अमेरिका आणि चीन यांच्यात टॅरिफ युद्ध; अमेरिकेतील आयात मालावर चीनचे 15 टक्के टॅक्स
अमेरिकेने कॅनडा आणि मेक्सिकोवर 25 टक्के टॅरिफ लावल्याची घोषणा केली आहे, तर चीनमधील सामानांवर 20 टक्के टॅरिफ लावण्याचे जाहीर केले आहे. अमेरिकेच्या या निर्णयानंतर चीननेसुद्धा या निर्णयाला प्रत्युत्तर देत अमेरिकेतील मालावर 15 टक्के टॅरिफ लावण्याचा तडकाफडकी निर्णय घेतला आहे. अमेरिका, कॅनडा, मेक्सिको, चीन यासह अन्य काही देशांत लावण्यात येणाऱ्या टॅरिफमुळे आता खऱ्या अर्थाने टॅरिफ युद्ध सुरू झाले आहे, असे दिसत आहे.
अमेरिकेने चिनी मालांवरील टॅरिफ 10 टक्क्यांवरून थेट 20 टक्के करत असल्याची घोषणा केली. अमेरिकेच्या या निर्णयानंतर चीनने अमेरिकी कृषी उत्पादनांवर 10 ते 15 टक्के अतिरिक्त टॅक्स लावला आहे. अमेरिकेहून सोयाबीन, पोर्कसह अन्य वस्तूंवर 10 टक्के आयात शुल्क लावले जाणार आहे. यासोबत अमेरिकेतील चिकन, गहू, मक्का आणि कापूस यावरील आयातीवर 15 टक्के शुल्क लावले जाणार आहे, असे चिनी अर्थ मंत्रालयाने सांगितले. अमेरिकेवरील लावलेले अतिरिक्त शुल्क 10 मार्चपासून लागू होणार आहे. दोन्ही देशांत सुरू झालेल्या या टॅरिफ वॉरनंतर व्यापार युद्ध भडकण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
चीनचे अमेरिकेवर आरोप
अमेरिकेकडून लावण्यात आलेले एकतर्फी टॅरिफ हे जागतिक व्यापार संघटनेच्या नियमांचे सर्रास उल्लंघन आहे, असा चीनने आरोप केला आहे. चीन आपल्या अधिकार आणि हितांचे संरक्षण करण्यास मागे-पुढे पाहणार नाही, असे चिनी मंत्रालयाने म्हटले आहे. टॅरिफच्या घोषणेनंतर अमेरिकन शेअर बाजार घसरला आहे.
कॅनडाही देणार अमेरिकेला प्रत्त्युत्तर
प्रत्युत्तर म्हणून कॅनडाही अमेरिकेला प्रत्युत्तर देण्याची तयारी करत आहे. पुढील 21 दिवसांत 155 अब्ज डॉलर्सच्या अमेरिकन आयातीवर 25 टक्के कर लादणार असल्याचे कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी सांगितले. याची सुरुवात 30 अब्ज डॉलर्सच्या आयातीवरील शुल्काने होईल, असे ते म्हणाले.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List