प्रतापगडाच्या पायथ्याशी बहरतेय गुलाबांचे गाव! पारपार गावात गुलाबांची लागवड; पर्यटनाला मिळणार चालना
सातारा जिल्ह्यातील मांघार ‘मधाचे गाव’, भिलार’ पुस्तकांचे गाव’ आणि धुमाळवाडी हे ‘फळांचे गाव’ म्हणून सुपरिचित आहे. आता जिल्ह्यात रंगीबेरंगी ‘गुलाबाचे गाव ‘ही बहरत । आहे. घरात, अंगणात आणि साऱ्या गावात गुलाबांचा दरवळ पसरणार आहे. महाबळेश्वर तालुक्यातील प्रतापगडाच्या पायथ्याशी असलेले पारपार गाव महाराष्ट्रातील आणि जिल्ह्यातील पहिलेच गुलाबाचे गाव ठरणार आहे. प्रत्येक गावकऱ्याच्या घरासमोर व रस्त्याच्या दोन्ही बाजूला गुलाबाच्या रोपांची लागवड करण्यात येणार आहे. यामुळे संपूर्ण गाव गुलाबी रंगाच्या वातावरणाने हरवून जाईल. तसेच, या उपक्रमामुळे पर्यटनाला चालना मिळण्याबरोबरच स्थानिकांसाठी रोजगाराची मोठी संधी निर्माण होणार आहे. यातून गावाच्या आर्थिक उन्नतीला वाव मिळणार आहे.
‘गुलाबाच्या गावा’ची संकल्पना सातारा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांच्या मार्गदर्शनाखाली तयार झाली. याशनी नागराजन यांनी महाबळेश्वर पंचायत समितीला भेट दिल्यानंतर ग्रामपंचायतीच्या गटविकास अधिकारी यशवंत भांड यांच्यासमोर ‘गुलाबाच्या गावा’ची निर्मिती करण्याची विचारणा केली. त्यांनी स्थानिक वातावरण गुलाबांच्या लागवडीला पोषक मानले, त्यावरून पारपार गावचा प्रस्ताव तयार करण्यात आला. यशवंत भांड, सहायक गटविकास अधिकारी कांबळे यांच्याशी सहकार्याने आणि ग्रामस्थांच्या उत्साही सहभागातून या उपक्रमाची सुरुवात झाली.
पारपार गावात 1,500 विविध रंगीबेरंगी गुलाबाच्या रोपांची लागवड करण्यात आली आहे. त्यामध्ये आणखी 1,500 रोपे पुढील टप्यात लावली जातील. ग्रामपंचायतीने गावातील दोन्ही बाजूचे रस्ते, चौक आणि सार्वजनिक ठिकाणी गुलाबाची झाडे लावली आहेत. यासाठी संरक्षण जाळी आणि ठिबक सिंचनाची व्यवस्था करण्यात आली आहे, जेणेकरून गुलाबाच्या झाडांना योग्य पाणी मिळू शकेल. ग्रामपंचायतीने प्रत्येक नागरिकाला घरासमोर पाच गुलाबाची झाडे देण्याची योजना राबवली आहे.
रोजगार निर्माण व प्रक्रिया उद्योग
पारपार गावात गुलाबाच्या फुलांचा उपयोग गुलाब सिरप, अत्तर, गुलकंद तयार करण्यासाठी होईल. त्याचप्रमाणे, याच्या प्रक्रियेसाठी प्रक्रिया उद्योग सुरू झाल्यास, गावच्या युवकांना रोजगाराच्या नवीन संधी मिळतील. गुलाब शेती वर्षभर केली जाऊ शकते, ज्यामुळे स्थानिक शेतकरी व ग्रामस्थांना आर्थिक फायदा होईल.
