सिंधुदुर्ग राणे पिता पुत्रांकडे आंदण? पालकमंत्रीपदापासून ते जिल्हा नियोजन समितीत राणे पिता पुत्र
एकीकडे नाशिक आणि रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदावरून वाद सुरू आहे. पण दुसरीकडे संपूर्ण सिंधुदुर्ग हा जणू राणे कुटुंबीयाकडे आंदणच दिला आहे. त्याचे कारण राणे पिता पुत्रांकडे सिंधुदुर्गचे पालकमंत्रीपद, जिल्हा नियोजन समिती आणि विकास परिषदेच्या चार सदस्यीस समितीत तिनही राणे पिता पुत्रांचा समावेश आहे. नितेश राणे यांच्याकडे मत्स्यव्यवसाय व बंदर विकास मंत्रीपद देण्यात आले आहे. इतकंच नाही तर सिंधुदुर्गचे पालकमंत्रीपदही त्यांच्याकडे देण्यात आले आहे.
इंडियन एक्सप्रेस वृत्तपत्राने याबाबत वृत्त दिले आहे. रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे खासदार नारायण राणे हे सुद्धा जिल्हा नियोजन समितीचे सदस्य आहेत. इतकंच नाही तर राणे यांचे ज्येष्ठ सुपुत्र आणि मिंधे गटाचे कुडाळचे आमदार निलेश राणे हे सुद्धा जिल्हा नियोजन समितीचे सदस्य आहेत. याच चार सदस्यीस समितीती राणे कुटुंबाचे नसलेले सदस्य म्हणजे मिंधे गटाचेच आणि सावंतवाडीचे आमदार दीपक केसरकर आहेत.
फक्त सिंधुदुर्गच नाही आणखी काही जिल्ह्यात अशीच परिस्थिती आहे. रत्नागिरीत उदय सामंत आणि किरण सामंत हे रत्नागिरीच्या जिल्हा नियोजन समितीचे सदस्य आहेत. दोघेही एकाच जिल्ह्यातील आमदार आहेत. कोल्हापुरातही जिल्हा नियोजन समितीत राज्यसभा खासदार आणि त्यांचे बंधू अमल महाडिक सदस्य आहेत. रायगडच्या पालकमंत्रीपदावरून वाद झाला होता. फडणवीस सरकारने अदिती तटकरे यांच्याकडे रायगडचे पालकमंत्रीपद दिले होते. पण त्यावर वाद झाला आणि रायगडचा निर्णय मागे घ्यावा लागला. असे असले तरी रायगडच्या जिल्हा नियोजन समितीत अदिती तटकरे आणि त्यांचे वडिल, रायगडचे खासदार सुनील तटकरे यांचा समावेश आहे. जिल्हा विकासासाठी 2024-25 साठी सरकारने सिंधुदुर्गसाठी 223 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. जिल्हा विकासासाठी एकूण 4 हजार 538 कोटी रुपयांचा निधी देण्यात आला आहे. जिल्ह्याचा भुगोल, लोकसंख्या आणि योजनांवर आधारित हा निधी वितरीत केला जातो.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List