नीलम गोऱ्हे यांच्याविरुद्ध अविश्वास प्रस्ताव
संवैधानिक पदावर असूनही वादग्रस्त विधाने करणाऱ्या विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्याविरोधात महाविकास आघाडीने आज विधान परिषदेत अविश्वास प्रस्ताव सादर केला. गोऱ्हे यांना पदावरून हटवा अशी मागणी त्यात करण्यात आली आहे.
महाविकास आघाडीतील नेत्यांच्या स्वाक्षरीसह सभापती प्रा. राम शिंदे आणि विधिमंडळ सचिवांकडे हा प्रस्ताव सादर करण्यात आला. विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सभापती शिंदे यांना पत्र लिहिले आहे. पत्रात, भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 183 (ग) आणि म.वि.प. नियम 11 प्रमाणे महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापती गोऱ्हे यांनी सभागृहाचा विश्वास गमावला असल्याने त्यांना उपसभापती या पदावरून दूर करण्यात यावे, असा प्रस्ताव पाठवत असल्याचा उल्लेख पत्रात करण्यात आला आहे. अविश्वास प्रस्तावावर शिवसेनेचे गटनेते अॅड. अनिल परब, आमदार सुनील शिंदे, सचिन अहिर, ज. मो. अभ्यंकर, मिलिंद नार्वेकर, काँग्रेसचे आमदार भाई जगताप, अभिजित वंजारी, राजेश राठोड, राष्ट्रवादीचे आमदार एकनाथ खडसे, शशिकांत शिंदे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
दिल्ली येथे झालेल्या मराठी साहित्य संमेलनातील ‘असे घडलो आम्ही’ या कार्यक्रमाचे व्यासपीठ नीलम गोऱ्हे यांनी राजकारणासाठी वापरले होते. शिवसेना आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याबाबत त्यांनी बेताल बडबड केली होती. त्याविरोधात राज्यभरात पडसाद उमटले होते. गोऱ्हे यांचा तीव्र निषेध झाला होता.
उद्धव ठाकरे म्हणाले, उशीरच झाला
नीलम गोऱ्हे यांच्याविरोधात अविश्वास प्रस्ताव आणायला शिवसेनेकडून उशीरच झाला, यापूर्वीच तो आणला पाहिजे होता आणि मंजूर होऊन गोऱ्हे आतापर्यंत निलंबितच व्हायला हव्या होत्या, असे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे म्हणाले. चालू अधिवेशनात त्या प्रस्तावावर चर्चा होईल अशी अपेक्षा व्यक्त करतानाच, कुणीही नियम, कायद्याचा भंग केला असेल तर त्याच्यावर कारवाई व्हायलाच हवी, असे ते म्हणाले. अविश्वास प्रस्तावात पक्षांतर हासुद्धा विषय असल्याचे त्यांनी सांगितले.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List