‘फक्त वर्षभर डेटिंग अन् त्यानंतर..’; पत्नी शुरासाठी अरबाज खानची खास पोस्ट
अभिनेता अरबाज खानने गेल्या वर्षी मेकअप आर्टिस्ट शुरा खानशी लग्न केलं. 24 डिसेंबर 2023 रोजी बहीण अर्पिता खानच्या घरातच हा छोटेखानी समारंभ पार पडला होता. अरबाज आणि शुराच्या लग्नाला वर्ष पूर्ण झालं आहे. लग्नाच्या पहिल्या वाढदिवसानिमित्त अरबाजने पत्नीसोबतचे रोमँटिक फोटो पोस्ट करत प्रेम व्यक्त केलं आहे. ‘माझं प्रेम शुरा, तुला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छाच. आमच्या आयुष्यात तू जो आनंद, हास्य आणि सुख आणलंस, ते मी शब्दांत व्यक्त करू शकत नाही’, अशी पोस्ट अरबाजने लिहिली आहे. अरबाजचं हे दुसरं लग्न सोशल मीडियावर बरंच चर्चेत होतं. शिवाय या दोघांमधील वयाच्या अंतरानेही नेटकऱ्यांचं लक्ष वेधलं होतं. शुरा ही अरबाजची पत्नी नव्हे तर त्याची मुलगी वाटते, असेही कमेंट्स नेटकऱ्यांनी या दोघांच्या फोटो आणि व्हिडीओवर केले. मात्र या ट्रोलिंगला न जुमानता अरबाज आणि शुरा एकमेकांवर प्रेमाचा वर्षाव करताना दिसले.
‘फक्त एक वर्ष डेटिंग आणि लग्नानंतरच एक वर्ष.. तरीसुद्धा मी तुला खूप आधीपासूनच ओळखतो असं वाटतंय. तुझ्या नि:स्वार्थ प्रेमासाठी, पाठिंब्यासाठी आणि काळजीसाठी मी तुझे आभार मानते. मी खरंच खूप सुदैवी आहे’, असं अरबाजने त्याच्या पोस्टमध्ये लिहिलंय. अरबाज आणि शुरा हे दोघं ‘पटना शुक्ला’ या चित्रपटाच्या सेटवर पहिल्यांदा भेटले होते. त्यावेळी शुरा ही अभिनेत्री रवीना टंडनची मेकअप आर्टिस्ट होती, तर अरबाज चित्रपटाचा निर्माता होता.
शुरासोबत झालेल्या लग्नानंतर आयुष्यात झालेल्या बदलाविषयी अरबाज एका मुलाखतीत म्हणाला होता, “मी खूप खुश आहे. पत्नीला ओळखू लागल्यापासून मी खूप शांत आणि एकाग्र झालोय. शुराला डेट करत असल्यापासूनच माझ्या आयुष्यातील बऱ्याच गोष्टी सकारात्मकरित्या बदलल्या आहेत. लोकांना आमच्या लग्नाबद्दल आश्चर्य वाटू शकतं. पण आम्ही वर्षभर एकमेकांना डेट केलंय. आमच्या नात्याबद्दल आम्ही ठाम होतो.”
अरबाजने अभिनेत्री मलायका अरोराशी पहिलं लग्न केलं होतं. मात्र मार्च 2016 मध्ये त्यांनी घटस्फोट जाहीर केला आणि 11 मे 2017 रोजी दोघं अधिकृतरित्या विभक्त झाले. मलायका आणि अरबाजने लग्नाच्या 19 वर्षांनंतर घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला होता. या दोघांना अरहान हा मुलगा आहे. अरबाजची दुसरी पत्नी शुराचं अरहानसोबतही मैत्रीपूर्ण नातं निर्माण झाल्याचं अनेकदा पहायला मिळतं. सावत्र आईसोबत अरहान अनेकदा शॉपिंगला जाताना दिसतो.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List