शाब्बास सूर्या ! सातारा जिल्हा पोलीस दलातील श्वानाला सुवर्णपदक
रांची (झारखंड) येथे नुकत्याच झालेल्या ऑल इंडिया पोलीस मीटमध्ये सुवर्णपदक मिळवलेल्या जिल्हा पोलीस दलातील श्वान पथकातील ‘सूर्या’ या श्वानाची शहरातून वाजतगाजत मिरवणूक काढण्यात आली. स्फोटक शोधण्याच्या कौशल्यात जिल्ह्याला पहिल्यांदाच हा मान मिळाला आहे.
झारखंड राज्यातील रांची येथे यंदाची ऑल इंडिया पोलीस मीट स्पर्धा होती. या स्पर्धेमध्ये विविध तपास कौशल्याच्या अनुषंगाने पोलीस अधिकारी, कर्मचारी यांची स्पर्धा घेण्यात येते. त्यामध्ये पोलीस तपासात अनेकदा महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या श्वान पथकांचीही स्पर्धा घेतली जाते. या स्पर्धेसाठी महाराष्ट्राच्या वतीने जिल्हा पोलीस दलाच्या श्वान पथकातील सूर्या या श्वानाची निवड झाली होती.
स्पर्धेदरम्यान, वस्तू किंवा व्यक्तीचा माग काढणे, स्फोटके शोध घेणे अशा परीक्षा घेण्यात आल्या. त्यामध्ये सूर्या या श्वानाने सर्वाधिक गुण मिळवून सुवर्णपदक मिळवले. सूर्या साताऱ्यात आला. त्या वेळी त्याने मिळविलेल्या यशाबद्दल त्याची सातारा शहरातून वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली. पोवई नाक्यावरून पोलीस मुख्यालयापर्यंत ही मिरवणूक काढण्यात आली. या वेळी सूर्याचे हॅण्डलर हवालदार नीलेश दयाळ, तसेच डॉग स्कॉडचे प्रभारी अधिकारी शेखर कडव यांच्यासह पोलीस दलातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. श्वान पथकातील श्वानाची निघालेली मिरवणूक पाहण्यासाठी सातारकरही मोठ्या संख्येने थांबत होते.
पोलीस मुख्यालयासमोर आल्यावर पोलीस बॅण्डने सूर्याला मानवंदना दिली. त्यानंतर जिल्हा पोलीस प्रमुख समीर शेख व अतिरिक्त पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर यांनी सूर्या व नीलेश यांचे स्वागत केले. 2016 पासून राज्याला श्वान पथकाचे सुवर्णपदक नव्हते, तर जिल्ह्याला पहिल्यांदा हा मान मिळाला. त्यामुळे सूर्याचे कौतुक होत आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List