शहराचे विद्रूपीकरण करणाऱ्यांवर फौजदारी, अहिल्यानगरचे आयुक्त यशवंत डांगे यांचा स्वतःचा मोहिमेत सहभाग
शहरात विनापरवाना भिंतीवर, सार्वजनिक मालमत्तेवर पोस्टर्स, बॅनर्स लावून विद्रुपीकरण करण्याचे प्रमाण वाढले आहे. दोन दिवसांपूर्वी झालेल्या स्वच्छता मोहिमेत ही बाब समोर आली होती. आयुक्त यशवंत डांगे यांनी या मोहिमेत भाग घेत स्वतःहून भिंतीवरील पोस्टर्स काढून घेतले. शहरात विनापरवाना पोस्टर्स, बॅनर्स लावून विद्रुपीकरण करणाऱ्यांवर थेट फौजदारी कारवाई करण्याचे आदेश आयुक्तांनी प्रभाग अधिकाऱ्यांना दिले आहेत. त्यानुसार शहर प्रभाग समितीचे प्रभाग अधिकारी राकेश कोतकर यांनी उड्डाणपुलाच्या पिलरवर पोस्टर लावून विद्रुपीकरण केल्याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
अहिल्यानगर महानगरपालिकेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी उड्डाणपुलाखाली ‘स्वच्छता अभियान’ राबविले. यावेळी माळीवाडा बसस्थानक परिसरातील पुलाखालील पिलरवर छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासातील चित्र रेखाटलेले असलेल्या ठिकाणी आर्य करिअर अॅकॅडमी पोलीस भरती स्पेशल बॅच संगमनेर यांच्या जाहिरातीचे पोस्टर लावल्याचे समोर आले.
सुनील खंडेराव फटांगरे (रा. आर्य रेसिडेन्शियल बँच, सुधीर हॉटेलमागे, सायखिंडी फाटा, संगमनेर) यांच्यामार्फत हे पोस्टर्स विनापरवाना लावून विद्रूपीकरण केल्याप्रकरणी पंचनामा करण्यात आला. त्यानुसार सुनील खंडेराव फंटागरे यांच्याविरुद्ध कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विनापरवाना सार्वजनिक मालमत्तेवर पोस्टर्स, बॅनर्स लावून विद्रूपीकरण करू नये. अशा पद्धतीने विद्रुपीकरण करणाऱ्यांवर यापुढे फौजदारी कारवाई केली जाणार आहे. सर्व प्रभाग अधिकाऱ्यांना याबाबत आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे आपल्या शहराचे विद्रुपीकरण होणार नाही, याची दक्षता घ्यावी. जाहिरात कंपन्यांनीही याची खबरदारी घ्यावी. विद्रुपीकरण केल्यास संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात येईल, असा इशारा आयुक्त यशवंत डांगे यांनी दिला आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List