‘रेखाजींसोबतचा सेल्फी..’; फॉलोअर्स वाढवण्यासाठी बिग बींना चाहत्यांकडून भन्नाट सल्ले
बॉलिवूडचे महानायक अर्थात अभिनेते अमिताभ बच्चन यांचं सोशल मीडिया प्रेम जगजाहीर आहे. एक्स (ट्विटर) अकाऊंटवर ते सातत्याने पोस्ट लिहित असतात. शिवाय फेसबुक आणि इन्स्टाग्रामवरही ते सक्रीय आहेत. वयाच्या 82 व्या वर्षीही त्यांना सोशल मीडियाविषयी प्रचंड उत्सुकता आहे. त्याविषयीच्या नवनवीन गोष्टी जाणून घेण्यासाठी ते आतूर असतात. नुकतीच त्यांनी एक्स अकाऊंटवर एक पोस्ट लिहिली आहे. या पोस्टद्वारे त्यांनी फॉलोअर्सकडे एक सल्ला मागितला आहे. बरेच प्रयत्न करूनदेखील एक्स अकाऊंटच्या फॉलोअर्सचा आकडा वाढत नसल्याचं त्यांनी म्हटलंय. त्यावर नेटकऱ्यांनी त्यांना एकापेक्षा एक भन्नाट सल्ले दिले आहेत.
‘खूप प्रयत्न करतोय, परंतु 49 दशलक्ष फॉलोअर्सचा आकडा वाढतच नाहीये. काही उपाय असेल तर सांगा’, असं ट्विट बिग बींनी केलंय. त्यांची ही पोस्ट वाचताच नेटकऱ्यांनी आपापल्या पद्धतीने त्यांना सल्ले देण्यास सुरुवात केली आहे. ‘रेखाजींसोबतचा सेल्फी पोस्ट करून पहा’, असं एकाने लिहिलं. तर ‘जया बच्चन यांना घटस्फोट द्या, त्यांच्यामुळेच लोक तुम्हाला फॉलो करत नाहीयेत’, असं दुसऱ्याने म्हटलंय. जया बच्चन यांच्या तापट आणि चिडक्या स्वभावामुळे अनेकदा सोशल मीडियावर त्यांना ट्रोल केलं जातं. म्हणूनच त्यांच्यासोबतचा भांडणाचा व्हिडीओ पोस्ट करण्याचा हास्यास्पद सल्ला काही नेटकऱ्यांनी दिला आहे.
काहींनी बिग बींना पेट्रोलच्या किंमतींबाबत पोस्ट लिहिण्याचा सल्ला दिला आहे. याआधी बिग बींनी पेट्रोलच्या वाढलेल्या किंमतींबद्दल पोस्ट लिहिले होते, जे तुफान व्हायरल झाले होते. कमेंट्लमध्ये अनेकांनी तेच ट्विट्स पुन्हा शेअर केले आहेत. ‘सर, जयाजींसोबतच्या भांडणाचा व्हिडीओ पोस्ट करा, क्षणार्धात फॉलोअर्स वाढतील पहा’, असंही काहींनी म्हटलं आहे.
T 5347 – बड़ी कोशिश कर रहे हैं, लेकिन ये 49M followers का नंबर बढ़ ही नहीं रहा है ।
कोई उपाय हो तो बताइए !!!— Amitabh Bachchan (@SrBachchan) April 13, 2025
एक्स अकाऊंटवर अमिताभ बच्चन यांचे 49 दशलक्ष फॉलोअर्स आहेत. तर इन्स्टाग्रामवर त्यांना 37.4 दशलक्ष जण फॉलो करतात. बिग बी नियमितपणे ब्लॉगसुद्धा लिहितात. ब्लॉगद्वारे ते त्यांच्या आयुष्यातील विविध प्रसंग चाहत्यांना सांगतात. त्यांच्या चित्रपटांबद्दल बोलायचं झाल्यास ते नाग अश्विनच्या ‘कल्की 2898 एडी’मध्ये झळकले होते. यानंतर ते ‘ब्रह्मास्त्र 2’मधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. त्याचसोबत ‘द इंटर्न’च्या रिमेकमध्येही ते भूमिका साकारणार आहेत.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List