शरद पवार यांच्यासमोर लोटांगण घालून पाया पडणार; नरहरी झिरवाळ यांचं मोठं विधान
राज्याचे मंत्री नरहरी झिरवाळ हे अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत असले तरी त्यांची माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्यावरील निष्ठा काही कमी झालेली नाही. शरद पवार यांच्याबद्दलचा आदर ते वेळोवेळी बोलून दाखवत असतात. यावेळीही झिरवाळ यांनी शरद पवार यांच्याबद्दलचं विधान केलं आहे. बजरंगाच्या छातीत प्रभू राम दिसतील. तर माझ्या छातीत तुम्हाला शरद पवार साहेबच दिसतील, असं सांगतानाच आता शरद पवार यांच्यासमोर जाऊन लोटांगण घालून पाया पडणार, असं विधान नरहरी झिरवाळ यांनी केली आहे. मीडियाशी संवाद साधताना झिरवाळ यांनी हे विधान केलं आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मातोश्री यांनी पवार कुटुंब पुन्हा एकत्र आलं पाहिजे, असं साकडं पांडुरंगाला घातलं आहे. या पार्श्वभूमीवर नरहरी झिरवाळ बोलत होते. माझी मागणी एकच आहे. प्रत्येक माणूस तीच मागणी करतोय, विरोदक असो की राष्ट्रवादीचा कुणीही माणूस असो. सगळ्यांना वाटतंय की अजितदादा आणि शरद पवार साहेब एकत्र आले पाहिजे. राजकारणात काही गोष्ट घडून गेली. आम्ही पवार साहेबांना सोडून गेलो. मात्र लोकांनी आम्हाला निवडून दिलं, असं नरहरी झिरवाळ म्हणाले.
साहेबांसमोर लोटांगण घालणार
दोन्ही पवार एकत्र आले पाहिजे ही पांडुरंगाला विनंती करतो. मी पाडुंरंगाच्या शेजारी पवारसाहेबांना पाहतो. साहेब निश्चित विचार करतील. राजकारणात त्याचा वापरही केला गेला. पहाटे शपथ झाली तेव्हा मी दिल्लीला पळून गेल्याची माझ्यावर टीका झाली. बजरंगाच्या छातीत प्रभू राम दिसले होते. माझी छाती फाडली तर शरद पवार साहेबच दिसतील, असं सांगतानाच मी ज्या दिवशी अजितदादांसोबत गेलो, त्यानंतर शरद पवार यांच्यासमोर गेलो नाही. कोणत्या तोंडाने मी साहेबांपुढे जाऊ? मी साहेबांना प्रभू रामाच्या जवळचं स्थान देतो. प्रभू रामचंद्राच नाव घेऊन मी साहेबांना फसवलं. मला हा निर्णय घ्यायला भाग पडलं, याच मूल्यांकन मीच करू शकतो. आता पवारसाहेबांकडे जाऊन लोटांगण घालून पाया पडणार. आमच्या सारख्या अनेकांचं अवघड झालं आहे. साहेब विचार करतीलच ना?, असंही नरहरी झिरवाळ यांनी म्हटलंय.
मी खरंच नशीबवान
तुम्हाला उशीरा मंत्रिपद मिळालं का? असा सवाल यावेळी करण्यात आला. त्यावर उशिर कश्याला? शेवटी राज्य आहे. राज्यात अनेकांच्या अपेक्षा असतात. ज्याचा हात जगन्नाथ असतो. त्यांच्या हाताला यश मिळालं. मी खरंच नशीबवान आहे. उपाध्यक्ष, अध्यक्षपद मिळालं. उपाध्यक्ष कधी निवडून येत नाही म्हणायचे. पण मी निवडून आलो आहे, असंही त्यांनी सांगितलं. माझं खातं नवीन आहे, पण मी जुना आहे. मला सर्वांच्या आशीर्वादाची गरज आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List