कचऱ्याच्या कंटेनर्सना ऑफिसचा लूक, ‘बीएनसीए’च्या विद्यार्थिनींची कमाल; नासाच्या स्पर्धेत प्रारुप
पुणे शहरातील घनकचरा व्यवस्थापनातील पुनर्वापराकरिता साठवण्यासाठी लागणाऱ्या कचऱ्याच्या कंटेनरला कलात्मक रूप देण्यात आले आहे. सुटसुटीत आणि सहज हाताळता येण्यासारख्या कंटेनरचे नवे प्रारुप डॉ. भानुबेन नानावटी कॉलेज ऑफ आर्किटेक्चर फॉर वुमेनच्या (बीएनसीए) 20 विद्यार्थिनींनी तयार केले आहे. पथदर्शी प्रकल्प म्हणून हे प्रारुप पुणे महापालिकेच्या सिंहगड रस्ता प्रभागातील आनंदनगर भागात बसवण्यात आले असून, स्थानिक नागरिक आणि कचरावेचकांकडून त्याचा वापर करण्यात येत आहे.
शहरातील स्वच्छता आणि घनकचरा व्यवस्थापनातील कागद, काच आणि प्लॅस्टिक वेगळे करून पिंजऱ्यात वर्गवारीनुसार ठेवले जाते. या पिंजऱ्याच्या नव्या प्रारुपाची रचना विद्यार्थिनींनी केली. प्रा. महेश बांगड यांच्या मार्गदर्शनाखाली तृप्ती थापा, मोहिनी मांडके यांच्यासह एकूण 20 विद्यार्थिनींनी कचरावेचकांच्या गरजा विचारात घेऊन नवा कंटेनर तयार केला. ‘स्वच्छ’ या संस्थेचे प्रकल्प व्यवस्थापक गंधार जोशी यांनीही त्यासाठी सहकार्य केले. या कंटेनरचे प्रारुप नॅशनल असोसिएशन ऑफ स्टुडंट्स ऑफ आर्किटेक्चरतर्फे (नासा) आयोजित केलेल्या 67 व्या वार्षिक नासा डिझाईन स्पर्धेसाठी पाठवण्यात आले होते.
जोशी म्हणाले, शहरातील घनकचरा पुनर्वापरासाठी वापरले जाणारे लोखंडी पिंजरे लवकर गंजतात. त्यात उंदीर, घुशी आणि कीटकांचा प्रादुर्भाव होतो. कचराकुंडी समजून स्थानिक नागरिक त्याच्याजवळ कचरा टाकतात. पिंजऱ्याच्या नव्या डिझाईनमुळे आता या कचऱ्याचे अधिक व्यवस्थित आणि कार्यक्षम पद्धतीने वर्गीकरण करणे शक्य झाले आहे. हा प्रयोग यशस्वी झाल्यास बीएनसीएने तयार केलेल्या या पिंजऱ्यासारखे आणखी पिंजरे शहर आणि उपनगरांमध्ये बसवण्यात येतील.
कंटेनरभोवती स्वच्छता व कचऱ्याच्या पुनर्वापराचे पर्यावरणपूरक संदेशही कलात्मक पद्धतीने लावण्यात आले आहेत. ‘स्वच्छ पुणे’ या संकल्पनेसाठी सामाजिक आणि स्वच्छ पर्यावरणाच्या बांधिलकीतून हा प्रकल्प केल्याचे प्रा. बांगड यांनी सांगितले.
गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये ‘स्वच्छ’ संस्थेशी चर्चा करताना कचरावेचकांच्या गरजा आणि अपेक्षा लक्षात आल्या. त्यानुसार पूर्वी वापरात असणाऱ्या लोखंडी पत्र्याऐवजी सिमेंटचे पत्रे वापरून 10 फूट लांब, पाच फूट रूंद, नऊ फूट उंचीचा कंटेनर तयार केला. तो सुटा करून कुठेही नेता येतो. एरवी कचऱ्याचे कंटेनर आपल्या वसाहतींपाशी नको, अशी नागरिकांची धारणा असते. मात्र, हा कंटेनर छोट्या टुमदार कार्यालयासारखा दिसतो. त्यामुळे या कलात्मक कंटेनरनी ही धारणा बदलून टाकली आहे, असे मोहिनी मांडके या विद्यार्थिनीने सांगितले.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List