धक्कादायक! रुग्णाच्या डोळ्यातून काढला जिवंत किडा, एम्सच्या डॉक्टरांनी केली यशस्वी शस्त्रक्रिया
भोपाळमध्ये धक्कादायक घटना समोर आली आहे. एका 35 वर्षीय तरुणाच्या डोळ्यातून चक्क जिवंत किडा बाहेर काढला आहे. एम्स रुग्णालयात तरुणावर यशस्वी शस्त्रक्रिया पार पडली. तरुणाची प्रकृती आता स्थिर असून, त्याची दृष्टी आता सुधारत आहे. मात्र पुढील काही दिवस त्याला डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली ठेवण्यात येणार आहे.
सदर तरुणाचा डोळा लाल होता आणि जळजळ होत होती. अनेकदा डॉक्टरांकडे जाऊन त्याने याबाबत तपासणी केली. मात्र डॉक्टरांच्या उपाचारांचा काहीच फायदा होत नव्हता. हळूहळू त्याची दृष्टी कमी होऊ लागली. अखेर तो एम्समध्ये गेला.
एम्समधील डॉक्टरांनी डोळ्याच्या सर्व तपासण्या केल्या असता डॉक्टरांना डोळ्यात एक इंच लांबीचा किडा फिरताना दिसून आला. हे पाहून डॉक्टरही चक्रावले. किडा जिवंत आणि हालचाल करत असल्याने तो काढणे डॉक्टरांपुढे मोठे आव्हान होते.
एम्स रुग्णालयाचे मुख्य रेटिना सर्जन डॉ. समेंद्र करकुर यांच्या नेतृत्वाखाली डॉक्टरांच्या पथकाने यशस्वी शस्त्रक्रिया करत तरुणाच्या डोळ्यातून किडा बाहेर काढला.
गनाथोस्टोमा स्पिनीगेरम नावाचा हा किडा कच्चे किंवा कमी शिजवलेले मांस खाल्ल्याने मानवी शरीरात प्रवेश करू शकतो. शरीरात प्रवेश केल्यानंतर तो त्वचा, मेंदू आणि डोळे कुठेही जाऊ शकतो. यामुळे गंभीर समस्या निर्माण होऊ शकतात. अशा संसर्गांना रोखण्यासाठी डॉक्टर लोकांना कच्चे किंवा कमी शिजवलेले मांस खाणे टाळण्याचा सल्ला देतात.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List