
या बैठकीसाठी नरेश बुरघाटे ललित मुथा, शेख, चंद्रकांत विणारकर, सूर्यकांत आंबेकर, तुकाराम कोरडे, सुरेश परदेशी, कृष्णा रणशूर, जनार्दन देशपांडे आणि अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List