आधी डोक्याला खाज, मग तीन दिवसाने टक्कल…बुलढाण्यात विचित्र आजाराने नागरिकांमध्ये घबराट
बुलढाण्यातून एक अनोखी घटना समोर आली आहे. बुलढाणा जिल्ह्यातील अनेक गावातील लोकांना अचानक जास्त केस गळण्याची समस्या वाढली. ही समस्या एवढी वाढली की,ही परिस्थिती टक्कल पर्यंत पोहोचली. या विचित्र आजाराने गावातील नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. याप्रकरणी आरोग्य पथक स्थानिक पाणीपुरवठ्याची चाचणी करत आहेत.
बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव तालुक्यातील पूर्णा नदीकाठच्या काही गावातील नागरिकांना ही समस्या जाणवायला लागली. यात अचानक डोके खाजवणे, त्यानंतर तीनच दिवसात डोक्यावरील सर्व केस गळून पडल्याने टक्कल पडणे. अशा विचित्र आजाराने त्रस्त झाले आहेत. या परिसरात आता भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. भोनगाव प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत येणाऱ्या कालवड येथे 13 लोकांना तर कठोरा येथील 07 लोकांना पूर्ण टक्कल पडल्याचे समोर आले आहे. मात्र कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. आरोग्य पथक गावात सर्वेक्षणाचे काम सुरू झाले आहे. या अचानक उद्भवलेल्या आजाराने मात्र या परिसरात भीतीच वातावरण उद्भवले आहे.
तक्रारी वाढल्यानंतर मंगळवारी आरोग्य विभागाच्या पथकाने गावागावात जाऊन सर्व्हेक्षण सुरु केले आहे. ज्यांचे केस गेले त्यांच्यावर उपचार सुरु करण्यात आल्याची माहिती शेगावच्या आरोग्य अधिकारी डॉ. दीपाली बाहेकर यांनी दिली. जिल्हा परिषदेच्या आरोग्य अधिकाऱ्याने सांगितले की, संभाव्य दूषितता तपासण्यासाठी या गावांतील पाण्याचे नमुनेही तपासणीसाठी पाठवले जात आहेत.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List