रत्नागिरीत स्मार्ट मीटर जाळून आंदोलन करणार; माजी खासदार विनायक राऊत यांचा इशारा
वेगवेगळ्या मार्गाने महाराष्ट्र अदानीच्या घशात घालण्याचे प्रयत्न महाराष्ट्र सरकार करत आहे. महाराष्ट्रातील वीजग्राहक अदानीच्या ताब्यात देऊन त्यांचे स्मार्ट मीटर बसवण्याचे काम सध्या रत्नागिरी तालुक्यात सुरू आहे. हे स्मार्ट मीटर नागरिकांनी बसवून घेऊ नये, आम्ही पुढील दोन दिवसात हे स्मार्ट मीटर जाळून आंदोलन करणार असल्याचा इशारा शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) नेते आणि माजी खासदार विनायक राऊत यांनी दिला. रत्नागिरीत ते पत्रकारांशी संवाद साधत होते.
अदानीचे स्मार्ट मीटर बसवण्याचे काम यापूर्वी सुरू झाले होते ते आम्ही रोखले होते. आता पुन्हा रत्नागिरी तालुक्यात स्मार्ट मीटर बसवण्याचे काम सुरू झाले आहे.नागरिकांना मी आवाहन करतो की, आपल्या घरात स्मार्ट मीटर बसवू देऊ नका. हे स्मार्ट मीटर पहिले दोन महिने व्यवस्थित चालतील. मात्र तिसऱ्या महिन्यापासून तिप्पट वीज बील येणार असल्याची माहिती मिळाली असल्याचा आरोप माजी खासदार विनायक राऊत यांनी केला.
पालकमंत्र्यांच्या घरासमोर निदर्शने करणार
येत्या दोन दिवसात हे स्मार्ट मीटर जाळून आम्ही आंदोलन करणार आहोत. तसेच पालकमंत्र्यांच्या घराबाहेर आम्ही निदर्शने करणार असल्याचे विनायक राऊत यांनी सांगितले. उद्योगमंत्री उदय सामंत फक्त पक्ष फोडाफोडीचा उद्योग करत आहेत. दावोसमध्ये जाऊन त्यांनी केलेले बोगस करार करून केलेली दिशाभूल आता उघडकीस आली आहे. दावोसमध्ये जाऊन बोगस करार करण्यापेक्षा आधी स्मार्ट मीटर थांबवा. दावोसमध्ये जाऊन हे फक्त मौजमजा करून आल्याचा आरोप विनायक राऊत यांनी केला.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List