Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींसाठी खुशखबर, अजितदादांची मोठी घोषणा
अल्प उत्पन्न गटातील महिलांना आर्थिक मदत व्हावी या उद्देशानं सरकारने लाडकी बहीण योजना सुरू केली आहे. या योजनेंतर्गत ज्या कुटुंबांचं उत्तन्न हे अडीच लाखांपेक्षा कमी आहे, त्या कुटुंबातील महिलांच्या बँक खात्यामध्ये दर महिन्याला दीड हजार रुपये जमा करण्यात येतात. या योजनेची अंमलबजावणी गेल्या वर्षी जुलै महिन्यापासून करण्यात आली आहे. आतापर्यंत या योजनेंतर्गत महिलांच्या बँक खात्यात जुलै ते डिसेंबर असे सहा हाप्ते जमा करण्यात आले आहेत. आता जानेवारीचा हाप्ता कधी मिळणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
तसेच जर पुन्हा एकदा राज्यात आमचं सरकार आलं तर आम्ही लाडक्या बहिणींना दीड हजार रुपये नाही तर 2100 रुपये देऊ असं आश्वासन महायुतीनं विधानसभा निवडणुकीच्या प्रचारावेळी दिलं होतं. महायुतीला विधानसभा निवडणुकीत मोठं यश मिळालं, त्यामध्ये सर्वात मोठा वाटा हा लाडक्या बहिणींचा असल्याचं बोललं जात आहे. राज्यात पुन्हा एकदा महायुतीचं सरकार आलं आहे. त्यामुळे आता 2100 रुपये कधीपासून मिळणार याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे. दरम्यान जानेवारीचे पैसे महिलांच्या खात्यात कधी जमा होणार याबाबत आता अर्थमंत्री अजित पवार यांच्याकडून मोठी अपडेट देण्यात आली आहे.
नेमकं काय म्हणाले अजित पवार?
माझी लाडकी बहीण योजना कोणत्याही परिस्थिती चालूच राहणार आहे. काळजी करू नका. फक्त त्याचा लाभ गरजू महिलेला मिळाला पाहिजे. जी व्यक्ती श्रीमंत आहे, टॅक्स भरते, नोकरी आहे, तिचा ऊस चांगला जातो, त्यांच्याबाबत वेगळा विचार करणार आहे. पण ही योजना ज्या मायमाऊलीपर्यंत पोहोचायला हवी होती, त्यांच्यापर्यंत ही योजना पोहोचवण्याचं काम महिला आणि बालविकास विभागाने केलं आहे. परवाच या योजनेसाठी 3700 कोटींचा चेक महिला आणि बालविकास खात्याला दिला आहे. 26 तारखेच्या आत लाभार्थी महिलांच्या खात्यामध्ये या योजनेचा सातवा हाप्ता जमा होईल असं अजित पवार यांनी म्हटलं आहे. दरम्यान अजित पवार यांच्यापूर्वी मंत्री आदिती तटकरे यांनी देखील जानेवारीच्या हाप्त्याबाबत माहिती दिली आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List