अनुबंध – से गुडबाय टू…
>> सुजाता पेंडसे
‘वेळ सत्कारणी लावणे’ ही एक छान कल्पना आहे, परंतु काही माणसांना थोडाही वेळ निवांत रहावे असे वाटत नाही. सतत काही ना काही करणे, शिकणे आवडते. त्यासाठी ते धाव धाव धावतात. ‘एकच तर आयुष्य आहे. जेवढे शिकता येईल, कामात घालवता येईल, तेवढे करायचेच’ हा दृष्टिकोन कधी कधी अति होतो आणि मनाचे, शरीराचे स्वास्थ्य घालवतो. म्हणून स्वतला कधी कधी थोडी ढील द्या. रिलाक्सही व्हा. तरच आयुष्याचा आनंद घेता येईल.
आजचं आजूबाजूचं जग आपण पाहिलं तर सगळीकडे नुसती गर्दी आणि धावपळ सुरू असलेली दिसते. अवतीभवतीची माणसं कुठून कुठेतरी निघालेली दिसतात तीही धावपळीत. सगळीकडे एक अदृश्य ताण जाणवतो, तो स्पर्धेचा, घाईने कुठेतरी जाण्याचा, कुठे तरी पोहोचण्याचा. अर्थात, यातले बहुसंख्य लोक पोटापाण्याच्या उद्योगासाठीच बाहेर पडलेले दिसतात. घरातली जवळ जवळ प्रत्येक व्यक्ती अर्थार्जनासाठी बाहेर पडलेली दिसते. शक्य तेवढे पैसे मिळवून कुटुंबाची घडी बसवणं यासाठी सर्वांचा आटापिटा चालला आहे. त्यातही आहे तेवढय़ा पैशांत घरचा खर्च चालवणं शक्यही नाही, शिवाय कुणाला तरी ते आवडत नाही. त्यापेक्षा सर्वच जण पैसे कमवून घराचा आर्थिक स्तर, राहणीमान चांगले करण्याच्या नादात आहेत.
राहणीमानात सुधारणा करण्याच्या प्रयत्नात काही गैर आहे असे मुळीच नाही. परंतु एक गोष्ट सर्वांच्या लक्षात येतेय का, की जवळ जवळ प्रत्येक जण मल्टिटास्किंग करतो आहे. एकाच वेळेला अनेक व्यवधाने सांभाळायची तर त्यातून तणाव निर्माण होणं उघड आहे. बिझनेस, जॉब, घर यांसह इतर अनेक जबाबदाऱया अक्षरश शरीरावर, मनावर ताण निर्माण करताना दिसू लागल्यात. चाळिशीच्या आसपासची पिढी अनेक आजारांना तोंड देताना दिसू लागलीय. यासाठी एक गोष्ट करणं शिकायला हवं. ते म्हणजे ‘से गुडबाय टू मेन्टल स्ट्रेस!’ अनेक कामांचा, व्यवधानांचा एकाच वेळी निपटारा करणं, एकाच वेळी अनेक कामांना न्याय देण्याचा प्रयत्न करणं म्हणजेच मल्टिटास्किंग. जे आपल्यापैकी अनेक जण करतो आणि दिवसाच्या शेवटी अगदी थकून जातो. त्या सगळ्याचा परिणाम नकळतपणे शरीरांतर्गत अवयवांवर निश्चितपणे होतो. त्यातून चिडचिड, वैताग, नैराश्य येतं.
एक उदाहरण घेऊ या. पुण्यासारख्या ठिकाणी एका आयटी कंपनीत काम करणारी तरुणी. जिचं लग्न पंचविशीत झालं. लगेच मुलगा झाला. मूल लहान असल्याने तिने ‘वर्क फॉम होम’ पर्याय स्वीकारला. मुलगा तीन वर्षांचा झाला आणि तिने दुसरा चान्स घ्यायचं ठरवलं. खरं तर तिची स्वतची इच्छा नव्हतीच, परंतु एकाला दुसरं भावंड हवं म्हणून ती तयार झाली. नंतर त्यांना मुलगी झाली. आता ही मुलगी दोन वर्षांची, मुलगा पाच वर्षांचा झाला आणि या तरुणीला प्रमोशन मिळालं. पगारात भरभक्कम वाढ होत असल्याने तिने प्रमोशन स्वीकारलं. मग सुरू झाली प्रचंड धावपळ. एक तर नियमित ऑफिसला जायचा वेळ, यायचा वेळ दोन तास. कामाचे तास कमीत कमी 9 ते 10. शिवाय घरी आल्यावर अर्जन्ट एखादी मिटिंग असली की ती करायची. घरी दोन्ही मुलांची जबाबदारी घ्यायला सकाळी 9 ते रात्री 8 एक बाई ठेवलेली. स्वयंपाकाला वेगळी बाई. वर कामाला वेगळी. असा सगळा ताफा सांभाळायचा. त्यात मुलगा थोडा मोठा असल्याने त्याचं होमवर्क, प्रोजेक्टस् हे बघायचं. दोघांची भांडणं सोडवणं हेही एक कामच. शनिवार, रविवार सुट्टी. पण त्या दिवशी इतका कंटाळा यायचा तिला की, एकही काम न करता निवांत झोपावंसं वाटायचं. नवऱयाला काही सांगावं, तर तोही तिच्या इतकाच बिझी. या सगळ्याचा परिणाम म्हणून तिची इतकी चिडचिड व्हायची की, अनेकदा तिला रडू कोसळायचं. हे सगळं सोडून कुठेतरी निघून जावं असंही वाटायचं, पण तो नुसताच विचार. प्रत्यक्षातले प्रॉब्लेम्स संपतच नव्हते. एक दिवस ती तिच्या मैत्रिणीच्या सल्ल्याने कौन्सिलरला भेटली. त्यांना तिचे प्राब्लेम्स, निराशा, हताश होणं, कशातही इंटरेस्ट न वाटणं हे सगळं सांगितलं. त्यांनी तिला योग्य त्या पद्धतीने मार्गदर्शन केलं. काय करू नको यापेक्षा काय कर ते सांगितलं. ‘स्लो लिव्हिंग’ ही कन्सेप्ट समजावली आणि त्या तरुणीच्या डोक्यात गोंधळ माजून जो ताण निर्माण झाला होता, तो बऱयाच अंशी कमी झाला.
