‘…तर तुमच्यावरच बुमरँग होईल’, दिशा सालियन प्रकरणात उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया
दिशा सालियानच्या वडिलांनी मुंबई हाय कोर्टात याचिका दाखल केली आहे. या याचिकेमध्ये शिवसेना ठाकरे गटाचे नेते आमदार आदित्य ठाकरे यांच्यावर देखील आरोप करण्यात आला आहे. त्यानंतर आता राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोपाला उधाण आलं आहे. या प्रकरणात आता शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. त्यांनी थेट इशारा दिला आहे.
नेमकं काय म्हणाले उद्धव ठाकरे?
आमच्या घराण्याच्या सहा- सात पिढ्या जनतेसमोर आहेत. त्यामुळे या गोष्टींमध्ये काही तथ्य नाहीये. पण राजकारण जर या वाईट दिशेला न्यायचं असेल तर मग मात्र सगळ्यांचीच पंचायत होईल. दिशा सालियानच्या विषयात तथ्य नाही, दूर-दूर संबंध नाही. खोट्याचा नायटा कराल तर तुमच्यावरच बुमरँग होईल हेच या लोकांना मी सांगू इच्छितो, असा इशारा उद्धव ठाकरे यांनी यावेळी दिला आहे.
दरम्यान नागपुरात सोमवारी जोरदार राडा झाला, दगडफेक झाली. जाळपोळ झाली. या घटनेत मोठं नुकसानं झालं. यावर प्रतिक्रिया देताना देखील उद्धव ठाकरे यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. आज सर्वप्रथम मी आरएसएसला धन्यवाद देऊ इच्छितो. कारण त्यांनी औरंगजेबाच्या थडग्याचा विषय ज्यांनी काढला होता, त्यांनाच त्या थडग्यात गाडलं. आपण आता जे काही चाललंय राज्यात त्यावर न बोलता जुन्या कुठल्यातरी गोष्टीवरती बोलत राहीचं त्याच्यावरून दंगली घडवायच्या याचा आता कंटाळा आला आहे, म्हणून मी आरएसएसला धन्यवाद देतो.
जेव्हा ही दंगल घडली त्या दंगलीमध्ये ज्याने महिला पोलिसांचा विनयभंग केला त्याचे हात आधी छाटले पाहिजे. त्यासोबतच जर कोणी दंगल भडकवली असेल तर त्याला सुद्धा कायद्याचा इंगा दाखवला पाहिजे. एकूणच काय हे सत्ताधारी आहेत ते ढिगभर आहेत आणि विरोधी पक्ष फक्त मुठभर आहेत. मुठभर असलेला विरोधी पक्ष ढिगभर असलेल्या सत्ताधाऱ्यांना भारी पडतोय. आजच सर्व पक्षांचं एक शिष्टमंडळ राज्यपालांच्या भेटीला गेलं होतं. त्याचं कारण असं ज्या पद्धतीनं कामकाज रेटून नेलं जात आहे, हे लोकशाहीचं मूल्य पायदळी तुडवणारं आहे, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List