क्रूरतेचा कळस… बीड जिल्ह्यात संताप, सैतानांच्या फाशीसाठी कडकडीत बंद! धनंजय मुंडेंनाही सहआरोपी करण्याची मागणी
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांना कराड गँगने दिलेल्या मरणयातनांचे फोटो व्हायरल होताच संपूर्ण राज्यात संतापाचा ज्वालामुखीच फुटला! अमानुष क्रौर्य पाहून महाराष्ट्र रात्रभर तळमळत होता. संतोष देशमुखांवरील करण्यात आलेल्या अत्याचारांचे फोटो पाहून संतप्त झालेल्या बीडकरांनी सैतानांच्या फाशीची मागणी करत उत्स्फूर्त बंद पाळला.
खंडणीच्या कारणावरून संतोष देशमुख यांची अमानुषपणे हत्या करण्यात आली. या प्रकरणात सीआयडी आणि एसआयटीने 1400 पानांचे दोषारोपपत्र मकोका न्यायालयात दाखल करून वाल्मीक कराड हाच या हत्येचा मास्टरमाइंड असल्याचे स्पष्ट केले. या आरोपपत्रासोबत कराड गँगने केलेल्या अत्याचाराचे व्हिडीओ तसेच फोटोही जोडण्यात आले आहेत. हे फोटो काल माध्यमांवर व्हायरल होताच संपूर्ण राज्यात संतापाची लाट पसरली.
सोशल मीडियावर फोटो व्हायरल झाल्यानंतर बीडकरांच्या संतापाचा कडेलोट झाला. उत्स्फूर्तपणे बीड बंदची हाक देण्यात आली. मोटारसायकल रॅली काढून तरुणांनी बंदचे आवाहन केले. संपूर्ण जिल्हय़ात बंदला चांगला प्रतिसाद मिळाला. बीड, परळी, अंबाजोगाई, केज, वडवणी, माजलगाव, धारूर, आष्टी-पाटोदा-शिरूर, गेवराई शहरासह ग्रामीण भागातही कडकडीत बंद होता.
केजमध्ये टायर जाळले
केजमध्येही सकाळपासूनच आंदोलनाला सुरुवात झाली. रस्त्यावर टायर जाळून वाहतूक ठप्प करण्यात आली. धनंजय मुंडेंच्या विरोधात घोषणा देत नागरिकांनी संताप व्यक्त केला. केजची बाजारपेठ पूर्णतः बंद होती. हत्या करणाऱया निष्ठgर नराधमांना फाशी द्या आणि धनंजय मुंडेंनाही सहआरोपी करा, अशी एकमेव मागणी आंदोलनकर्त्यांची होती.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List