पोलीस डायरी – चंद्रभान सानप निर्दोष! मग इस्थरचा मारेकरी कोण?

पोलीस डायरी – चंद्रभान सानप निर्दोष! मग इस्थरचा मारेकरी कोण?

>> प्रभाकर पवार 

गोरेगावच्या टीसीएस कंपनीत नोकरीला असलेली हैदराबादची इस्थर अनुह्या ही 23 वर्षांची तरुणी सॉफ्टवेअर इंजिनीअर होती. मुंबईच्या अंधेरी एमआयडीसी वसतिगृहात राहणारी इस्थर 2013 च्या डिसेंबरअखेरीस नाताळनिमित्त आपल्या हैदराबाद येथील जन्मगावी गेली होती. सुट्टी संपल्यावर तिने 4 जानेवारी रोजी हैदराबाद सोडले. ट्रेनने ती 5 जानेवारी 2014 रोजी मुंबईच्या कुर्ला टर्मिनस रेल्वे स्थानकात पहाटे पावणेपाचच्या सुमारास आपल्याकडील दोन बॅगांसह उतरली. तेव्हापासून तिच्या मृत्यूचा प्रवास सुरू झाला. “तुला मी 300 रुपयांत अंधेरीला टॅक्सीने सोडतो.” असे सांगणाऱ्या एका इसमाच्या लाघवी बोलण्याला इस्थर भुलली. प्रवास करून थकलेल्या इस्थरने त्या इसमाला त्याच्या वाहनातून जाण्यास होकार दिला, परंतु कुर्ला टर्मिनसच्या बाहेर गेल्यानंतर मात्र त्या इसमाने टॅक्सीऐवजी इस्थरला मोटरसायकलवर बस असा आग्रह केला. इस्थरने त्यास विरोध केला, परंतु तिला त्याचा किंचितही संशय आला नाही. घरी लवकर पोहोचण्याच्या घाईत दोन बॅगांसह ती तरुणी त्या अज्ञात मोटरसायकलस्वाराच्या मागे बसली, परंतु घरी काही पोहोचली नाही.

मोटरसायकलमधील पेट्रोल संपल्याचा बहाणा करून अज्ञात इसमाने भांडुप महामार्गावर आपली मोटरसायकल थांबवली दारू पिऊन आधीच तर्र असलेल्या त्या अज्ञात इसमाने आपले खरे रूप दाखविले. त्या गर्द अंधारात इस्थर घाबरून गेली बिकट स्थिती पाहून तिने त्या इसमाच्या तावडीतून पळून जाण्याचा प्रयत्न केला, परंतु तो अयशस्वी ठरला. इस्थर पूर्ण ताब्यात आल्यानंतर त्या अज्ञात इसमाने तिच्यावर बलात्कार केला इस्थरला आपण जिवंत सोडले तर ती आपलं बिंग फोडेल, पोलिसांत तक्रार करेल म्हणून त्याने इस्थरच्याच गळ्यातील ओढणीने तिचा गळा आवळून तिला ठार मारले. पुरावे नष्ट करण्यासाठी आपल्या मोटरसायकलमधील पेट्रोल ओतून जाळले आणि तो पळून गेला. सत्ता आणि पैसा या दोन गोष्टी मिळविण्यासाठी माणूस राक्षस होतो, तर क्षणभर लैंगिक सुखासाठी तो क्रूरतेचे शेवटचे टोक गाठतो.

आपली मुलगी वेळेत घरी पोहोचली की नाही याची खातरजमा करण्यासाठी त्या मुलीचे वडील पहाटेपासून तिला वारंवार फोन करीत होते. परंतु मुलीने काही फोन उचलला नाही. तेव्हा त्यांनी स्थानिक पोलीस ठाण्यात तक्रार करून मुंबई गाठली. मुंबई पोलिसांची मदत घेतली. लोकमान्य टिळक टर्मिनसमधील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता एक इसम तिच्यासोबत तिची एक बैंग हातात घेऊन रेल्वे स्टेशनबाहेर पडताना दिसला, परंतु रेल्वेतून बाहेर पडल्यावर काही त्या इसमाचा त्या मुलीचा ११ दिवस लोटले तरी शोध लागला नाही.

2014 ला राकेश मारिया हे मुंबईचे पोलीस आयुक्त तर मुंबई गुन्हे शाखेचे सहपोलीस आयुक्त सदानंद दाते हे होते. त्यांच्यासाठी हे मोठे आव्हान होते. त्यांनी मुंबई क्राईम ब्रँचमध्ये अत्यंत विश्वासू पोलीस अधिकारी म्हणून ज्यांचे नाव घेतले जात होते त्या प्रफुल्ल भोसले, व्यंकट पाटील या अधिकाऱ्यांकडे इस्थर बेपत्ता केसचा तपास सोपविला. या अधिकाऱ्यांनी आपल्या सहकाऱ्यांना सोबत घेऊन रिक्षा, टॅक्सीवाले, रेल्वेतील सर्व हमालांची कसून चौकशी केली. कुर्ला, भांडुप परिसरातील लाखो सेल रेकॉर्ड तपासले. सीडीआर काढून अनेकांची चौकशी केली. रेल्वेतील सीसीटीव्ही फुटेजमध्ये इस्थरच्या सोबत दिसणारा इसम हा कांजूर गावात राहणारा चंद्रभान सानप (40) असल्याचे पोलिसांच्या तपासात उघड झाले, परंतु इस्थर बेपत्ता झाल्यापासून तोही कांजूर गावातून गायब असल्याचे व त्याने दाढी वाढविली असल्याचे खबऱ्यांनी सांगितले पोलिसांनी सानपच्या नाशिकच्या सिन्नर गावी त्याची चौकशी केल्यावर चंद्रभान सानप हा दोन महिन्यांनंतर पोलिसांच्या हाती लागला व त्याने आपण दारूच्या नशेत सैतानी कृत्य केल्याचे पोलिसांना सांगितले. तरीही सदानंद दाते या कर्तव्यकठोर अधिकाऱ्याने स्वतः चंद्रभान सानपची चौकशी केली व तोच खरा आरोपी असल्याची खात्री झाल्यावर आयुक्त मारिया यांना सांगितले. त्यानंतर चंद्रभान सानपला अटक झाली.

