मराठीचा अपमान थांबेना, अरेरावी दाखवत ज्येष्ठ नागरिकाला हिंदी बोलण्यास पाडलं भाग
गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात विशेषत: मुंबई आणि आसपासच्या परिसरात मराठी-अमराठी वाद बराच रंगला आहे. मराठी बोलण्याच्या मुदयावरूनही अनेकदा वाद झाले आहेत. त्यातच आता मुंबईत पुन्हा असाच एक धक्कादायक प्रकार घडल्याचे समोर आलं आहे. डोंबिवलीमधील 82 वर्षांच्या वृद्ध नागरिकाला हिंदीत बोलण्यास भाग पाडण्यात आलं. मुंबईतील महापेक्स प्रदर्शनात हा संतापजनक प्रकार घडल्याची माहिती समोर आली आहे. एवढंच नव्हे तर ‘ तुम्ही कुठेही तक्रार करा, आमचं काहीच वाकडं होणार नाही’ असं म्हणत महापेक्स प्रदर्शनातील अधिकाऱ्याने त्या ज्येष्ठ नागरिकासोबत अरेरावी केली. या घटनेनंतर ‘आपुल्याच घरात हाल सोसते मराठी’, असं म्हटलं तर ते काही चुकीचं ठरेल असं वाटत नाही. याप्रकरणी संबिधत ज्येष्ठ अधिकाऱ्याने मुंबई जीपीओच्या फिलाटेलिक ब्युरोकडे तक्रार केली आहे.
एकीकडे मराठी भाषा संवर्धनासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने मोठा निर्णय घेतला. महाराष्ट्रातील सर्व शासकीय, निमशासकीय आणि महापालिका कार्यालयांमध्ये मराठी बोलणे अनिर्वाय करण्यात आले आहे. मराठी बोलणे आणि मराठी व्यवहार करण्यासाठी प्रोत्साहन देण्यासाठी आता राज्य सरकारने मोठे पाऊल उचलले. शासकीय कार्यालयात सर्वत्र मराठी फलक असणार आहेत. तसेच मराठी भाषेचा वापर करण्यास नकार देणाऱ्यांवर शिस्त भंगाची कारवाई करण्यात येणार आहे. मात्र सरकारने हा निर्णय घेतलेला असतानाच देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईतच मराठीची ही दुरावस्था होत असून अधिकारी मराठीत बोलण्यास नकार देत ज्येष्ठांचा थेट अमपान करताना दिसत आहेत. त्यामुळे संतापाचे वातावरण आहे.
नक्की काय झालं ?
मिळालेल्या माहितीनुसार, डोंबिवलीत राहणारे रमेश पारखे हे 82 वर्षांचे गृहस्थ 25 तारखेला मुंबईतील वर्ल्ड ड्रेड सेंटरमध्ये गेले होते. भारत सरकारच्या पोस्ट अँड टेलिग्राफ जीपीओतर्फे आयोजित एका प्रदर्शनासाठी ते पोहोचले. त्यांना काही फिलाटेलीक साहित्य हवं होतं. मला अमुक-अमुक साहित्य हवंय असं सांगत पारखे यांनी मराठीत मागणी केली. मात्र त्या काऊंटरवरील अधिकाऱ्याचा पवित्रा काही वेगळाच होता. तुम्ही जर हिंदीत बोलला नाहीत, तर आम्ही तुमच्याशी बोलणार नाही, तुम्हाला हिंदीत बोलावंच लागेल, असे त्या अधिकाऱ्याने सुनावले. एवढंच नव्हे तर तुम्ही जा, कुठेही जा, तक्रार करा, आमचं काही बिघडणार नाही, अशी उद्धट वागणूक त्या अधिकाऱ्याची होती, असे पारखे यांनी सांगितलं. महाराष्ट्रात राहून अशा तऱ्हेने दादागिरी करणं बरोबर नाही, अशा शब्दांत पारखे यांनी त्यांचा संताप व्यक्त केला.
दरम्यान या संपूर्ण प्रकारानंतर पारखे यांनी संबंधित जी.पी.ओ. पोस्ट खात्यातील अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार केली आहे. आता या घटनेनंतर त्याविषी राज्य सरकार काय भूमिका घेते याकडे त्यांचं लक्ष लागलं आहे.
मागच्या काही दिवसात मुंबई आणि शेजारच्या ठाण्यात मराठी-हिंदी भाषा वादाच्या घटना घडल्या आहेत. काही दिवसांपूर्वीच कल्याणमध्ये एका मराठी तरुणाला परप्रांतीय रिक्षा चालकांनी मारहाण केल्याच प्रकरण समोर आलं होतं. तर त्यानंतर डोंबिवलीमध्येही मराठी विरुद्ध अमराठी वाद समोर आला. त्यनारायण पूजा आणि हळदी कुंकू समारंभावरुन हा वाद झाला. पूजा आणि हळदी कुंकू समारंभाला सोसायटीतील अमराठी लोकांनी विरोध केला. पूजा आणि हळदी कुंकू समारंभासंदर्भात अपशब्द वापरल्याचाही आरोप झाला होता. दिवसेंदिवस मराठीच्या मुद्यावरून होणारे वाद वाढतच चालले आहेत.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List