ठसा – डॉ. मीना प्रभू
>> विलास पंढरी
मराठी साहित्याच्या इतर प्रकारांत जेवढे लेखन झाले आहे व संशोधन कार्य झाले आहे, तेवढे प्रवासवर्णन या साहित्यप्रकारात झालेले नाही. ‘काशी यात्रा’ – हरी गणेश पटवर्धन, ‘माझा प्रवास’ – विष्णुपंत बाळकृष्ण गोडसे (वरसईकर गोडसे भटजी), ‘वाटचाल’, ‘दीड वितीची दुनिया’ आणि ‘मजल दरमजल’ – रा. भि. जोशी, ‘अपूर्वाई’ आणि ‘पूर्वरंग’ -पु. ल. देशपांडे, ‘माझा रशियाचा प्रवास’ – अण्णाभाऊ साठे, ‘कुणा एकाची भ्रमणगाथा’ – गो. नी. दांडेकर, ‘गोपुरांच्या प्रदेशात’ – गंगाधर गाडगीळ, ‘माडगूळ ते मेलबोर्न’ – व्यंकटेश माडगूळकर अशी काही प्रवासवर्णने मराठी साहित्यातील मैलाचा दगड ठरवतील, पण डॉ. मीना प्रभूंनी प्रवासवर्णनाला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले. प्रवास करणे आणि त्याचे हुबेहुब आकर्षक वर्णन करणे ही मीना प्रभूंची पॅशन होती. त्या गेल्या काही काळापासून आजारी असल्याने त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. प्रवासवर्णन या साहित्यप्रकाराला ग्लॅमर मिळवून देणाऱ्या मीना प्रभूंचा जीवनप्रवास नुकताच संपला.
डॉ. मीना सुधाकर प्रभूंचा जन्म 27 मार्च 1939 रोजी पुण्यात झाला. प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी आपले शिक्षण पुणे शहरातच पूर्ण केले. पुण्याच्या बी. जे. मेडिकल कॉलेजमधून एमबीबीएस पूर्ण झाल्यावर मुंबईला जाऊन त्या डीजीओ झाल्या. ख्यातनाम वास्तुरचनाकार सुधाकर प्रभू यांच्याशी विवाहबद्ध झाल्यानंतर त्यांनी लंडनमध्ये भूलतज्ञ म्हणून अनेक वर्षे काम केले. त्यांच्या आर्किटेक्ट पतीने प्रवासवर्णन क्षेत्रात त्यांना उत्तेजन तर दिलेच, शिवाय पुरेसे आर्थिक पाठबळही दिले. मीना प्रभू यांनी जगातल्या अनेक देशांत प्रवास करून प्रवासवर्णने लिहिली आहेत. पेशाने भूलतज्ञ असलेल्या प्रभू यांनी आपल्या लेखनाने प्रवासवर्णनाला एक वेगळेच वलय प्राप्त करून दिले. प्रवासवर्णन या साहित्यप्रकाराला ‘ग्लॅमर’ मिळवून दिले. डॉ. प्रभूंची प्रवासवर्णने वाचताना त्यांची निरीक्षण शक्ती, लेखन क्षमता, शब्दसंग्रह, निसर्ग प्रेम, लेखनातली सहजता पदोपदी जाणवते. विविध देशांतील अपरिचित नावे, तिथला समाज, प्रेक्षणीय स्थळे, तिथला निसर्ग या सर्वांचे वर्णन वाचताना आपल्याला प्रत्यक्षातील अनुभवाची अनुभूती तर येतेच, पण लेखिकेची निरीक्षण शक्ती आणि निसर्गाबद्दलची ओढ वाचताना क्षणोक्षणी जाणवते.
लंडन प्रवासावर लिहिलेले ‘माझं लंडन’ हे त्यांचे पहिले पुस्तक. या पुस्तकाला वाचकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. त्यानंतर त्यांची लेखन आणि जगभ्रमंती वेगात सुरू झाली आणि तीही बहुधा एकटीने. उदारीकरणानानंतर मध्यमवर्गाच्या हाती पैसा खेळू लागला. कंपन्याही आपल्या कर्मचाऱ्यांना ट्रेनिंगच्या नावाखाली विदेशात पाठवू लागल्या. परिणामी विदेशातील पर्यटनासही चालना मिळू लागली. याच काळात मीना प्रभूंनी आपल्या लेखनातून जे जाऊ शकत नव्हते अशा वाचकांना आपल्या खिळवून ठेवणाऱ्या लेखनाद्वारे विविध देशांचे दर्शन घडविले.
मीना प्रभूंनी 12 पेक्षा अधिक प्रवासवर्णने लिहिली. त्यामध्ये त्यांनी जगातील निरनिराळ्या ठिकाणांची माहिती ज्ञान देणारी व रंजनात्मक पद्धतीने दिली होती. त्यांची सर्वच पुस्तके वाचनीय असून ‘माझं लंडन’, ‘इजिप्तायन’, ‘तुर्कनामा’, ‘ग्रीकांजली’, ‘चिनी माती’ ही पुस्तके अधिक लोकप्रिय झाली. त्यांचे प्रवासवर्णनांवरील लेख विविध वृत्तपत्रे, मासिके यामध्ये प्रकाशित झाले होते.
त्यांचे ‘वारसा’ हे आत्मचरित्रही प्रसिद्ध असून लेखनातून मिळणारे उत्पन्न अंधशाळेला देऊन त्यांनी सामाजिक बांधीलकीचेही दर्शन घडविले आहे. मीना प्रभू यांनी गोव्यातील महिला साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भूषविले आहे. तसेच मीना प्रभू यांना दि. बा. मोकाशी पारितोषिक -2010, गो. नी. दांडेकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ मृण्मयी पुरस्कार -2011, न. चिं. केळकर पुरस्कार – 2012, महाराष्ट्र साहित्य परिषदेचा जीवनगौरव पुरस्कार असे अनेक पुरस्कार मिळाले. त्यांच्या अनेक पुस्तकांना महाराष्ट्र राज्य पुरस्कारदेखील मिळाले. त्यांनी पुण्यात 2017 मध्ये ‘प्रभू ज्ञानमंदिर’ हा अत्याधुनिक किंडल लायब्ररीचा प्रकल्प सुरू केला होता. त्यांच्या जाण्याने मराठी साहित्यविश्वात, विशेषतः प्रवासवर्णन क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List