गिरणी कामगारांना मुंबईतच अडीच लाखांत घरे द्या! सुनील प्रभू यांची आग्रही मागणी
मुंबईतील गिरणी कामगार आझाद मैदानात उपोषणासाठी बसले आहेत. पण राज्य सरकार ढिम्म आहे. पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत अडीच लाखांमध्ये घरे मिळतात त्याच धर्तीवर मुंबईतील गिरणी कामगारांना अडीच लाख रुपयांमध्ये मुंबईतच घरे देण्याची आग्रही मागणी शिवसेनेचे मुख्य प्रतोद सुनील प्रभू यांनी आज विधानसभेत केली.
राज्यपालांच्या अभिभाषणांवरील चर्चेत भाग घेताना सुनील प्रभू यांनी महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्न, मुंबईतील गिरणी कामगार, महापुरुषांचा अवमान, पर्यावरण अशा विविध मुद्यांवर भाष्य केले. राज्यपालांनी महापुरुषांबद्दल आदर व्यक्त केला होता. पण छत्रपती शिवाजी अवमान करणारे राहुल सोलापूरकर व प्रशांत कोरटकर यांच्या विरोधात शासनाने काहीच कारवाई केलेली नाही उलट शिवाजी महाराजांचा अवमान करणाऱयांना पोलिस संरक्षण दिले. या दोघांच्या विरोधात फौजदारी कारवाई करून अटक करा, अशी मागणी सुनील प्रभू यांनी केली. गिरणी कामगारांना मुंबईच्या बाहेरील घरांसाठी नऊ लाख रुपये मोजावे लागत आहेत. पण पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत गिरणी कामगारांना अडीच लाख रुपयांमध्ये घरे देण्याची मागणी केली.
प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींवर बंदी आणली. या मूर्तींचे विसर्जन तलावात व समुद्रात करू नये असे सांगितले आहे. पण येत्या गणेशोत्सवात प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींच्या विषयावर सरकारने गणेशोत्सव मंडळे व मूर्तिकारांना दिलासा द्यावा अशी सूचना केली.
उद्धव ठाकरेंच्या काळात निधीत वाढ
तत्कालीन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या दोन वर्षांच्या कालावधीत 793 कोटी रुपयांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधी वाढला होता. आणि देवेंद्र फडणवीस यांच्या पाच वर्षांच्या कालावधीत 614 कोटी रुपयांनी वाढ झाल्याची माहिती आरटीआय अंतर्गत मिळाल्याचे त्यांनी सांगितले.
आझाद मैदानात सुरू असलेल्या उपोषणाची दखल घ्या – अजय चौधरी
आझाद मैदानात गिरणी कामगार उपोषणाला बसले आहेत. शेकडो गिरणी कामगार मैदानात आलेले आहेत. मुंबई महाराष्ट्राला मिळवण्यात जो संघर्ष झाला त्यात गिरणी कामगारांचे मोठे योगदान होते. पण हे गिरणी कामगार आज घरांपासून वंचित आहेत. घरे मिळावीत, या मागणीसाठी शेकडो गिरणी कामगार उपोषणाला बसले आहेत. या आंदोलनाची दखल घेण्याची मागणी शिवसेना आमदार अजय चौधरी यांनी आज विधानसभेत केली.
विधानसभेत अजय चौधरी यांनी गिरणी कामगारांच्या आंदोलनाकडे सरकारचे लक्ष वेधले. गिरणी कामगारांना पनवेलमध्ये घरे दिली आहेत. त्याच्यात प्रचंड अडचणी आहेत. विविध मागण्यांसाठी शेकडो गिरणी कामगार आंदोलनाला बसले आहेत. या आंदोलनाची दखल घ्यावी व शिष्टमंडळाला भेटीची वेळ द्यावी अशी मागणी अजय चौधरी यांनी केली. त्यावर उचित उपाययोजना करण्याचे निर्देश विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सरकारला दिले.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List