आभाळमाया – पृथ्वीवर की चंद्रावर?
>> वैश्विक, [email protected]
पृथ्वीवरच्या लोकव्यवहारातल्या एकेका गोष्टीची चर्चा वारंवार होत राहाणं ही काही नवी गोष्ट नाही. त्याचप्रमाणे पृथ्वीवरच्या नैसर्गिक गोष्टींचीही वारंवारिता असतेच. फरक इतकाच की, ज्या गोष्टी सजीव सृष्टीला उपकारक असतात त्यातून काही चांगले घडते आणि ज्या अपकारक ठरतात त्यांचे भीषण परिणाम भोगावे लागतात. मागील काही काळ अमेरिकेतील कॅलिफोर्निया राज्यात पेटलेल्या सुमारे दीड महिन्याच्या महावणव्यात अनेक घरांची, अगदी हॉलीवूडसकट बऱ्याच गोष्टींची राखरांगोळी झाली. परंतु त्यामुळे नुकसान केवळ अमेरिकेचेच झाले असं नाही तर पृथ्वीवरच्या (उरल्या सुरल्या) विशाल वनांपैकी एक आगीच्या भक्षस्थानी पडावे, हे सर्व सजीवसृष्टीवरचे संकट मानले पाहिजे.
निसर्गाची शक्ती किती अफाट असते आणि त्याचा स्वतःला अतिप्रगत म्हणवणारे देशही प्रतिकार करायला कसे अपयशी ठरतात हे कॅलिफोर्नियाच्या वणव्याने आणि लगेच ग्रीसजवळच्या एका बेटापाशी झालेल्या भूकंप-त्सुनामीने दाखवून दिले. तरीही माणूस नावाच्या प्राण्याची ‘निसर्गावर मात’ करण्याची खुमखुमी जात नाही. अखेर आपल्याला निसर्गाला साथ देऊनच जगावं लागणार हे जगाला कळेल तो सुदिन… आणि तो लवकर उगवेल अशी आजची तरी परिस्थिती दिसत नाही.
या गोष्टीचं स्मरण होण्याचं कारण म्हणजे सध्या जागतिक चर्चेत असलेला आणि ‘सिटी किलर’ (नगरनाशक) असं टोपणनाव मिळालेला एक अवकाशी अशनी किंवा महापाषाण. त्याचं वैज्ञानिक नाव आहे ‘वायआर-फोर.’ या अशनीला ‘अपोलो’ पद्धतीचा म्हणजे पृथ्वीच्या कक्षेजवळून जाणारा संभाव्य घातक पाषाण म्हटलं जातं. 40 ते 90 मीटर व्यासाचा हा अशनी गेल्या फेब्रुवारीत पृथ्वीवर आदळण्याची शक्यता टोरिनो मानकानुसार (टोरिनो स्केल) अवघ्या तीन टक्क्यांवर आली असल्याचं लक्षात आलं. तशी बातमी ‘नॅसा’ने देताच, सारे ‘कंठाळी’ चॅनल ‘आता काही तासांतच पृथ्वीवर भयंकर उत्पात घडणार. एखाद्या मोठ्या म्हणजे मुंबईसारख्या शहराचा नाश होणार, असे कर्कश निष्कर्ष काढून मोकळे झाले.
वास्तविक याच ‘स्केल’नुसार ही शक्यता 59 हजारांत 1 एवढी कमी होती. त्यामुळे धोका असला तरी बराच कमी होता. जी 25 फेब्रुवारीची तारीख गाजवली जात होती ती शांतपणे उलटल्यावर चॅनली वृत्तं चिडीचूप झाली. म्हणजे सध्या तरी हा ‘सिटी किलर’ त्याच्या कक्षेत पृथ्वीपासून दूर गेला आहे.
