करगणीत जनावरांच्या बाजारात 4 कोटींची उलाढाल; सहा हजारांहून अधिक आवक
आटपाडी तालुक्यातील करगणी येथील महाशिवरात्र यात्रेनिमित्त भरलेल्या खिलार जनावरांच्या बाजारात सुमारे साडेतीन ते चार कोटी रुपयांची आर्थिक उलाढाल झाली आहे. या यात्रेत तब्बल सहा हजारांहून अधिक जनावरांची आवक झाली होती.
माणदेशातील देशी जातिवंत खिलार गाई व खोंड, बैल याला मोठी मागणी आहे. महाशिवरात्रीनिमित्त करगणी ते बाळेवाडी रस्त्याच्या दुतर्फा पसरलेल्या विस्तृत माळरानावर यात्रा भरली होती. यात्रेसाठी सांगली, सातारा, सोलापूर, पुण्यासह कर्नाटकातील शेतकरी व व्यापारी मोठ्या संख्येने आले होते. या जनावरांच्या बाजारात खिलार खोंड, वळू, गाई आणि बैलांना विक्रीसाठी आणले होते. तसेच, यावेळी अनेक शेतकऱ्यांनी सवाद्यांच्या गजरात आणि गुलालाची उधळण करत आपल्या बैलांची मिरवणूक काढली. जनावरांच्या या बाजारात लहान खोंड, बैल आणि वळूची संख्या अधिक होती. अत्यंत देखण्या खिलार खोडाच्या किमती पंधरा हजारांपासून एक लाखापर्यंत होत्या. शर्यतीच्या बैलांच्या किमती लाखापासून तीन ते पाच लाखांपर्यंत होत्या.
न्यायालयाने बैलगाडा शर्यतींवरील बंदी हटवल्यापासून गावोगावच्या यात्रा-जत्रांमध्ये बैलगाडा शर्यती धूमधडाक्यात पार पडत आहेत. त्यामुळे खिलार बैल व गाईंना चांगली मागणी होत आहे. तर, माणदेशातील देशी जातिवंत जनावरे प्रसिद्ध असल्याने त्यांना चांगली मागणी असते. त्यामुळे येथील यात्रेत जनावरांच्या बाजारासाठी राज्यासह पराराज्यांतील शेतकरी व व्यापारी हजेरी लावतात. शेतकरी हा आपल्या बैलांची देवाणघेवाण करून नवीन जोड घेत असतो.
दरम्यान, यात्रेच्या पाश्र्वभूमीवर बाजार समिती आणि ग्रामपंचायतीने यात्रेच्या ठिकाणी स्वच्छता करून, यात्रेत विजेची आणि पाण्याची सोय उपलब्ध करण्यात आली होती.
यात्रेत सहा हजारांवर जनावरांची आवक झाली, तर चार कोटींवर उलाढाल झाल्याचे बाजार समितीचे सचिव शशिकांत जाधव यांनी सांगितले.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List