जयंत पाटील बावनकुळेंना का भेटले? आतली बातमी समोर
राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे भाजपच्या वाटेवर आहेत, अशी चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. मात्र जयंत पाटील यांनी अनेकदा या चर्चेचं खंडन केलं आहे, त्यांनी ही शक्यता फेटाळून लावली आहे. मात्र जंयत पाटील यांनी काल महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली, या भेटीमुळे पुन्हा एकदा चर्चेला उधाण आलं आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार जयंत पाटील यांनी चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेतली. जयंत पाटील हे मध्यरात्रीच्या सुमारास चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मुंबईतील बंगल्यावर दाखल झाले. यानंतर साधारण तासभर त्या दोघांमध्ये बैठक झाल्याची माहिती समोर आली आहे. या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चेला पुन्हा एकदा उधाण आलं आहे. ही भेट नेमकी कशासाठी होती असा प्रश्न उपस्थित करण्यात येत असतानाच आता या भेटीवर जयंत पाटील यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.
नेमकं काय म्हणाले जयंत पाटील?
चंद्रशेखर बावनकुळे आणि माझी भेट झाली, या भेटीमध्ये सांगलीच्या काही महसूल प्रश्नावर मी त्यांना जवळपास दहा ते बारा निवेदनं दिली. मी ही निवेदनं देण्यासाठी त्यांची भेट मागितली होती. सातबाऱ्याचं संगणकीकरण केलं, सातबारा ऑनलाईन करण्यात आला आहे, पण त्याच्या दुरुस्त्या वेळेवर होत नाही, जवळपास संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना हा प्रश्न भेडसावत आहे. त्याकडे मी महसूल मंत्र्यांचं लक्ष वेधलं. यासोबत बरेच प्रश्न होते, त्यासंदर्भात मी त्यांना भेटलो. सायंकाळी सहा वाजेची वेळ होती, मात्र त्यांचं हेअरिंग बराचवेळ चाललं, ते त्यांच्या निवासस्थानी पोहोचल्यानंतर मी तिथे गेलो, असं जयंत पाटील यांनी म्हटलं आहे.
पुढे बोलताना ते म्हणाले की या भेटीमध्ये कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही. मी जेव्हा त्यांच्या घरी गेले तेव्हा माझ्यासोबत मंत्री राधाकृष्ण विखे पाटील होते, माझा स्टाफ होता. आमची विविध प्रश्नांवर चर्चा झाली, असा खुलासा जयंत पाटील यांनी केला आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List