सैफ अली खानच्या हल्लेखोरासाठी पोलीसांनी जंगजंग पछाडलं, अन् पठ्ठ्या ठाण्यात सापडला, काय म्हणाले अजितदादा?
बॉलीवूड अभिनेता सैफ अली खान याच्या घरी चोरट्याने शिरकाव करीत त्याच्यावर हल्ला केला. त्यामुळे सैफ अली खान गंभीररित्या जखमी झाला. या हल्ल्यात सैफचे प्राण अगदी थोडक्यात बचावल्याचे म्हटले जात आहे. या प्रकरणातील आरोपीला अखेर ठाण्यातून अटक करण्यात आली आहे.हा आरोपी बांगलादेशाचा नागरिक असल्याचे म्हटले जात आहे. या प्रकरणावरुन विरोधकांना मुंबईतील कायदा आणि सुव्यवस्था धोक्यात आल्याचे म्हटले आहे. यावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन दिवसीय अधिवेशनात अजितदादा पवार यांनी विरोधकांना सुनावले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन दिवसीय अधिवेशन शिर्डीत सुरु आहे. या अधिवेशनात राष्ट्रवादीचे नेते उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जोरदार भाषण केले. यावेळी ते म्हणाले की राजकारणात अनेकदा विरोधक कोणताही विषय न समजून घेता बेतालपणे आरोप करीत सुटतात याचा दाखला देताना अजित पवार म्हणाले की अजित पवार म्हणाले की बऱ्याचदा एखादी बातमी येते आणि त्याबाबतची माहिती पुरेसी नसते. पण विरोधक अलिकडे ठोकून बोलतात. सैफ अली खानच्या घरात एक चोरटा शिरला. त्याच्यावर हल्ला केला. त्याला जखम झाली. काहींनी तर स्टेटमेंट केली. मुंबईची कायदा आणि सुव्यवस्था ढासळली. आता एका घरात एक चोरटा शिरला तर लगेच कायदा सुव्यवस्था ढासळली? चोरी, हल्ला होता कामा नये. त्याचं मी समर्थन करत नाही. त्या चोरट्याचं समर्थन करत नाही असेही अजितदादा यावेळी म्हणाले.
तो पठ्ठ्या ठाण्यात सापडला..
ते पुढे म्हणाले की सैफ अली खान याच्यासाठी एवढी पोलिस यंत्रणा कामाला लागली आणि काल तो पठ्ठ्या ठाण्यात सापडला. त्यानं सर्व कबूल केलं. आठ महिन्यापूर्वी तो बांगलादेश सोडून कोलकात्याला गेला होला. तिथून त्यानं मुंबईचं बरंच ऐकलं होतं म्हणून जिवाची मुंबई करायला तो मुंबईत आला. त्यानं हाऊस किपिंगचं काम केलं. ज्या एजन्सीकडे काम केलं त्याने त्याचं आधारकार्ड पाहिलं नाही, कागदपत्रे तपासली नाही की कसलीही, शहानिशा केली नाही. त्यालाही उचललं. हा चोर इकडे-तिकडे फिरत होता. सर्व धागेदोरे हाती आले आहेत. आता सापडला आहे. कोणत्या नटाचं घर आहे की नटीचं आहे, हे त्याला माहीतही नव्हतं. त्याला कुणी तरी सांगितलं इथं श्रीमंत लोक राहतात. त्यामुळे तो तिथे गेला आणि डकमधून तो आत शिरला असे अजितदादा यावेळी म्हणाले.
विरोधक लगेच ईव्हीएम… ईव्हीएम करतात …
तुमच्या आणि माझ्या महाराष्ट्रातील कायदा सुव्यवस्था चांगली राहण्यासाठी महायुतीचे सरकार जाणीवपूर्वक काम करत आहे. विधानसभेचा निकाल लागल्यानंतर त्यांच्याकडे मुद्दाच राहिला नाही. जेव्हा आमचे १७ आणि त्यांचे ३१ निवडून आले तेव्हा आपण एकानेही ईव्हीएमवर खापर फोडलं नाही आम्ही ४८ हजार मतांनी पडलो हे माहीत होतं. मतदारांनी नाकारलं होतं. पण आपण ते आता दुरुस्त केलं. पण निकाल लागल्यावर विरोधकांनी ईव्हीएम…ईव्हीएम केलं. मारकडवाडीतही सर्व काही सांगितले. नवीन मुद्दा आला की ते लोक फेक नरेटिव्ह सातत्याने सादर करत असतात. आपण शिव, शाहू फुले विचारधारेचे होतो. कालही होतो, आजही आहे आणि यापुढेही राहू. त्यात तसूभर बदल होणार नाही. केजरीवालच्या बाजूने निकाल लागला तर काही बोलणार नाही. ममता बॅनर्जी यांच्या बाजूने निकाल लागला तर काही बोलत नाही. एखादं राज्य गेलं की लगेच ईव्हीएम ईव्हीएम करतात असा जोरदार हल्लाबोल अजितदादा यांनी यावेळी केला.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List