छत्रपती ताराराणींची समाधी जीर्णोद्धाराच्या प्रतीक्षेत

छत्रपती ताराराणींची समाधी जीर्णोद्धाराच्या प्रतीक्षेत

>> शीतल धनवडे

हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज आणि स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्या पश्चात मराठा साम्राज्य गिळंकृत करण्याचे स्वप्न घेऊन लाखोंच्या सैन्यासह चाल करून आलेल्या दिल्लीश्वर औरंगजेबला छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्नूषा, रणरागिणी छत्रपती ताराराणी यांनी तब्बल साडेसात वर्षे झुंजवत ठेवून, त्याचे स्वप्न धुळीस मिळवले. अशा पराक्रमी छत्रपती ताराराणींची समाधी मात्र जीर्णाद्धाराच्या प्रतीक्षेत आहे. परंतु, याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने या प्रश्नाकडे कोणी गांभीर्याने पाहणार की नाही, असे प्रश्न निर्माण होत आहेत.

दिल्ली झाली दीनवाणी… दिल्लीशाचे गेले पाणी… ताराबाई रामराणी… भद्रकाली कोपली… ताराबाईच्या बखते… दिल्लीपतीची तख्ते… खचो लागली तेवि मते… कुराणेही खंडली… रामराणी भद्रकाली… रणरंगी कृद्ध झाली… प्रलयाची वेळ आली… मुगलहो सांभाळा…!

तत्कालीन कवी गोविंद यांनी केलेले हे वर्णन म्हणजे रणरागिणी छत्रपती ताराराणींच्या कर्तबगारीचा इतिहास होय. सरसेनापती हंबीरराव मोहिते यांची कन्या आणि हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्नुषा तसेच स्वराज्याचे तिसरे छत्रपती राजाराम महाराज यांच्या पत्नी म्हणजेच छत्रपती ताराराणी! छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती छत्रपती संभाजी महाराज यांच्या पश्चात महाराष्ट्रावर चालून आलेल्या निर्दयी आणि कपटी दिल्लीश्वर औरंगजेबाशी सरसेनापती संताजी घोरपडे आणि धनाजी जाधव यांना बरोबर घेऊन मोगलांना सळो की पळो करून समर्थपणे राज्याची धुरा सांभाळली. सलग साडेसात वर्षे लढा देत केवळ 24 ते 25 वर्षांच्या छत्रपती ताराराणींनी या आलमगीरची कबर महाराष्ट्रातच खोदली.

पुढे इतिहासात सातारा आणि करवीर अशा दोन राजगादी निर्माण झाल्या. त्यामध्ये करवीर गादीची स्थापना छत्रपती ताराराणींनी केली. अखेरच्या काळात त्यांचे वास्तव्य साताऱ्यातील अजिंक्यतारा किल्ल्यावर होते. तेथेच दि.9 डिसेंबर 1761 रोजी त्यांचे निधन झाल्यानंतर कृष्णा नदीच्या काठावर संगममाहुली येथे त्यांची समाधी बांधली. पण अडीचशे वर्षांनंतरही या रणरागिणीची समाधी मात्र दुर्दैवाच्या फेऱ्यात अडकल्याचे दिसून येत आहे. काळाच्या ओघात गेलेल्या ताराराणींच्या समाधीचा शोध 2005 मध्ये सातारा येथील जिज्ञासा इतिहास संशोधन व संवर्धन संस्थेचे दिवंगत शिवाजीराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आला. त्यानंतरही दुर्लक्ष झालेल्या या समाधीचा शोध व संवर्धनासाठी कोल्हापुरातील इतिहास संशोधक इंद्रजित सावंत, हर्षल सुर्वे, प्रमोद पाटील तसेच शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे सहसंपर्कप्रमुख विजय देवणे या शिवप्रेमींची गेल्या पंधरा वर्षांपासून धडपड सुरूच आहे. छत्रपती ताराराणींच्या समाधीच्या जीर्णोद्धाराचा आराखडा तयार करून शासनाकडे दिला आहे. परंतु, निधी जाहीर करण्याच्या घोषणेपलीकडे काहीच झाले नसल्याचे चित्र दिसून आले.

दुश्मनाच्या कबरीवर राजकारण करण्यापेक्षा दुश्मनाला गाडणाऱ्या आपल्या छत्रपती ताराराणींची समाधी महाराष्ट्रातील प्रत्येक माणसाला प्रेरणा देणारी आहे. छत्रपती उदयनराजे व शिवेंद्रराजे यांना त्याकडे लक्ष देता येत नसेल तर त्यांनी औरंगजेबाच्या कबरी उकरण्यासाठी लक्ष द्यावे, अशी खंत व्यक्त करून, आम्ही छत्रपती ताराराणींच्या जिर्णोद्धाकडे लक्ष देऊ, अशी भावनाही हर्षल सुर्वे यांनी व्यक्त केली.

