‘माय नेम इज जान’चा दिल्लीत सोलो म्यूजिकल प्ले; केंद्रीय मंत्री शेखावत म्हणाले, या नाटकाचे अनेक शो व्हायला हवे
भारताची ‘ग्रामोफोन गर्ल’च्या नावाने प्रसिद्ध असलेल्या गौहर जान यांच्या आयुष्यावर आधारीत सोलो म्युझिकल प्ले ‘My name is Jaan’चं शनिवारी दमदार आयोजन करण्यात आलं होतं. दिल्लीच्या मंडी हाऊसमधील श्रीराम सेंटरमध्ये या नाटकाचा शो पार पडला. या संगीतमय नाटकात प्रसिद्ध अभिनेत्री अर्पिता चटर्जी यांनी काम केलं आहे. अर्पिता यांनी आपल्या अत्यंत उत्कृष्ट अभिनयाने गौहर जान यांच्या आयुष्यातील ज्ञात-अज्ञात प्रसंग अत्यंत ताकदीने उभे केले.
या संगीत नाटकाच्या खेळाला केंद्रीय पर्यटन आणि सांस्कृतिक मंत्री गजेंद्र सिंह शेखावत आले होते. यावेळी त्यांनी या नाटकाचं तोंडभरून कौतुक केलं. गेल्या काही वर्षापासून आमच्या सरकारने हिंदुस्तानच्या कला णि संस्कृतिला प्रोत्साहन देण्यासाठी अनेक पावलं उचलली आहेत. त्याचे परिणामही दिसून येत आहेत. इतिहासातील एक अनोखं व्यक्तिमत्त्व असलेल्या गौहर जान यांचं आयुष्य आपल्या अभिनयातून जिवंत केल्याबद्दल मी अर्पिता चटर्जी यांचं मनापासून अभिनंदन करतो, असं गजेंद्र सिंह शेखावत म्हणाले.
या नाटकाचे असे असंख्य शो झाले पाहिजे. अर्पिता चटर्जी यांनी सादर केलेला सोलो परफॉर्मन्स भारतातील अभिजात कलावंत असलेल्या गौहर जान यांच्या जीवनावर आधारीत आहे. अर्पिता यांचा हा परफॉर्मन्स अत्यंत उत्कृष्ट श्रेणीतील आहे. मी त्यासाठी अर्पिता यांचं अभिनंदन करतो. तसेच त्यांच्या उज्ज्वल भविष्याची कामनाही करतो, असं शेखावत यांनी म्हटलं.
अवंतिका चक्रवर्ती यांचं दिग्दर्शन
या नाटकाचं दिग्दर्शन अवंतिका चक्रवर्ती यांनी केलं आहे. तर जॉय सरकार यांनी या नाटकाला संगीत दिलं आहे. हा शो पाहण्यासाठी बांगलादेशच्या निर्वासित लेखिका तस्लीमा नसरीन आल्या होत्या. त्यांनीही या नाटकाचं तोंडभरून कौतुक केलं. तसेच अर्पिता चटर्जी यांच्या दमदार अभिनयाचंही कौतुक केलं.
प्रेक्षकांकडून कौतुक
हे नाटक पाहण्यासाठी आलेल्या प्रेक्षकांनीही अर्पिता चटर्जी यांच्या दमदार आणि जिवंत अभिनयाचं तोंडभरून कौतुक केलं. काही सोशल मीडिया इनफ्लूएन्सर सुद्धा हा शो पाहण्यासाठी आले होते. त्यांनीही अर्पिता यांचा अभिनय अत्यंत उच्च श्रेणीतील असल्याचं सांगितलं. या नाटकाची निर्मिती स्टुडिओ 9ने केली आहे. या नाटकाचे देश आणि विदेशात असंख्य शो झाले आहेत.
आम्ही अर्पिता चटर्जी यांचा अभिनय पाहिला. अत्यंत उत्कृष्ट अभिनय त्यांनी या नाटकात केला आहे. नाटक पाहताना आम्ही गौहर जान यांनाच पाहतोय असा भास होत होता, इतक्या ताकदीने त्यांनी गौहर जान यांची व्यक्तिरेखा जिवंत केली आहे. या नाटकाची कथा काय असेल हे मला माहीत नव्हतं. पण त्या ज्या पद्धतीने सादरीकरण करत होत्या, ते सर्व लाजवाब होतं, असं एक सोशल मीडिया इनफ्लूएन्सर प्रगतीने सांगितलं. इतर प्रेक्षकांनीही आम्ही आज गौहर जान अनुभवल्या, अर्पिता चटर्जी यांचा अभिनय पाहून थक्क झालो, अशा प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List