उद्धव ठाकरेंचे शिलेदार नाराज, भूकंप अटळ? सर्वात मोठी बातमी समोर
जळगावमधून मोठी बातमी समोर येत आहे. जळगावमध्ये उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. जळगावात ठाकरे गटातील नाराजांना सोबत घेण्याच्या हालचाली सुरू असून, जळगाव महापालिकेचे ठाकरे गटातील माजी नगरसेवक शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली आहे. महापालिकेतील शिवसेना ठाकरे गटाचे चार ते पाच माजी नगरसेवक हे शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती शिवसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे 1 फेब्रुवारीला जळगाव दौऱ्यावर येणार आहेत. या दौऱ्यात शिवसेना ठाकरे गटाचे माजी नगरसेवक शिवसेनेत प्रवेश करण्याची शक्यता आहे. विधानसभा निवडणूक लढलेले तसेच ठाकरे गटाचे माजी उपमहापौर कुलभूषण पाटील हे सुद्धा शिवसेनेत प्रवेश करणार आहेत, अशी चर्चा सुरू आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून शासकीय दौऱ्यासोबत शिवसेना पक्षाचा संघटनात्मक आढावा घेतला जाणार आहे. यावेळी शिवसेना ठाकरे गटावर नाराज असलेले माजी नगरसेवक हे शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
जळगावमध्ये महापालिका निवडणुकीच्या आधीच ठाकरे गटाच्या महापालिकेतील नगरसेवकांना सोबत घेत शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का देण्याच्या तयारीत असल्याचे पाहायला मिळत आहे. आमच्यावर लागलेला गद्दारीचा डाग जनतेने पुसून टाकला असून, इथे फक्त आता शिवसेना चालणार आहे, असंही यावेळी मंत्री गुलाबराव पाटील यांनी म्हटलं आहे. जळगाव जिल्ह्यातील जिल्हा परिषद, महानगरपालिका, नगरपालिका तसेच पंचायत समितीवर भगवाच फडकणार असल्याचा विश्वास देखील यावेळी मंत्री गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केला आहे.
दरम्यान दुसरीकडे नांदेडमध्ये देखील उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का बसला आहे. शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि राज्य संघटक एकनाथ पवार यांनी राजीनामा दिला आहे. 2024 च्या विधानसभा निवडणुकीत एकनाथ पवार हे लोहा – कंधार मतदारसंघाचे ठाकरे गटचे उमेदवार देखील होते. हा नांदेडमध्ये शिवसेना ठाकरे गटासाठी मोठा धक्का मानला जात आहे. त्यानंतर आता जळगावमध्ये देखील धक्का बसणार का? हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List