मात्र तो यानंतर कधी येणार ते आजच ठाऊक आहे. ते वर्ष आहे 2032 आणि दिनांक 22 डिसेंबर. म्हणजे आपल्याकडे सूर्य मकरवृत्ताकडून कर्कवृत्ताकडे जायला प्रारंभ करतो तो ‘उत्तरायणा’चा दिवस. त्या दिवशी कदाचित पृथ्वी किंवा चंद्र यांच्यापुढे ‘प्रश्नायन’ उभे ठाकण्याची शक्यता आहे. जगातल्या कुठल्याही मोठ्या शहरावर एवढा मोठा पाषाण पडला अथवा अगदी समुद्रात कोसळला (तीच शक्यता जास्त) तरी त्याचे भीषण परिणाम होणारच. 1910 मध्ये रशियात तुंगुस्का येथील सायबेरियाच्या जंगलात पडलेल्या अशनीने जंगलाचा बराच भाग नष्ट केला होता. त्यानंतर असा जाणवणारा अशनीपात झालेला नाही. ताशी लाखो किलोमीटर वेगाने तो पृथ्वीवर आदळला तरी प्रचंड हादरा बसणारच आहे.
हा अशनी ‘ऍटलास’ या अशनीशोधक संस्थेने शोधून काढला. रिओ हर्टेडो येथील दुर्बिणीतून 27 डिसेंबर 2024 रोजी दिसला. त्या वर्षी तो पृथ्वीपासून 8 लाख 28 हजार किलोमीटरवर होता. म्हणजे आपल्या चंद्रापेक्षा सुमारे 2000 पट दूर. परंतु तो 17 डिसेंबर 2028 रोजी म्हणजे त्याच्या पुढच्या फेरीत पृथ्वीच्या बराच जवळ येईल. त्याचा वेध प्रसिद्ध ‘जेम्स वेब टेलिस्कोप’ ही अंतराळातून घेत आहे. या महिन्यापासून मे महिन्यापर्यंत ही दुर्बिण ‘वाय-आर-फोर’चं बारकाईने निरीक्षण करेल. हा अशनी स्वतःभोवतीही 19 वेळा ‘गिरकी’ घेतो. तो पूर्ण ‘दगडी’ (एरोलाइट) आहे असं वाटतं. म्हणजे त्यात धातू नसावेत.
एक शक्यता अशी की, हा अशनी 2032 मध्ये पृथ्वीवर आदळण्याची शक्यता अनेक भाकितांप्रमाणे 1 ते 0.28 टक्के इतकी कमी असली तरी त्याची कक्षा काही अंतराळी कारणांमुळे म्हणजे त्याच्याशी कदाचित दुसऱ्या अशनी टकरीमुळे बदलू शकते. दुसरी शक्यता अशी की पृथ्वीच्या परसात असलेल्या चंद्रावरही तो आदळू शकतो. तसं झालं तर पृथ्वीचा एक चतुर्थांश आकाराचा चंद्र किती हादरेल याचं गणित संशोधकांनी केलेलंच असेल. त्यामुळे चंद्रकक्षेवर काही परिणाम होईल का?
तिसरी गोष्ट म्हणजे एखाद्या दूरस्थ अशनीचा वेध घेऊन त्याची कक्षा बदलण्यात यश आलेल्या संशोधकांनी ‘डार्ट’ नावाचं ‘द्वैती’ अशनीवर धडकणारं यान पाठवून डायमॉर्फोस या अशनीची कक्षा बदलण्याची कामगिरी पार पाडली होती. तसं करणं 2032 पर्यंत सहज शक्य वाटतं. नाहीतर एका महाघाताने पृथ्वी हादरेल. त्यात कोणतं नगर किंवा नगरं नष्ट होतील ते तेव्हाच कळेल आणि एवढी प्रचंड ‘हूल’ देऊन हा अशनी तसाच निसटून गेला तर ‘चॅनली’ वृत्ते पृथ्वी बचावल्याची रसभरित बोंब ठोकतीलच!
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List