सत्र न्यायालय (विशेष महिला न्यायालय) व उच्च न्यायालयाने पोलिसांचे सर्व पुरावे ग्राह्य धरले व चंद्रभान सानपला फाशीची शिक्षा ठोठावली, परंतु सर्वोच्च न्यायालयाच्या बी आर गवई, पी. के. मिश्रा व के.व्ही. विश्वनाथन या खंडपीठाने तपासात त्रुटी असल्याचे कारण पुढे करून चंद्रभानची फाशी नुकतीच (2025 च्या जानेवारी अखेरीस) रद्द करून आरोपीची जेलमधून सुटका केली. या निकालाचा प्रचंड धक्का इस्थरच्या 70 वर्षीय वडिलांना व पोलिसांना बसला आहे.

मुंबई क्राईम ब्रँचच्या अधिकाऱ्यांनी सतत दोन महिने अत्यंत परिश्रम घेऊन गावी लपून बसलेल्या चंद्रभानला अटक केली होती, परंतु सर्वोच्च न्यायालयाने विचारलेल्या प्रश्नांचे, शंकांचे निरसन करण्यात महाराष्ट्र सरकारचे वकील अपयशी ठरल्याने सर्वोच्च न्यायालयाने चंद्रभान सानपला निर्दोष सोडले. आरोपी चंद्रभान व इस्थर रेल्वे स्थानकातून एकत्र बाहेर पडतानाचे पोलिसांनी सादर केलेले सीसीटीव्ही फुटेज कायद्याच्या कलम 65 (ब) प्रमाणे प्रमाणित केलेले नव्हते. पोलिसांचे साक्षीदारही संशयास्पद होते असे खंडपीठाने आपल्या निकालात स्पष्ट केले आहे. या आदेशामुळे मुंबई क्राईम ब्रँचही इस्थरच्या वडिलांप्रमाणे हादरून गेली आहे. भावनांच्या आधारे न्याय दिला जात नाही. तर तो पुराव्यांच्या आधारे दिला जातो. चंद्रभान सानप हा आरोपी असेलही, परंतु त्याच्याविरुद्ध सादर केलेले पुरावे कुचकामी ठरल्याचे ज्येष्ठ वकील सांगतात

सत्र व उच्च न्यायालयाकडून चंद्रभान सानपला फासावर चढविण्याचे आदेश दिले जातात, तर सर्वोच्च न्यायालय त्याला निर्दोष सोडते हे सारे अनाकलनीय वाटते. चंद्रभान सानप जर निर्दोष असेल तर माझ्या मुलीचा खरा मारेकरी कोण? असा सवाल इस्थरच्या वृद्ध वडिलांनी केला आहे. तर पोलीस म्हणतात येथून पुढे आता तपास करणे, घटनेचे साक्षीदार व पंच मिळविणे तपास अधिकाऱ्यांना फारच कठीण जाणार आहे. कुणीही घटना समोर घडूनही घाबरून साक्षीदार व्हायला तयार होत नाही. पोलिसांना साक्षीदार तयार करण्यासाठी, जपण्यासाठी प्रचंड मेहनत घ्यावी लागते. तेव्हा आता येथून पुढे आरोपी कितीही हैवान असला तरी तो निर्दोष सुटेल, परंतु तो सुखाने जगणार, झोपणार नाही. चंद्रभानचेही तेच होणार आहे. इस्थरचे भूत चंद्रभानच्या छाताडावर बसून ती त्याच्या नरडीचा घोट घेतल्याशिवाय राहणार नाही. हाच कर्माचा सिद्धांत आहे, असे पोलीस बोलत आहेत. आम्हालाही तेच वाटते. नियती कुणाला सोडत नाही.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

मनपा निवडणुकीची ‘मनसे’ची तयारी, मुंबई महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये वाढणाऱ्या या रुग्णांबाबत राज ठाकरे यांची मोठी भूमिका मनपा निवडणुकीची ‘मनसे’ची तयारी, मुंबई महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये वाढणाऱ्या या रुग्णांबाबत राज ठाकरे यांची मोठी भूमिका
MNS Raj Thackeray: राज ठाकरे यांनी शुक्रवारी मुंबई मनपा आयुक्तांची भेट घेतली. या भेटीत मुंबई शहरातील दोन महत्वाच्या प्रश्नांवर राज...
छत्रपती संभाजी महाराजांची बदनामी, विकिपीडियाची आता बोबडी वळली, सायबर पोलिसांनी अशी काढली खुमखुमी
मोठी बातमी! ‘तुझे तुकडे तुकडे करू तूला…’, भाजप नेत्याला धमकीचं पत्र
‘छावा’मुळे चर्चेत असलेल्या रश्मिकाकडे कोट्यवधींची प्रॉपर्टी, 5 महागड्या गाड्या, जाणून घ्या नेटवर्थ
प्रियांका चोप्राने एअरपोर्टवर चाहत्यांची माफी का मागितली? नेटकऱ्यांकडून कौतुक
शिवाजी नाही, छत्रपती शिवाजी महाराज; ‘छावा’मध्ये औरंगजेबाला ठणकावून सांगणारा तो बालकलाकार कोण?
अखेर ‘या’ तारखेला प्राजक्ता अडकणार विवाहबंधनात; चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव