राम सुतार यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार; महापुरूषांच्या अजरामर शिल्पकृती साकारणार्या हातांचा सन्मान
महाराष्ट्रातील कलाक्षेत्रासाठी मोठी आनंदवार्ता आहे. सिद्धहस्त शिल्पकार राम सुतार यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत याविषयीची घोषणा केली आहे. महापुरुषांच्या अजरामर शिल्पकृती साकारणाऱ्या हातांचा सन्मान करण्यात आला आहे. सध्या राम सुतार 100 वर्षांचे तरूण आहे आणि त्यांच्या दृष्टीक्षेपात अजून अनेक कलाकृती साकारायच्या आहेत. त्यांनी साकारलेली शिल्प आजही इतिहासाची साक्ष देतात. हुबेहुब, जिवंत पुतळा उभारणीत त्यांचा हातखंड आहे. त्यांच्या शिल्पकृतीतील मानवीय भाव इतके सुक्ष्म आणि बोलके आहेत की त्यातून काहीतरी संदेश पाहणाऱ्याला हमखास मिळतो.
ज्येष्ठ शिल्पकाराचा यथोचित सन्मान
महाराष्ट्र भूषण पुरस्कार दरवर्षी देण्यात येतो. देशातील नामवंत शिल्पकार राम सुतार यांना महाराष्ट्र भूषण 2024 हा जाहीर करण्यात आला आहे. राम सुतार यांचे वय 100 वर्ष आहे. त्यांचा नुकताच शंभरावा वाढदिवस साजरा करण्यात आला. आजही ते शिल्प साकारतात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत याविषयीची घोषणा केली.
धुळे जिल्ह्यातील सुपुत्राचा गौरव
राम सुतार हे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे मुक्त शिल्पकार आहेत. धुळे जिल्ह्यातील गोंदूर हे ते त्यांचे मूळ गाव आहे. त्यांचा जन्म स्वातंत्र्यपूर्व काळात 19 फेब्रुवारी 1925 मध्ये झाला. त्यांनी देशभरात अनेक ख्यातनाम शिल्प उभारली आहेत. त्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ड्रीम प्रोजेक्ट स्टॅच्यू ऑफ युनिटी हे सरदार वल्लभभाई पटेल यांचा सर्वात उंच पुतळा उभारणीचे काम सुद्धा आहे.
सुतार यांची गाजलेली शिल्प
स्टॅच्यू ऑफ युनिटी : राम सुतार यांनी सरदार वल्लभभाई पटेल यांचा जगातील सर्वात उंच 182 मीटर पुतळा उभारला. गुजरात राज्यातील केवडिया येथे हा पुतळा दिमाखात उभा आहे.
महात्मा गांधींचे पुतळे : देशभरातच नाही तर जगभरात त्यांनी महात्मा गांधी यांचे शिल्प साकारले आहेत.
बुद्ध, महावीर : भगवान बुद्ध, महावीर आणि विवेकानंद यांच्यासह इतर महान विभूतींच्या मूर्ती अत्यंत सुबक आणि चित्तवेधक आहे. त्या पाहताना मनुष्य त्या कलाकृतीत हरवून, हरखून जाते.
त्यांच्या कलाकृतीमध्ये मुख्यत: इतिहास आणि संस्कृतीचे दर्शन घडते. त्यांना 2016 मध्ये पद्मभूषण आणि 1999 मध्ये पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. त्यांना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कार सुद्धा मिळाले आहेत. त्यांच्या शिल्पकलेत भारतीय संस्कृती, इतिहासाचा आणि भावनेचा अनोखा मिलाफ दिसून येतो.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List