पालघरमध्ये वर्षभरात 14 मातांचा मृत्यू; आरोग्य यंत्रणा सलाईनवर
पालघर जिल्ह्याची निर्मिती होऊन दहा वर्षे उलटली तरी या भागातील रहिवाशांना अद्याप हक्काचे सिव्हिल हॉस्पिटल मिळू शकलेले नाही. या हॉस्पिटलचे काम अजूनही अपूर्ण असल्याने जव्हार, वाडा, मोखाडा, विक्रमगड या आदिवासीबहुल भागातील रुग्ण व नातेवाईकांना ठाणे, नाशिक, मुंबई आणि गुजरातमध्ये जाऊन उपचार घ्यावे लागत आहेत. जिल्ह्यात असलेल्या सरकारी आरोग्य केंद्रांमध्ये तज्ज्ञ डॉक्टर, नर्सेस तसेच कर्मचाऱ्यांची कमतरता असून अत्याधुनिक वैद्यकीय सुविधांचादेखील अभाव असल्याने हजारो रुग्णांचे प्रचंड हाल होत आहेत. त्यामुळे पालघरची आरोग्य यंत्रणा ‘सलाईन’वर असून गेल्या वर्षभरात 14 मातांना आपला जीव गमवावा लागला.
दरवर्षी आरोग्य यंत्रणेवर कोट्यवधी रुपयांचा खर्च करुनही पालघर जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्था अतिशय कुचकामी ठरल्याचे वारंवार दिसून आले आहे. रुग्णांना हॉस्पिटलमध्ये नेण्यासाठी डोंगराळ, दुर्गम भागात रस्तेच नसल्याने आतापर्यंत अनेक माता, भगिनींना आपला जीव गमवावा लागला. 31 डिसेंबर रोजी विक्रमगडच्या गालतरे गावातील कुंता फडवळे या गर्भवती महिलेचा तिच्या बाळासह मृत्यू झाला होता. तर 26 डिसेंबरला मोखाड्यातील आशा भुसारा या महिलेला अतिरक्तस्त्रावामुळे जीव गमवावा लागला.
पालघर जिल्ह्याची लोकसंख्या अंदाजे 32 लाखांवर गेली असून गेल्या दहा वर्षांपासून सरकारला सुसज्ज जिल्हा रुग्णालय उभारता आले नाही. नंडोरे येथे या रुग्णालयाचे काम 60 टक्के पूर्ण झाले असले तरी उर्वरित कामे रखडली आहेत. जव्हार उपजिल्हा रुग्णालयासाठी 94 कोटींचा निधी मंजूर आहे. पण 200 खाटांचे हे रुग्णालय अजूनही कागदावर असून मनोर येथील ट्रॉमा केअर सेंटरचे कामदेखील पूर्ण झालेले नाही. तर मोखाडा रुग्णालयाला 50 खाटांची मान्यता दिली असली तरी प्रत्यक्षात कोणत्याही सुविधा दिलेल्या नाहीत.
सरकारला जाग केव्हा येणार?
मोखाडा ग्रामीण रुग्णालयासाठी आवश्यक साधनसामग्री तसेच कर्मचाऱ्यांचा प्रस्ताव सरकारकडे पाठवला असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. रामदास मराड यांनी सांगितले. आतापर्यंत अनेक गर्भवती महिलांना वेळेवर उपचार न मिळाल्याने त्यांना खडतर प्रवासातच जीव गमवावा लागला. सरकारला जाग येणार तरी केव्हा, असा संतप्त सवाल मृत आशा भुसाराचे पती नंदकुमार भुसारा यांनी केला आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List