लेख – पेपरफुटी आणि परीक्षेतील कॉपीचे विष
>> अजित कवटकर, [email protected]
विद्यार्थीदशेतील निरागसता ही ज्ञानार्जनाची क्षमता व आवड वाढवते आणि त्यातून बुद्धिमत्ता विकसित, प्रगल्भ होत असते. परंतु पेपरफुटी आणि परीक्षेत कॉपीचे विष जेव्हा यात कालवले जाते तेव्हा ज्ञान प्राप्त करण्याच्या, शिकण्याच्या आसक्तीला खीळ बसते. या वाटेला गेलेला क्वचितच पुन्हा खऱ्या अर्थाने अभ्यास करतो. ज्ञानगंगेच्या शुद्ध प्रवाहातून तो बाहेर फेकला जातो. जे या मार्गावर जाणारे नाहीत ते अवतीभवती चाललेल्या या घृणास्पद प्रकारांनी धास्तावतात.
बोर्डाच्या परीक्षेचे पेपर फुटणे, हे आता इतक्या वर्षांतील सातत्यानंतर आश्चर्याचे राहिलेले नाही. काही परीक्षा केंद्रांत कॉपी करण्यास मोकळ्या केल्या जाणाऱ्या चोरवाटा म्हणजेच त्याकडे जाणीवपूर्वक केले जाणारे दुर्लक्ष हे आता सर्वज्ञात व सर्रास झाले आहे. म्हणूनच की काय, अशा सुप्रसिद्ध वा कुप्रसिद्ध परीक्षा केंद्रांपैकी एखाद्यावर आपला नंबर लागावा यासाठी काही विद्यार्थी देव पाण्यात ठेवतात म्हणे. पण या शक्य-अशक्यतेत न गुरफटता चोरावर मोर ठरणारा एक मार्ग म्हणजे पेपर फोडणे. परीक्षा सुरू होण्याच्या काही तास अगोदर पेपर फुटण्याच्या घटना गेल्या काही वर्षांपासून वरचेवर घडत आहेत. अशा प्रकारे जे चोरी, लबाडी करून उत्तीर्ण होतात त्यांच्याबद्दल काय बोलायचे! वर्षभर अभ्यास करायचा नाही आणि न करतादेखील जास्त गुण मिळवायचे. असे चमत्कार जेव्हा कोण करतो तेव्हा त्याच्या करामतीचे अनुकरण इतरही विद्यार्थी करू लागतात. काही न करता जर स्वप्नाहूनही सुंदर साध्य करण्याचा मार्ग दिसत असेल तर मग कोण डोकेफोडीचा त्रास घेणार! परंतु यात शिक्षण व शिक्षण व्यवस्था बदनाम होते, आपली विश्वासार्हता गमावते. त्याचा सर्वात वाईट परिणाम त्या विद्यार्थ्याच्या मनावर होतो.
केवळ एका दशांशाने इच्छित कॉलेजची सीट गमावणाऱ्या विद्यार्थ्याला जेव्हा समजते की, सीट मिळविणाऱ्यांपैकी त्याच्या पुढे ते विद्यार्थी होते ज्यांनी फुटलेल्या पेपरच्या सहाय्याने किंवा परीक्षा केंद्रांत मिळालेल्या भरपूर मदतीमुळे त्याला मागे टाकले वा त्याच्या स्वप्नांचा चुराडा केला तेव्हा त्याचा खरेपणावरून विश्वास उडतो तो कायमचा. मग पुढे अशा पीडित विद्यार्थ्यांना नीतिमत्ता, सदाचार, सत्कर्म कितपत सत्य वाटणार? लबाड व्यवस्थेचा शिकार झालेला हा विद्यार्थी जेव्हा आपल्या अवतीभोवती ‘भ्रष्ट तोच श्रेष्ठ’ झालेला पाहतो तेव्हा शिक्षणाने दाखवलेला सरळ मार्ग कितपत योग्य आहे, ही शंका त्याच्या मनात निर्माण होणे स्वाभाविक आहे. आपणच सभ्य राहून का मागे राहावे, त्यापेक्षा पुढे झेप घेण्यासाठी ‘तो’ मार्ग आपण एकदा वापरून बघण्यास काय हरकत आहे, या निर्णयावर तो येऊ शकतो. तसे झाले तर तेव्हापासून त्याच्या जीवनातील अनैतिकतेच्या शृंखलेचा प्रारंभ होतो. कॉपी करण्यापासून सुरू होणारी चोरी पुढे त्याला अधिक मोठी गैर कृत्यं करण्यास प्रोत्साहन देते. एकाला दुसरा ‘फॉलो’ करतो आणि दुसऱ्याला तिसरा. समाज असा भ्रष्ट होत जातो आणि दुर्दैवाने अशांपैकीच कोणाच्या हातात जेव्हा सत्ता जाते तेव्हा ते राष्ट्र बरबाद होते. शिक्षणाच्या उंबरठ्यावरूनच जीवनकार्य आणि कर्तृत्वासाठीचे पहिले पाऊल टाकले जाते. हे पाऊल पडतानाचा विचार हा प्रामाणिक सकारात्मकतेने ओथंबून वाहणारा असावा. पण यासाठी ज्ञानमंदिरातील सुरुवातीपासून ते शेवटपर्यंतचा शैक्षणिक प्रवास हा सत्य, प्रामाणिकपणा, स्वकष्ट उत्सर्जित करणारा असला पाहिजे. ज्ञान, बुद्धी, व्यक्तिमत्व विकास आणि त्याहून महत्त्वाचे म्हणजे समाज-राष्ट्र यांना विचार व आकार देणारे हे क्षेत्र सर्व विकार तसेच विकृतीपासून शुद्ध असले पाहिजे आणि म्हणूनच फसवणूक करून यशस्वी होण्याची प्रवृत्ती ही शालेय जीवनातच सुधारली गेली पाहिजे.
