पासपोर्टसाठी जन्माचा दाखला आवश्यक; परराष्ट्र खात्याचा नवा नियम
केंद्र सरकारने पासपोर्ट काढण्याच्या नियमात बदल केला असून यापुढे 1 ऑक्टोबर 2023 रोजी किंवा त्यानंतर जन्मलेल्या बाळाचा पासपोर्ट काढायचा असेल तर त्याचा जन्माचा दाखला जोडणे बंधनकारक करण्यात आले आहे. याआधी पासपोर्ट बनवण्यासाठी ओळखीचा पुरावा, रहिवासी पुरावा, आधारकार्ड, पॅनकार्ड, वडिलांचे ड्रायविंग लायसन्स, शाळा सोडल्याचा दाखला अशी कागदपत्रे लागत होती, परंतु आता सरकारने यात बदल केला असून केवळ जन्म दाखला वैध ठरणार आहे.
हा नवा नियम 1 ऑक्टोबर 2023 नंतर जन्मलेल्या बाळांसाठी लागू असणार आहे. जर जन्माचा दाखला उपलब्ध नसेल तर अशा मुलांना पासपोर्टसाठी अर्ज सादर करता येणार नाही. पासपोर्ट अर्ज प्रक्रिया अधिक सुलभ व पारदर्शी करण्यासाठी हा नियम आणला आहे, असे सरकारकडून सांगण्यात आले आहे. जन्म दाखला सक्तीने केल्याने कागदपत्रांची सत्यता पडताळून पाहण्यास मदत होईल. पासपोर्ट मिळवण्यासाठी ऑनलाईन किंवा जवळच्या पासपोर्ट सेवा केंद्र, जवळचे पोस्ट ऑफिस कार्यालयात जाऊन अर्ज भरता येऊ शकतो. अर्ज सादर केल्यानंतर पोलीस पडताळणी केली जाते.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List