एखाद्याला त्रासच द्यायचा असेल तर…! एसीबी चौकशीवर माजी आमदार वैभव नाईक यांची प्रतिक्रिया
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे माजी आमदार वैभव नाईक यांची गेल्या काही दिवसांपासून एसीबीकडून चौकशी सुरू आहे. मंगळवारी पुन्हा वैभव नाईक यांच्यासह त्यांच्या पत्नी स्नेहा नाईक यांना चौकशीसाठी बोलवण्यात आले असून वैभव नाईक पत्नीसह रत्नागिरीला दाखल झाले आहेत. यावेळी वैभव नाईक यांनी मीडियाशी संवाद साधला. ‘एखाद्याला दबाव आणायचा असेल किंवा त्रासच द्यायचा असेल तर त्याला आपण काही करू शकत नाही, जे सहकार्य लागेल ते मी त्यांना करेन’, अशी प्रतिक्रिया नाईक यांनी यावेळी दिली.
आतापर्यंत दिलेल्या माहितीपेक्षा वेगळी काही माहिती पाहिजे असल्यास तशी माहिती देण्याची तयारी देखील त्यांनी बोलून दाखवली. राजकीय दबाव असेल किंवा त्यांना काहीतरी वेगळी माहिती पाहिजे असेल म्हणून त्यांनी पुन्हा बोलावलं असेल असा अंदाज वैभव नाईक यांनी व्यक्त केला. पहिल्यापासूनच चौकशीला पूर्ण सहकार्य करण्याचं धोरण ठरवल्याचं त्यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केलं.
वैभव नाईक आणि स्नेहा नाईक या दोघांनाही 20 वर्षाची कागदपत्रे सादर करण्याचे आदेश रत्नागिरी लाचलुचपत विभागाकडून देण्यात आले होते. त्यानुसार नाईक दाम्पत्य रत्नागिरीत दाखल झालं आहे.
वैभव नाईक यांना 5 डिसेंबर 2022 रोजी पहिली नोटीस बजावण्यात आली होती. त्यावेळी नाईक चौकशीसाठी हजर झाले होते. तसेच त्यांनी काही कागदपत्रं देखील सादर केली होती. तर अन्य काही कागदपत्रं सादर करण्यासाठी एसीबीकडे वेळ मागितला होता. त्यानंतर 28 जुलै 2023 रोजी त्यांना पुन्हा नोटीस बजावण्यात आली होती. त्यावेळी वैभव नाईक स्वतः उपस्थित राहू शकले नाही. त्यामुळे त्यांनी आपले अकाऊंटंट अमोल केरकर यांना कागदपत्रं घेऊन पाठवलं होतं. त्यानंतर मंगळवार, 11 फेब्रुवारी 2025 रोजी पुन्हा एकदा वैभव नाईक यांना पत्नीसह एसीबी कार्यालयात हजर राहण्यासाठी नोटीस बजावण्यात आली होती.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List