‘त्यांना संपवण्याची गरज नाही, ते आपल्या कर्मानेच संपले,’ उदय सामंत यांचा कोणाला टोला?

शिवाजी पार्कला जी सभा असते त्याचा पेक्षा जास्त चर्चा आपल्या बैठकीची होत आहे. त्यांना संपवण्याची गरज आपल्याला नाही. ते जे संपलेत ते आपल्या कर्माने संपले आहेत. त्यांची वागणूक अशीच राहिली तर अजूनही त्यांचा पक्ष संपेल, असे शिवसेना नेते उदय सामंत यांनी सांगितले. शिवसेना उबाठा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता त्यांनी हा टोला त्यांना लगावला.
गाव तेथे शाखा काढणार
शिवसेनेच्या बैठकीत बोलताना उदय सामंत म्हणाले, एकनाथ शिंदे यांनी उपनगरची संपर्क मंत्री ही जबाबदारी माझ्यावर दिली आहे. ज्या शिवसेनेत मी काम करतो त्याला ताकत देण्यासाठी संकल्प करण्यासाठी ही बैठक आहे. शिवसेनेच्या प्रत्येकाच्या मनात एकच भावना ठेवायची आहे. एकनाथ शिंदे यांच्यामुळे आपणास पदे मिळाली आहे. आज जर एकनाथ शिंदे नसतील तर आपले काय झाले असते, त्याचा अनुभव मी घेतला आहे. ग्रामीण भागात गाव तिथे शाखा आहे. तसे प्रत्येक ठिकाणी शिवसेनेची शाखा असणे गरजेचे आहे, असे सामंत म्हणाले.
शिंदेंसाहेबांच्या मनासारखी शिवसेना उभारु
आपण जे काम करतो ते एकनाथ शिंदे यांच्या हिताचे आहे का? याचा विचार करून आपण आपले काम केले पाहिजे, असे सांगत उदय सामंत पुढे म्हणाले, येत्या सहा महिन्यांत एकनाथ शिंदे यांना जशी शिवसेना हवी तशी उभी करू. आजची ही बैठक शेवटची आहे. मी स्वतः तुमच्या शाखांमध्ये प्रश्न सोडवायला येणार आहे. प्रत्येक शाखेत मी येणार आहे. कोकणी, अमराठी माणसांना मी भेटणार आहे. निवडणूका जवळ आल्यावर कोणी अंगावर येत असेल तर आपण शिंगावर घेऊ, असे उदय सामंत यांनी म्हटले.
आमदार मुरजी पटेल यांनी आगामी मनपा निवडणुकीत 12 नगरसेवक निवडून आणण्याची जबाबदारी घेतली. शीतल म्हात्रे म्हणाल्या, आतापर्यंत उपनगरात भाजपचे पालकमंत्री होते. आम्हाला आमचे प्रश्न त्यांच्याकडे घेऊन जाताना अडचणी वाटत होते. पण आता आपलेच खासदार आहेत. आता आम्हाला अडचण येणार नाही. पण गेली तीन वर्ष उपनगरात आपली संघटना वाढत आहे, असे म्हात्रे यांनी म्हटले.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Related Posts
Post Comment
Latest News

Comment List