परीक्षेमध्ये कॉपी चालणार नाही, चालतच नाही आणि करणारा सुटणार नाही, त्याला शिक्षा ही होणारच, असे कठोर वातावरण हवे. दुसरीकडे आपण अशी कृत्यं करण्याचा विचार का करावा, त्यापेक्षा आवडीने ज्ञानार्जन करून जीवनाचा उद्धार करावा अशी मानसिकता जोपर्यंत प्रत्येक विद्यार्थ्याची तयार होत नाही तोपर्यंत शिक्षकांनी जागरूक राहून दक्षता घेणे आवश्यक आहे. हल्ली परीक्षा केंद्रांवर चालणारे कॉपीचे प्रकार हे अतिरेक करत आहेत. जसे, काही पर्यवेक्षकच विद्यार्थ्यांना कॉपी करण्याची मोकळीक देत स्वतः दारात गस्त घालत उभे राहतात, पेपर कोरा सोडणाऱ्याला गाईड उघडून अथवा दुसऱ्याचा पेपर बघून लिहिण्यास सांगितले जाते. हे व असे प्रोत्साहन वा प्रकार जर खरोखरच काही शिक्षक, पर्यवेक्षक करत असतील तर हा कुंपणानेच शेत खाण्याचा प्रकार झाला. कॉपी करण्याची मुभा देऊन ते कसला परोपकार करतात? कुठच्या उदात्त हेतूने ते दया दाखवतात? ते काहींना मदतीची भिक्षा देऊन उर्वरित सर्वांना शिक्षा देतात. होत असलेल्या कॉपीकडे ते जाणीवपूर्वक करत असलेले दुर्लक्ष याचे दुष्परिणाम व्यापक असतात आणि त्यात संपूर्ण शिक्षण व्यवस्थेला काळिमा फासला जातो. पुढची पिढी अभ्यास सोडून कॉपी-चिठ्ठ्या तयार करत बसली नाही म्हणजे झाले! अशा प्रकारे उत्तीर्ण होण्याला यश म्हणायचे का? ज्याने जेवढा अभ्यास केला, जेवढी मेहनत घेतली त्याला त्या प्रमाणात त्याचे फळ मिळाले पाहिजे आणि या न्यायाने निकाल लागण्यासाठी सर्व परीक्षार्थींचे प्रामाणिकतेच्याच निकषावर मूल्यमापन झाले पाहिजे. यासाठीच शिक्षणातील, परीक्षेतील फसवणुकीचे सगळे मार्ग बंद करणे आवश्यक आहे.
विद्यार्थीदशेतील निरागसता ही ज्ञानार्जनाची क्षमता व आवड वाढवते आणि त्यातून बुद्धिमत्ता विकसित, प्रगल्भ होत असते. परंतु पेपरफुटी आणि परीक्षेत कॉपीचे विष जेव्हा यात कालवले जाते तेव्हा ज्ञान प्राप्त करण्याच्या, शिकण्याच्या आसक्तीला खीळ बसते. या वाटेला गेलेला क्वचितच पुन्हा खऱ्या अर्थाने अभ्यास करतो. ज्ञानगंगेच्या शुद्ध प्रवाहातून तो बाहेर फेकला जातो. जे या मार्गावर चुकूनदेखील जाणारे नाहीत ते मात्र अवतीभवती चाललेल्या या घृणास्पद प्रकारांनी धास्तावतात. त्यांची इच्छाशक्ती कुठेतरी डगमगते. या भविष्यकर्त्यांच्या आत्मविश्वासाला तडा जाऊ देणे केवळ नुकसानकारकच नव्हे तर पाप ठरेल.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List