दिल्ली चेंगराचेंगरीतून धडा; 60 रेल्वे स्थानकांवर होल्डिंग झोन, कुंभमेळय़ासाठी जाणाऱ्या गर्दीच्या व्यवस्थापनासाठी सरकारचा निर्णय
नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर झालेल्या चेंगराचेंगरीत तब्बल 18 भाविकांचा मृत्यू झाला. याप्रकरणी जबाबदारी स्वीकारून रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी विरोधकांनी लावून धरली. या पार्श्वभूमीवर रेल्वे स्थानकावर पुन्हा गर्दी उसळून दुर्घटना घडू नये यासाठी सरकारने आता ताकही फुंकून प्यायला सुरुवात केली आहे. दिल्ली चेंगराचेंगरीतून धडा घेऊन तब्बल 60 रेल्वे स्थानकांवर होल्डिंग झोन तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर पेंद्रीय राखीव पोलीस दल आणि दिल्ली पोलीस ठिकठिकाणी तैनात करण्यात आले आहेत.
महापुंभात सहभागी होण्यासाठी ट्रेन पकडण्याच्या उद्देशाने विविध रेल्वे स्थानकांवर मोठय़ा संख्येने भाविक जमा होत आहेत. हे लक्षात घेऊन गर्दीचे योग्य प्रकारे व्यवस्थापन व्हावे आणि प्रवाशांमध्ये जनजागृती करण्यासाठी होल्डिंग झोन तयार करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज सांगितले. प्रवाशांना पायऱ्यांवर तसेच विविध ठिकाणी थांबून राहू नये. उगाच गर्दी करू नये अशा सूचना आणि उद्घोषणा करण्यात येणार असल्याचे ते म्हणाले. रेल भवन येथे त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. दरम्यान, नवी दिल्ली रेल्वे स्थानकात झालेल्या चेंगराचेंगरीची चौकशी करण्याची मागणी काँग्रेसने राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाकडे केली आहे.
ट्रेन सुटतानाच प्लॅटफॉर्मवर प्रवेश
नवी दिल्ली, पटना, सुरत, बंगळुरू आणि कोईंबतूरसह विविध 60 रेल्वे स्थानकांवर होल्डिंग झोन सज्ज ठेवण्यात येणार आहे. या झोनच्या माध्यमातून प्रवाशांच्या गर्दीचे व्यवस्थापन करण्यात येणार आहे. रेल्वे स्थानकातून ट्रेन सुटण्याची वेळ होईल त्यावेळीच प्रवाशांना प्लॅटफॉर्मवर जाण्यासाठी सोडले जाईल असे रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले.
एआयची मदत घेणार
गर्दीचे योग्य व्यवस्थापन करण्यासाठी तसेच संकट व्यवस्थापनासाठी एआयचीदेखील मदत घेण्यात येणार असल्याची माहितीही रेल्वेमंत्र्यांनी दिली. स्थानिक अधिकारी प्रवाशांच्या गर्दीवर नियंत्रण ठेवण्याच्या अनुषंगाने प्रशिक्षण घेतील असेही सांगण्यात येत आहे. एआयसह तंत्रज्ञानाचा वापर गर्दीच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यात येईल. ट्रेन येण्यास उशीर असेल त्यावेळी विशेषतः एआयचा वापर करण्यात येईल, असेही रेल्वे मंत्रालय़ाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
फेल ठरल्याने सतर्क झालो
गर्दीचे व्यवस्थापन करण्यात फेल ठरल्यानेच सतर्क झालोय आणि सर्व प्रकारची दक्षता घेतोय असे, रेल्वेमंत्री म्हणाले. चौकशी समितीचा अहवाल अद्याप येणे बाकी असल्याने आम्ही कुठल्याही अधिकाऱ्यावर कारवाई करणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. चौकशी समितीचा अहवाल किती दिवसात येईल किंवा त्यासाठी निश्चित कालावधी ठरवून दिला आहे का, असे पत्रकारांनी विचारताच याप्रकरणी कोणताही निश्चित कालावधी ठरवून देण्यात आलेला नाही, असेही ते म्हणाले.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List