कोल्हापूरच्या गादीचे वावडे म्हणून दुर्लक्ष काय?

सध्या सव्वा तीनशे वर्षांनंतर मराठ्यांच्या शौर्याचे प्रतीक असलेली औरंगजेबाची ती कबर उखडून टाकण्यासाठी एक वर्ग आगपाखड करत आहे. पण त्याकाळात अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत स्वराज्य टिकवण्यासाठी संघर्ष करणाऱ्या कर्तबगार रणरागिणी छत्रपती ताराराणींच्या सातारा जिल्ह्यातील समाधीची दुरवस्था झाली आहे. वारसदार म्हणवणाऱ्या औरंगजेबाची कबर उध्वस्त करण्यासारख्या भलत्याच विषयात रस घेऊन बोलताना दिसत आहेत. छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांची विटंबना करणाऱ्यांबाबतही ते पक्षपाती भूमिका घेत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे त्यांना कोल्हापूरच्या गादीचे वावडे आहे काय? असा सवालही उपस्थित होऊ लागला आहे.

फोटो प्रसिद्ध झालेली समाधी आम्हीच शोधून काढली

छत्रपती ताराराणींची समाधी असलेला संपूर्ण परिसर सातारच्या छत्रपतींच्या अखत्यारीत आहे. स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराजांचे पुत्र छत्रपती शाहू महाराज यांच्यासह छत्रपती घराण्यातील व्यक्तींच्या या परिसरात समाध्या आहेत. दहा ते पंधरा वर्षांपूर्वी छत्रपती ताराराणींच्या समाधीचा शोध घेण्यासाठी कोल्हापुरातून इतिहास संशोधक इंद्रजित सावंत, हर्षल सुर्वे, प्रमोद पाटील तसेच शिवसेनेचे विजय देवणे या शिवप्रेमींनी त्या परिसरातील गुरव नावाच्या एका वयस्कर व्यक्तीची भेट घेतली असता, तीच व्यक्ती समाधीचे पूजन करणारी असल्याचे समोर आले. त्यांनी पाचव्या खिडकीसमोर 95 पावलांवर ही समाधी असल्याचे सांगितले. त्यानुसार पाहणी केली असता, एका मातीच्या ढिगाऱ्यावर नित्यनेमाने हार-फुले ठेवल्याचे दिसून आले. ही समाधी दहा ते पंधरा फूट खोल नदीच्या वाळूखाली दबली गेली होती. सात ते आठ फूट उरकल्यावर खाली जाणे शक्य नसल्याने स्थानिक लोकांनी जेसीबी उपलब्ध करून दिल्यानंतर दहा ते पंधरा फूटपर्यंत खोदली असता, त्यावेळी समाधीचे काही दगड मिळून आले. आज जे समाधीचे काही फोटो प्रसिद्ध सोशल मीडियावर व्हायरल झालेले आहेत, ती समाधीच आम्ही उकरून काढली. त्याचे दगड त्या परिस्थितीत लावले व त्याची विधिवत पूजा केली. आपण स्वतः या खड्धात उतरून ही समाधी उजेडात आणण्यात पुढाकार घेतल्याचे शिवप्रेमी हर्षल सुर्वे यांनी ‘दै. सामना’ शी बोलताना सांगितले.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

‘मी पवित्र नाही, वासनांनी भरलेली आहे’, अभिनेत्रीचे खळबळजनक विधान ‘मी पवित्र नाही, वासनांनी भरलेली आहे’, अभिनेत्रीचे खळबळजनक विधान
बॉलिवूड कलाकार हे कायमच चर्चेचा विषय ठरत असतात. मग त्यांच्या खासगी आयुष्यामुळे असो वा त्यांच्या आगामी सिनेमांमुळे ते सतत चर्चेत...
सावळ्या रंगामुळे 1000 वेळा रिजेक्ट झाली; स्टारकिडशी लग्न, घर तोडल्याचा आरोप; कोण आहे ही बॉलिवूड अभिनेत्री?
रमजानच्या महिन्यात मुस्लिम अभिनेता पोहोचला तिरुपती मंदिरात, फोटो पाहून धर्म रक्षक संतापले
सलमान – अभिषेक नाही, ‘या’ श्रीमंत उद्योजकासोबत ऐश्वर्याला करायचं होतं लग्न, दोघांचे Unseen फोटो व्हायरल
घटस्फोटानंतर धनश्री वर्माने दिली पहिली प्रतिक्रिया, म्हणाली ‘आधी माझे…’
वयाच्या 7 व्या वर्षी घर सोडलं, कॉल सेंटरमध्ये काम केलं,अन् आज आहे इंडस्ट्रीतील सर्वात श्रीमंत अभिनेत्रींपैकी एक
आदर्श रस्त्यांमुळे पुणे सुसाट ! सोलापूर-नगर रस्त्यांवरील वाहतुकीचा वेग वाढल्याचा दावा