‘जोपर्यंत धनंजय मुंडेंचा राजीनामा घेत नाहीत तोपर्यंत अजित पवारांना राज्यात फिरू देऊ नका’; मराठा नेता आक्रमक, म्हणाला दगडं घेऊन…..
बीड जिल्ह्यातल्या मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण करून हत्या करण्यात आली, या हत्येनंतर आता राज्यातील वातावरण चांगलंच तापलं आहे. आरोपींना कठोरातील कठोर शिक्षा व्हावी, संतोष देशमुख यांच्या कुटुंबाला न्याय मिळावा यासाठी राज्यभरात आक्रोश मोर्चे काढले जात आहेत. आज पंढरपुरात सकल मराठा समाज सोलापूर जिल्ह्याच्या वतीनं आक्रोश मोर्चा काढण्यात आला. या मोर्चाला विविध पक्षाचे आणि संघटनेचे पदाधिकारी, नेते उपस्थित होते. संतोष देशमुख यांचं कुटुंब देखील या मोर्चाला उपस्थित होतं. या मोर्चात बोलताना पुन्हा एकदा मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली आहे.
मराठा नेते रामभाऊ गायकवाड यांनी या मोर्चामध्ये बोलताना अतिशय आक्रमक भूमिका घेतली. जोपर्यंत धनंजय मुंडे यांचा राजीनामा होत नाही, तोपर्यंत अजित पवार यांना राज्यात फिरू देऊ नका, असं गायकवाड यांनी म्हटलं आहे. अजित पवार आणि धनंजय मुंडे यांना रस्त्यावर फिरू देऊ नका, दगडं घेऊन त्यांच्या समोर गेलं पाहिजे. पांडुरंगाची शपथ घेऊन सांगतो अजित पवार यांना राज्यात फिरू द्यायचं नाही असं गायकवाड यांनी म्हटलं आहे.
दरम्यान या मोर्चामध्ये बोलताना संतोष देशमुख यांच्या कन्या वैभवी देशमुख भावनिक झाल्या. माझ्या वडिलांनी एकही वारी चुकवली नाही, मी पंढरपूरमध्ये येऊन विठ्ठला साकडे घातले की माझ्या वडिलांना न्याय दे. आरोपींना फाशी दिल्यावर त्यांच्या कुटुंबीयांना वाईट वाटेल, हे मला माहिती आहे पण माझ्या वडिलांना खूप क्रूर पद्धतीने मारले आहे. त्यामुळे आम्हाला न्याय मिळाला पाहिजे अशी आमची मागणी आहे, असं संतोष देशमुख यांची कन्या वैभवी देशमुख यांनी यावेळी म्हटलं.
या प्रकरणात आतापर्यंत सात आरोपींवर मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. मात्र अजूनही एक आरोपी कृष्णा आधंळे हा पोलिसांच्या हाती लागलेला नाही. एसआयटीचं पथक त्याच्या मागावर आहे. अखेर त्याला आता फरार घोषीत करण्यात आलं आहे. पोलीस सर्वत्र त्याचा कसून शोध घेत आहेत.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List