लोकसभेचे प्रोटेम स्पीकर म्हणून भर्तृहरि महताब यांची नियुक्ती, काय असतात कर्तव्ये? घटना काय सांगते
18 व्या लोकसभेचे पहिले अधिवेशन 24 जूनपासून सुरू होत आहे. पहिल्या अधिवेशनात लोकसभा अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांची निवडणूक होईल. मात्र, लोकसभा अध्यक्षपदाची निवडणूक होईपर्यंत प्रोटेम स्पीकर ( हंगामी अध्यक्ष ) म्हणून राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी भर्तृहरि महताब यांची नियुक्ती केली आहे. केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी याबाबतची माहिती दिली. महताब हे लोकसभा अध्यक्ष निवडीपर्यंत अध्यक्षपदाची जबाबदारी पार पाडतील असे त्यांनी सांगितले. याशिवाय अधिवेशन काळात हंगामी अध्यक्ष यांना मदत करण्यासाठी राज्यघटनेच्या कलम 99 अन्वये राष्ट्रपतींनी सुरेश कोडीकुन्नील, थलिकोट्टाई राजुतेवर बाळू, राधा मोहन सिंग, फग्गन सिंग कुलस्ते आणि सुदीप बंदोपाध्याय यांचीही नियुक्ती केली आहे. लोकसभा अध्यक्षांची निवडणुक होईपर्यंत नवनिर्वाचित खासदारांना शपथ देण्यात यांची मदत होणार आहे.
कोण आहेत भर्तृहरी महताब?
भर्तृहरी महताब हे सात वेळा कटकचे खासदार होते. लोकसभा निवडणुकीपूर्वी त्यांनी बिजू जनता दल पक्ष सोडून भाजपमध्ये प्रव्र्ष केला होता. 2017 मध्ये लोकसभेतील चर्चेत उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल त्यांना उत्कृष्ट संसदपटू पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. आता 18 व्या लोकसभेचे ते प्रोटेम स्पीकर असतील आणि नवीन खासदारांना शपथ देतील.
काय आहेत प्रोटेम स्पीकरचे अधिकार ?
लोकसभा निवडणूक जिंकून सत्तेवर येणाऱ्या पक्षाची किंवा आघाडीची पहिली प्राथमिकता प्रोटेम स्पीकरची नियुक्ती करणे हीच असते.
संसदेच्या कनिष्ठ सभागृहात म्हणजेच लोकसभेत सर्वाधिक वेळ घालवलेल्या सदस्याची किंवा निवडून आलेल्या सर्वात ज्येष्ठ सदस्याची प्रोटेम स्पीकर म्हणून नियुक्ती केली जाते.
सत्ताधारी पक्ष किंवा युती संसदीय कामकाज मंत्रालयामार्फत प्रोटेम स्पीकरचे नाव राष्ट्रपतींना पाठवते. त्यानंतर राष्ट्रपती प्रोटेम स्पीकरची नियुक्ती करतात. जे नवनिर्वाचित सदस्यांना शपथ देतात.
नवीन खासदारांना शपथ देण्यासाठी प्रोटेम स्पीकरला मदत करण्यासाठी सरकार आणखी दोन ते तीन नावांची शिफारस करते. नवीन सदस्यांना शपथ देण्याची प्रक्रिया सुमारे दोन दिवस सुरू असते. त्यानंतर सदस्य लोकसभा अध्यक्षांची निवड करतात.
अध्यक्ष यांच्या निवडीनंतर राष्ट्रपती संयुक्तपणे संसदेच्या दोन्ही सभागृहांना संबोधित करतात.
प्रोटेम स्पीकरची निवड कशी होते? घटनेत काय म्हटले आहे?
लोकसभेचे पीठासीन अधिकारी या नात्याने अध्यक्ष यांना दैनंदिन कामकाजाशी संबंधित काही महत्त्वाची कर्तव्ये पार पाडावी लागतात. भारतीय राज्यघटनेच्या कलम 94 मध्ये असे म्हटले आहे की “जेव्हा लोकसभा विसर्जित केली जाते तेव्हा विसर्जनानंतर लोकसभेच्या पहिल्या बैठकीपर्यंत अध्यक्ष आपले पद सोडू शकत नाहीत.” 18 व्या लोकसभेत नवीन सभापती निवडून येईपर्यंत सभागृहाचे कामकाज चालवण्यासाठी प्रोटेम स्पीकरची निवड केली जाईल.
भारतीय राज्यघटनेत संसदेत प्रोटेम स्पीकर या पदाची तरतूद नाही. कायमस्वरूपी स्पीकरची निवड होईपर्यंत प्रोटेम स्पीकरची तात्पुरती नियुक्ती केली जाते. घटनेत प्रोटेम स्पीकर या पदाचा उल्लेख नसला तरी संसदीय कामकाज मंत्रालयाच्या अधिकृत पुस्तिकेत प्रोटेम स्पीकरची नियुक्ती आणि शपथविधीचा उल्लेख आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List