आज अनेक तरुण-तरुणी याच प्रकारच्या चक्रव्यूहात अडकले आहेत. नोकरी, घर, जबाबदाऱया याला चक्रव्यूह म्हणावं लागतं इतकं हे शेडय़ूल हेक्टिक झालेलं आहे. त्यामुळे स्वतला मेन्टली डिटॉक्स करण्यासाठी स्लो लिव्हिंगची संकल्पना जाणून घ्यायला हवी. स्लो लिव्हिंग म्हणजे अशी जीवनशैली जी थोडा विराम घेऊन स्वतच्या धावपळीच्या आयुष्याचं निरीक्षण करून आयुष्य साधं, सोपं करेल. क्वाँटिटीपेक्षा क्वालिटीला महत्त्व देऊन, जे आपल्याला खरंच आवडतं त्याला प्राधान्य देईल.
त्यासाठी सर्वप्रथम काय करायचं तर आपण दिवसभरात नेमकी कोणती कामं करतो हे आपल्याला ठाऊकच असतं. ही कामं करताना तुम्ही हाताने एक काम करत असता, पण तुमचं मन मात्र कुठेतरी दुसरीकडे असतं. हे मेन्टल मल्टिटास्किंग आहे ते लक्षपूर्वक कमी करायचं. जिथे तुम्ही जे करत आहात त्याचाच फक्त विचार करायचा. साधी गोष्ट घ्या. तुम्हाला आवडते तशी कॉफी तुम्ही पिण्यासाठी हातात घेतलीय. एक घोट घेतला की, तोवर दुसरंच काम आठवतं. गॅसवर काहीतरी ठेवलेलं असतं. मग एक कॉफीचा घोट, एकीकडे दुसरं काम असं लक्ष विभागलं जातं. ना कॉफीचा आनंद मिळतो, ना कामाचा.
दुसरी गोष्ट शिकायला हवी ती म्हणजे प्रत्येकाला ‘हो’ म्हणणं. कधी कधी तुमचं शेडय़ूल इतकं व्यग्र असतं की, दुसऱया कुणाचं काम करणं अशक्य असतं. अशा वेळी तुम्ही जर भिडेखातर ‘हो’ म्हणालात तर तुमची धावपळ आणि चिडचिड नक्कीच वाढते. त्यामुळे वेळीच नकार दिला तर तुमच्या कामाचा डोंगर वाढणं टाळता येतं. प्रत्येक काम परफेक्ट केलं जावं ही आदर्श संकल्पना आहे. काम चांगलं असावंच, पण त्यासाठी स्वतःला किती राबवावं याचाही विचार करायला हवा. परफेक्शनचा नको तितका आग्रह धरला तर तुम्ही सतत कामाच्या दुष्टचक्रात अडकून जाल, त्यातून तुम्हाला समाधान तर मिळणारच नाही, पण हवं तसं झालं नाही, ही टोचणी लागून राहील. ‘चांगलं करेन’ हा उद्देश असावा, आग्रह नसावा हे नक्की.
‘वेळ सत्कारणी लावणं’ ही एक छान कल्पना आहे, परंतु काही माणसांना थोडाही वेळ निवांत रहावं असं वाटत नाही. सतत काही ना काही करणं, शिकणं आवडतं. त्यासाठी ते धाव धाव धावतात. ‘एकच तर आयुष्य आहे. जेवढं शिकता येईल, कामात घालवता येईल, तेवढं करायचंच’ हा दृष्टिकोन कधी कधी अति होतो आणि मनाचं, शरीराचं स्वास्थ्य घालवतो. म्हणून स्वतला कधी कधी थोडी ढील द्या. रिलाक्सही करू द्या. तरच आयुष्याचा आनंद घेता येईल. काही लोकांना सतत असं काहीतरी करायचं असतं, जे इतरांपेक्षा वेगळं आणि आकर्षक वाटेल. कुणी तरी दखल घ्यावी, कौतुक करावं ही माणसाची मूलभूत गरज आहे. पण सतत त्यासाठी स्वतला जुंपणं मात्र गैरच. थोडक्यात काय तर दैनंदिन कामं करा, स्वतला सिद्ध करून दाखवा, परंतु त्यासाठी स्वत काय किंमत मोजतो आहोत हे सर्वात आधी बघा.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List