ED, CBI च्या रडारवर असलेले मंत्री फडणवीसांच्या मंत्रीमंडळात, त्यांनी साफसफाईला वरून सुरुवात करावी! – संजय राऊत
नैतिकता, साधनसुचिता, संस्कार, संस्कृती या शब्दांवर भाजपचे फार प्रेम आहे. पण फडणवीस यांच्या मंत्रीमंडळात नैतिकता, साधनसुचिता, प्रामाणिकपणा याची ऐशी की तैशी करून सत्तेवर बसलेल्या लोकांची फौज आहे. भ्रष्टाचाराचे, खुनाचे आरोप असलेले, ईडी-सीबीआयच्या रडावर असलेले अनेक मंत्री त्यांच्या मंत्रीमंडळात आहेत. त्यांच्या बरोबर फडणवीस काम करताहेत. नैतिकदृष्ट्या हे योग्य नाही. तेव्हा त्यांनी जी साफसफाई खालून सुरू केली आहे ती वरून सुरू करावी. फडणवीसांनी लहान मासे जाळ्यात पकडण्याऐवजी मोठ्या माशांवर कारवाई केली पाहिजे, अशी मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी केली. बुधवारी सकाळी ‘दैनिक सामना‘मध्ये प्रसिद्ध झालेल्या फिक्सरांचा सिक्सर! या अग्रलेखावर विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ते माध्यमांशी बोलत होते.
फिक्सर हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचाच शब्द आहे. ते भ्रष्टाचार रोखण्यासाठी पावलं उचलत असतील तर त्यांचे स्वागत करणे योग्य आहे. आम्ही त्यांचे स्वागत केले आहे, फक्त ओएसडी संदर्भात कुठल्या पक्षाच्या कुठल्या मंत्र्याने शिफारस केली त्यांची नावे समोर येऊ द्या, असे आव्हानही संजय राऊत यांनी दिले.
मंत्रीमंडळातील 24 मंत्र्यांची नावे मोदींना देणार
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 4 दिवसांपूर्वी बिहारच्या भागलपूर येथे एक भाषण केले. त्यात त्यांनी भ्रष्टाचारावर हल्ला केला. मी कुणाला खाऊ देणार नाही. जर कुणी खाणारे असतील तर मला फक्त नाव कळवा, पुढले मी पाहतो, असे ते म्हणाले. आम्ही त्यांना महाराष्ट्र मंत्रीमंडळातील 24 मंत्र्यांची नावे देणार आहोत. मोदी काय करताहेत बघुया. खरे तर त्यांना नावे कळवायची गरज नाही. मागच्या तीन वर्षात कुणी महाराष्ट्र लुटला, कोण खात बसले आहे हे त्यांना माहिती आहे, असेही राऊत यावेळी म्हणाले.
मराठी माणसांना त्रास देणे हाच उद्देश
कर्नाटकमध्ये महाराष्ट्राच्या एसटी बस वाहकाच्या तोंडाला काळे फासण्यात आले होते. यामुळे वातावरण चांगलेच तापले आहे. यामुळे दोन्ही राज्यातील बससेवाही बंद आहे. यावर विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना राऊत म्हणाले की, बेळगाव येथून काही लोक आले होते. मातोश्रीवर त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. शिवसेना भवनामध्ये आम्हालाही ते भेटले. हा गृहमंत्रालयाच्या अखत्यारीतला विषय आहे. याचा खटला न्यायालयात आहे. पण सरकार कुणाचेही असो, काँग्रेसचे असो किंवा सरकारचे असो, बेळगावातील मराठी माणसांना त्रास देणे हाच त्यांचा उद्देश आहे. मराठी शाळा, लायब्ररी बंद केल्या जातात. मराठी भाषा बोलणाऱ्यांवर हल्ले केले जातात. मणिपूरमध्येही हेच चालले आहे. बेळगावचेही मणिपूर करायचे आहे का? काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी याबाबत चर्चा करावी.
महाराष्ट्र सरकारमध्ये बेळगावसाठी स्वतंत्र खाते आहे. याआधी ज्यांच्याकडे हे खाते होते त्या एकनाथ शिंदे यांना तिथे पाठवा. मुख्यमंत्र्यांनी स्वत: तिथे जाऊन कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली पाहिजे. आम्हाला वाद घालायचा नाही. कर्नाटकात दोन दगड पडणार असतील, तर महाराष्ट्रात दहा दगड पडणार. हेच करत बसायचे का? आमच्या कर्नाटकी बंधुंची इथे महाराष्ट्रात हॉटेल्स आहेत. त्यांच्यावर दगडं फेकायची का? असे संजय राऊत म्हणाले.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List