टकलू हैवान ते लाल गेंडा, सध्या वक्तव्यांमुळे वादात अडकलेले राहुल सोलापूरकर नक्की कोण आहेत?
छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे वादात सापडलेले मराठी अभिनेते राहुल सोलापूरकर पुन्हा एका वक्तव्याने वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. शिवरायांबद्दल केलेल्या वक्तव्यानंतर त्यांनी आता डॉ. बाबासाहेब आंबेडकरांबद्दलही एक वक्तव्य केलं. त्यावरूनही आता पुन्हा एकदा वाद निर्माण झाला आहे.
सोलापूरकरांनी केलेले वादग्रस्त वक्तव्य
“रामजी सकपाळ नावाच्या एका बहुजन घरात जन्माला आलेला एक भीमराव, ज्याला एक आंबेडकर नावाच्या एका गुरुजींकडून दत्तक घेतला जातं आणि त्यांचंच नाव घेऊन नंतर भीमराव आंबेडकर म्हणून तो मुलगा मोठा होतो. त्यांनी प्रचंड अभ्यास केल्यामुळे वेदांमध्ये जसं म्हटलेलं आहे. ‘सब ब्रम्ह जानेती इति ब्राह्मण:’ म्हणजे अभ्यास करुन ते मोठे झालेले आहेत. तसं त्या अर्थानं वेदानुसार भीमराव आंबेडकर ब्राम्हण ठरतात”, असं वादग्रस्त वक्तव्य सोलापूरकर यांनी केलं आहे. बाबासाहेबांबद्दल केलेल्या या वक्तव्यामुळे सोलापूरकरांवर प्रचंड टीका होत आहे. पुन्हा एकदा त्यांना माफी मागण्याची मागणी केली जात आहे.
राहुल सोलापूरकर नक्की आहेत तरी कोण?
पण आपल्या वक्तव्यामुळे वादात सापडलेले हे राहुल सोलापूरकर नक्की आहेत तरी कोण? टकलू हैवान सोडून अजून त्यांनी कोणत्या भूमिका साकारल्या आहेत हे फार कमी जणांना माहित असेल. सोलापूरकरांचं पूर्ण नाव राहुल दत्तात्रय सोलापूरकर.
त्यांचा जन्म पुणे येथे झाला असून बालपण पुण्यातील शनिवार पेठेत, वाडा संस्कृतीत गेले. त्यांची आई शुभा सोलापूरकर या प्रथितयश लेखिका आणि साहित्यप्रेमी भगिनी मंडळाच्या सचिव होत्या व त्यांचे वडील दत्तात्रय सोलापूरकर नोकरी करत होते.
‘थरथराट’मुळे खरी ओळख
राहुल सोलापूरकर गेल्या 30 ते 40 वर्षांपासून अभिनय क्षेत्रात आहेत. सोलापूरकर यांनी अनेक नाटकांमध्ये काम केलं आहे. पण त्यांना खरी ओळख मिळाली ते 1989 मध्ये आलेल्या ‘थरथराट’ या चित्रपटामुळे. चित्रपटातील त्यांची टकलू हैवानची भूमिका प्रचंड गाजली. जी आजही लोकांच्या लक्षात आहे.
लक्ष्मीकांत बेर्डे यांच्याबरोबर साधारणपणे बावीस चित्रपटांतून त्यांनी भूमिका केल्या आहेत. पण त्याव्यतिरिक्त त्यांनी धुमाकूळ या चित्रपटात साकारलेली लाल गेंड्याची भूमिकाही फार गाजली.
राजर्षी शाहू महाराजांची भूमिका लक्षात राहणारी
बऱ्याच चित्रपटात त्यांनी खलनायकाची भूमिका साकारली आहे. मात्र त्यांनी सकारात्मक भूमिकाही साकारल्या आहेत. जसं की, ‘राजर्षी छत्रपती शाहू’ या मालिकेत त्यांनी साकारलेली राजर्षी शाहू महाराज यांची भूमिका. ही भूमिका त्यांची फार हिट ठरली. प्रेक्षकांकडून पसंतीही मिळाली. त्यामुळे ‘बालगंधर्व’ या चित्रपटातही त्यांना पुन्हा एकदा शाहू महाराजांच्या भूमिका करण्याची संधी मिळाली.
अनेक मालिकांमध्येही काम केलं.
झी मराठीवरील ‘एका लग्नाची दुसरी गोष्ट’ या मालिकेतही त्यांनी छोटीशी भूमिका केली होती. याशिवाय चित्रपट आणि जाहिराती यांकरता आवाज देणे, तसेच निरनिराळ्या कार्यक्रमांमध्ये सूत्रसंचालक, संवादक म्हणूनही काम केलं आहे. तसेच त्यांनी याव्यतिरिक्त मृगनयनी, नंदादीप, नुपुर, बाजीराव मस्तानी अशा बऱ्याच मालिकांमध्ये काम केलं आहे.
22 व्यावसायिक नाटके, 87 मराठी चित्रपट अन् बरंच काही
22 व्यावसायिक नाटके, 87 मराठी चित्रपट, 5 हिंदी चित्रपट आणि 31 दूरदर्शन मालिका असं बरचंस काम राहुल सोलापूरकरांच्या नावावर आहे. तसेच बऱ्याच संस्थांच्या मार्फत त्यांचा सामाजिक कार्यातही त्यांचा मोठा सहभाग आहे. मात्र सध्या त्यांच्या विधानांमुळे जे काही वातावरण तापलं आहे त्यावर आता राहुल सोलापूरकर काय प्रतिक्रिया देणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List