चोरट्यांचा मोर्चा आता तांब्याच्या तारांकडे, बळीराजापुढे आता नवीन डोकेदुखी
शिरूर जिल्ह्याच्या विविध भागांत चोरट्यांचा धुमाकूळ अद्यापी सुरूच आहे. कांदा, गहू, इंधन चोरणाऱ्या चोरट्यांनी आता विद्युत मोटारींतील तांब्याच्या तारांकडे मोर्चा वळविला आहे.
बिबट्याचे हल्ले, भुरट्या चोऱ्यांमुळे आधीच त्रस्त झालेल्या बळीराजाच्या डोक्याला आता हा नवीनच ताप सुरू झाला आहे. वाढत्या उन्हाच्या झळांपासून पिकांना वाचविण्यासाठी शेतकऱ्यांनी धरणामध्ये लावलेल्या विद्युत मोटारींमधील तांब्याच्या ताराच चोरटे लांबवीत आहेत.
पिकाला हमीभाव मिळत नाही, कधी दुष्काळ, तर कधी अवकाळीने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास अक्षरशः हिरावून घेतला. बिबट्याबरोबरच चोरट्यांचाही धुमाकूळ जिल्ह्याच्या विविध भागांत सुरू आहे. कांदा, गहू, धान्य चोरण्याबरोबरच चोरट्यांनी पाण्यासाठी शेतकऱ्यांनी लावलेल्या सात विद्युत मोटारींतील तांब्याच्या तारा चोरून नेल्या. उन्हाच्या झळा आत्तापासून सुरू झाल्या आहेत. पिण्याच्या घोटभर पाण्यासाठी महिला आणि ग्रामस्थ मैलोन्मैल भटकंती करतात. दुर्गम भागात तर परिस्थिती जास्तच भीषण आहे. त्यातही रणरणत्या उन्हात पाण्यासाठी भटकंती केली तरी पाणी मिळेलच याची शाश्वती नाही.
चिंचणी येथील घोड धरणावर पाण्यासाठी शेतकऱ्यांनी लावलेल्या सात मोटारी उघडून चोरट्याने त्याच्या आतमधील तांब्याच्या तारा चोरून नेल्या. गणेश बाळासाहेब कोळपे (रा. गुणाट कोळपेवाडी, ता. शिरूर) यांच्यासह सातजणांच्या मोटारींतील चिंचणी धरणालगत असलेल्या सात इलेक्ट्रिक पाण्याच्या मोटारींमधील तांब्याच्या तारा चोरट्यांनी चोरून नेल्या. उत्पादन खर्चाएवढीही रक्कम मिळत नसल्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी स्वतःच पिकांवर ट्रॅक्टर चालवून पिके नष्ट केली.
बिबट्यांच्या हल्ल्यांमुळे सर्वत्र घबराट पसरली आहे. शेतीला पाणी सोडण्यासाठी गेलेल्या अनेक शेतकऱ्यांवर बिबट्याने हल्ला केल्याच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. उन्हाच्या झळा दिवसेंदिवस वाढत असून, अनेक ठिकाणी पाण्याअभावी पिके जळून जात आहेत. पाण्यासाठी शेतकऱ्यांनी विविध ठिकाणी विद्युत मोटारी बसविल्या आहेत. याच मोटारी चोरट्यांनी लांबविल्या. पावसाळ्यानंतर शेती आणि पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण होऊ नये, यासाठी गावगाड्यातील नद्या-नाल्यांवर बंधारे बांधून पाण्याचा साठा करून ठेवला जातो. पावसाळ्यात या नद्या-नाल्यांना पूर येत असल्याने बंधाऱ्यांना पाणी अडविण्यासाठी लावण्यात येणारे लोखंडी ढापे पाटबंधारे विभागाकडून काढून ठेवले जातात. मात्र, हे लोखंडी ढापेही चोरून नेण्याच्या घटना यापूर्वी अनेक वेळा घडल्या आहेत.
चोरट्यांकडून केवळ बंधाऱ्यांवरील ढापेच लंपास केले जात नाहीत, तर नदीकाठी असलेल्या शेतकऱ्यांच्या वीज पंपांच्या केबल आणि विद्युत मोटारींमधील तांब्याच्या तारांचीही चोरी केली जात आहे. वाहतुकीच्या सुरक्षेसाठी बंधाऱ्याच्या दोन्ही बाजूंना लावण्यात आलेले लोखंडी रेलिंग बारही पळविले जात आहेत.
About The Author
![Manisha Thorat- Pisal Picture](https://www.newsexpressmarathi.com/media/100/2023-08/manisha.jpg)
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List