हिंदुस्थानी नागरिकांच्या अमेरिकेतील नोकऱ्या संकटात, एलन मस्क म्हणाले, एच वन बी व्हिसा कार्यक्रमात सुधारणेची गरज
परदेशी कामगारांना दिला जाणारा एच वन बी व्हिसा ही मोडकळीस आलेली व्यवस्था असून त्यात मोठ्या प्रमाणावर सुधारणा करण्याची गरज असल्याचे टेस्लाचे मालक आणि अमेरिकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे सहकारी एलन मस्क यांनी म्हटले आहे. त्यामुळे हिंदुस्थानी नागरिकांच्या अमेरिकेतील नोकऱ्या संकटात आल्याचे चित्र आहे. एका पोस्टला उत्तर देताना मस्क यांनी आपले परखड मत व्यक्त केले. किमान वेतन वाढवून हा कार्यक्रम सुधारला पाहिजे असे मस्क यांनी म्हटले आहे. दरम्यान मस्क हे स्वतः एच वन बी व्हिसा प्रोग्रामद्वारे दक्षिण आफ्रिकेतून अमेरिकेत पोहोचले आहेत.
मस्क यांनी गेल्याच आठवड्यात एच वन बी व्हिसा कार्यक्रमाच्या समर्थनार्थ एक्सवर पोस्ट केली होती. यात त्यांनी एच वन व्हिसाच्या समर्थनार्थ युद्धात उतरण्याची शपथही घेतली होती. मस्क यांच्यासह हिंदुस्थानी वंशाचे विवेक रामास्वामी यांनीही अशी शपथ घेतली होती. ते ट्रम्प प्रशासनात सहभागी आहेत. दरम्यान, डोनाल्ड ट्रम्प यांनी एच वन बी व्हिसाबाबत आपली भूमिका बदलली असून मस्क यांच्या पोस्टनंतर ट्रम्पही व्हिसाच्या समर्थनार्थ पुढे आले. आतापर्यंत ते या कार्यक्रमाला विरोध करत होते.
आयटी, आर्किटेक्चर, आरोग्य व्यावसायिकांना मिळतो हा व्हिसा
आयटी व्यावसायिक, आर्किटेक्चर, आरोग्य व्यावसायिक यांना हा व्हिसा मिळतो. ज्या व्यावसायिकांना नोकरीची ऑफर दिली जाते त्यांनाचा हा व्हिसा मिळू शकतो. हे पूर्णपणे नियुक्ती करणाऱ्या कंपनीवर अवलंबून आहे. जर संबंधित कंपनीने तुम्हाला कामावरून काढून टाकले आणि दुसऱ्या कंपनीने तुम्हाला ऑफर दिली नाही तर व्हिसा संपुष्टात येऊ शकतो.
10 पैकी 7 एच वन बी व्हिसा केवळ हिंदुस्थानींना मिळतात
अमेरिका दरवर्षी 65 हजार लोकांना एच वन बी व्हिसा देते. त्याची कालमर्यादा 3 वर्षांची आहे. गरज भासल्यास ही कालमर्यादा आणखी 3 वर्षांसाठी वाढवता येते. हिंदुस्थानी लोकांना अमेरिकेत 10 पैकी 7 एच वन बी व्हिसा मिळतात. यानंतर चीन, कॅनडा आणि दक्षिण कोरियाचा क्रमांक लागतो.
एच वन व्हिसा म्हणजे काय?
एच वन बी हा नॉन इमिग्रंट व्हिसा आहे. अमेरिकन कंपन्यांना विशेष तांत्रिक कौशल्ये असलेल्या पदांसाठी परदेशी व्यावसायिकांना नियुक्त करण्याची परवानगी हा व्हिसा देतो. या व्हिसाच्या माध्यमातून तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्या हिंदुस्थान आणि चीनसारख्या देशांमधून दरवर्षी हजारो कामगारांची भरती करतात.
ट्रम्प म्हणाले होते माझा एच वन बी व्हिसावर विश्वास
28 डिसेंबर रोजी ट्रम्प यांनी न्यूयॉर्क टाईम्सशी बोलताना आपला या व्हिसाला पाठिंबा असल्याचे म्हटले होते. माझा एच वन बी व्हिसावर विश्वास आहे. माझ्या कंपन्यांमध्ये अनेक एच वन बी व्हिसा असलेले लोक आहेत. त्यांचा बऱ्याचदा मला फायदा झाला असून हा एक चांगला कार्यक्रम आहे, असे ट्रम्प म्हणाले होते.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List