धार्मिक व ऐतिहासिक महत्त्व
गावात शिवकालीन श्रीरामवरदायिनी देवीचे मंदिर आहे, ज्यामुळे पारपार गावाला ऐतिहासिक व धार्मिक महत्त्व प्राप्त आहे. गावात शिवकालीन बाजारपेठ, पूल आणि राजमार्गाच्या कडेलोटात कोकण दर्शनासाठी जाणाऱ्या पर्यटकांचा नेहमीच वावर असतो. ‘गुलाबाच्या गावा’मुळे येथे पर्यटकांची वर्दळ वाढणार आहे.
नवीन पर्यटन संभाव्यता
गुलाबांच्या लागवडीमुळे पारपार गावात पर्यटकांच्या भेटी वाढणार आहेत. देशी आणि विदेशी पर्यटक पारपारला भेट देतील, ज्यामुळे गावच्या पर्यटन व्यवसायाला नवा वेग मिळेल. गावात पिवळा, गुलाबी, पांढऱ्या आणि तांबडा गुलाब यांसारख्या विविध गुलाबांच्या वाणांची लागवड केली आहे आणि याची माहिती फलकांद्वारे लोकांपर्यंत पोहोचविली जात आहे.
पारपार गावात प्रत्येक घरासमोर व रस्त्याच्या दुतर्फा गुलाब रोपांची लागवड केली आहे. नावीन्यपूर्ण उपक्रमातून गुलाबाचे गाव म्हणून पारपारची निवड केली आहे. ग्रामपंचायत व पंचायत समितीच्या सहकार्याने व ग्रामस्थांच्या पुढाकारातून गुलाबाची रोपे लावण्यात येत आहेत. नवीन पर्यटनाचा पॉइंट तयार होत असल्याने महाबळेश्वरला येणारे पर्यटक येथे भेट देतील, त्यातून गावाची आर्थिक उन्नती होईल.
यशवंत भांड, गटविकास अधिकारी, पं.स., महाबळेश्वर
महाबळेश्वर महाराष्ट्राचे ‘मिनी कश्मीर’ आहे. दरवर्षी लाखो पर्यटक महाबळेश्वर तालुक्यात पर्यटनासाठी येत असतात. मात्र, पर्यटक केवळ येथील प्रेक्षणीय पॉइंट्सवरच जात असतात. परंतु तालुक्यातील नैसर्गिक ठेवा यापेक्षाही खूप सुंदर आहे. अनेक गावं खूप सुंदर आहेत. पुस्तकांचे गाव भिलारदेखील उपक्रमानेच निर्माण झालेले आहे. आता आमची नवीन संकल्पना ‘फुलांचं गाव’ उभारणी असून, त्यासाठी युद्धपातळीवर काम सुरू आहे. ‘फळांचे गाव’देखील महाबळेश्वरला बनवायचं आहे. त्याचबरोबर सोलर प्रोजेक्ट असणारे गाव, स्वच्छ सुंदर गाव, ऐतिहासिक गाव अशा वेगवेगळ्या गावांची निर्माण करण्याची संकल्पना प्रत्यक्षात आम्ही अंमलात आणत आहोत. त्यामुळे येथे येणाऱ्या पर्यटकांनी केवळ ठराविक प्रेक्षणीय पॉइंटला न पाहता संपूर्ण महाबळेश्वर तालुक्यातील नैसर्गिक ठेवा व पारंपरिक गावांनादेखील भेटी देऊन या परिसरातील पर्यटन वाढावे, हा दृष्टिकोन आहे. येथे 28 मार्चला महाबळेश्वर पर्यटन महोत्सव आयोजित केलेला आहे. या पर्यटन महोत्सवात पर्यटकांना महाबळेश्वर तालुक्यातील अनमोल नैसर्गिक ठेवा पाहता येईल, त्यासाठी प्रशासन पर्यटकांना दर्जेदार सेवा देण्यासाठी कटिबद्ध आहे.
याशिनी नागराजन, सीईओ, जिल्हा परिषद, सातारा
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List