सुनील गावस्कर कृष्ण तर अशोक सराफ बलराम; नाटकाचा भन्नाट किस्सा
अभिनेते अशोक सराफ यांचा जन्म मुंबईचा. 4 जून 1947 रोजी त्यांचा जन्म झाला. सहा-साडेसहा वर्षांचे असतानाच त्यांनी वाडीतल्या एकांकिकेमध्ये पहिल्यांदा काम केलं होतं. या एकांकिकेसाठी त्यांना पुरस्कारही मिळाला होता. त्यांना स्टेजवर उभं राहायची भीती कधीच वाटली नव्हती. याउलट ते स्टेजवर आहेत, लोक त्यांना बघत आहेत, टाळ्या वाजवत आहेत अशी स्वप्नं त्यांना पडायची. अशोकमामा हे गिरगावातील चिखलवाडीत राहायचे. या वाडीतील सगळेच नाट्यप्रेमी होते. नाटकासोबतच त्यांनी क्रिकेटसुद्धा अतिप्रिय होतं. त्यामुळे नाटकाप्रमाणेच चिखलवाडीत क्रिकेटसुद्धा मोठ्या जोशात खेळलं जायचं. अभिनय आणि क्रिकेट या दोन्ही लोकप्रिय क्षेत्रातील दिग्गज मंडळी याच चिखलवाडीतली आहेत. एक म्हणजे खुद्द अशोक सराफ आणि दुसरे म्हणजे माजी क्रिकेटर सुनील गावस्कर. अशोक सराफ यांनी लहानपणी सुनील गावस्कर यांच्यासोबत एका नाटकात काम केलं होतं. हा किस्सा फार क्वचित लोकांना माहीत असेल.
अशोक सराफ यांच्या ‘मी बहुरुपी’ या आत्मचरित्रात याचा उल्लेख आहे. सुनील गावस्कर हे अशोक सराफ यांच्या बाजूच्याच इमारतीत राहायचे. लहानपणी त्यांनी ‘गुरुदक्षिणा’ नावाच्या नाटकात एकत्र काम केलं होतं. त्यावेळी अशोकमामा ते सात-आठ वर्षांचे होते, तर गावस्कर हे सहा-सात वर्षांचे होते. या नाटकात दोघांनी कृष्ण-बलरामाची जोडी साकारली होती. गावस्कर हे कृष्णाच्या तर अशोक सराफ हे बलरामाच्या भूमिकेत होते.
इतकंच नव्हे तर गावस्कर आणि अशोक सराफ यांनी एक रेडिओ प्लेसुद्धा केला होता. माईकपर्यंत उंची पोहोचत नसल्याने त्यावेळी गावस्कर यांना खुर्चीवर उभं करावं लागलं होतं, असं अशोक सराफ सांगतात. सुनील यांनी लहान असताना अशोक सराफ यांच्यासोबत अभिनय केला होता, तर अशोकमामा हे लहान असतात त्यांच्यासोबत क्रिकेट खेळले होते. “इतकी सुंदर बॅटिंग करायचा की बघत राहावंसं वाटायचं. कित्येकदा आम्ही मुलं फील्डिंग करायचं विसरून त्याच्या शॉटला दाद द्यायचो. सुनील आणि मिलिंद रेगे हे दोघंही चिखलवाडीतले. एकाच शाळेत आणि एकाच वर्गात. ही दोघं एका टीममध्ये असली की जाम पिदवायचे आम्हाला. आऊटच व्हायचे नाहीत”, असा किस्सा अशोक सराफ यांनी या आत्मचरित्रात सांगितला आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List