सावधान! कबुतर, कुत्री, मांजर यांना खाऊ घालणाऱ्यांनी ही बातमी नक्की वाचा
भूतदया म्हणून प्राण्यांना, पक्ष्यांना अन्न खाऊ घालत असाल तर यापुढे पालिका तुम्हाला 500 रुपये दंड करणार आहे. कबुतर, कुत्री, मांजरी, गायी यांना सार्वजनिक ठिकाणी कोणी खाऊ घालत असेल आणि त्याचा इतरांना त्रास होत असेल तर अशा प्रकरणात 500 रुपयांपर्यंत दंड होऊ शकतो. पालिकेच्या घनकचरा विभागाच्या नव्या नियमावलीत ही तरतूद कायम ठेवण्यात आली आहे. याबाबत येत्या काळात कठोर कारवाई करण्याचे पालिका प्रशासनाने ठरवलं आहे.
कबुतरांना खाणं देणं महागात
गेल्या काही दिवसांपासून मुंबईतील दादर इथला कबुतरखाना हटवण्याची मागणी जोर धरू लागली आहे. तसंच इतरत्रही अनेक ठिकाणी कबुतरांना दाणे घालून अनधिकृत कबुतरखाने सुरु झाल्याबद्दल नागरिक समाजमाध्यमावर संताप व्यक्त करत असतात. मांजरीना, श्वानांना रस्त्यावर खाऊ घालणाऱ्यांवरूनही अनेकदा वाद होत असतात.
दादर रेल्वे स्टेशनबाहेर पडल्यानंतर पहिल्याच चौकातील कबुतरखाना ही दादरची खास ओळखच आहे. हा ब्रिटिशकालीन कबुतरखाना कायमस्वरुपी बंद करण्याची मागणी याआधी अनेकदा करण्यात आली. ग्रेट 2 ची हेरिटेज वास्तू असलेला दादरचा कबुतरखाना 1933 मध्ये खरंतर पाण्याचा कारंजा म्हणून बांधण्यात आला होता. नंतर हळूहळू त्याचं कबुतरांचं अनधिकृत खाद्यकेंद्र बनलं. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनीही या कबुतरखान्याविरोधात महापालिकेला पत्र लिहिलं होतं. कबुतरांमुळे दादरमधील अनेक रहिवासी, लहान मुलं आणि वयोवृद्धांना श्वसनाचे विकार जडल्याचं त्यांनी या पत्रात म्हटलं होतं. पक्ष्यांची विष्ठा आणि पिसांमुळे अनेक इमारतीच्या खिडक्या खराब झाल्याचाही त्या पत्रात उल्लेख होता. दादरमधील हा कबुतरखाना बंद करण्याची मागणी त्यांनी या पत्राद्वारे केली होती.
मुंबई महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन आरोग्य आणि स्वच्छता उपविधी 2006 मध्ये सुधारणा करण्यात आली आहे. या नव्या नियमावलीचा मसुदा 1 एप्रिल रोजी मुंबई महापालिकेने प्रसिद्ध केला आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेचे स्वच्छता आणि आरोग्य उपविधी 2005 हे सध्या लागू आहेत. या उपविधीमध्ये कालसुसंगत तसेच विविध शासकीय, प्रशासकीय बदल करून नवीन मसुदा तयार करण्यात आला आहे. त्यात रस्त्यावर किंवा सार्वजनिक ठिकाणी प्राणी पक्ष्यांना खाऊ घालणाऱ्यांवर दंडात्मक कारवाईची तरतूद करण्यात आली आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List