पारंपारिक विचारांची चौकट मोडून सिमरनने लिहीला नवा अध्याय, धारावीच्या गल्लीतून वाट काढत जपला क्रिकेटप्रेमाचा वारसा
आपल्या देशात क्रिकेटचे कोट्यवधी चाहते आहेत. मैदानावर खेळत असतात ते टीम इंडियाचे 11-12 खेळाडू पण स्टेडिअममध्ये बसून किंवा टीव्हच्या माध्यमातून कोट्यलधी लोक तो खेळ खेळत असतात. एखादा सामना जिंकला की चेहऱ्यावर हसू फुलतं पण तिथे पराभव झाला तर कित्येकांच्या डोळ्यात पाणी तरळतं, रात्री झोपही लागत नाही. अशा क्रिकेट वेड्यांच्या देशातच जन्माला आली ती सिमरन.. धारावीच्या सामान्य कुटुंबातून येऊन खडतर प्रवास करत पुढे आलेली 22 वर्षीय सिमरन सध्या नवोदित खेळाडूंमध्ये चर्चेचा विषय ठरली आहे.
रविवारी वुमन्स प्रीमियर लीग (डब्ल्यूपीएल) मध्ये झालेल्या लिलावात अहमदाबादच्या गुजरात जायंट्सने तब्बल 1.90 कोटी रुपयांची बोली लावून सिमरनला फलंदाज म्हणून संघात स्थान दिले. तेव्हापासून ती अचानक प्रकाशझोतात आली आहे. विविध कारणांसाठी जगभरात ओळखली जाणारी धारावी आता देशभरातील क्रिकेट पटलावरदेखील आपले वेगळे स्थान निर्माण करण्यासाठी सज्ज झाली आहे.
पारंपारिक विचारांची चौकट मोडून लिहीला नवा अध्याय
धारावीतील एका सामान्य कुटुंबातून क्रीडा क्षेत्रात पदार्पण करणाऱ्या सिमरनचा आजवरचा प्रवास खडतर होता. गल्ली क्रिकेट पासून डब्ल्यूपीएल पर्यंत मजल मारणाऱ्या सिमरनने पारंपारिक विचारांची चौकट मोडून धारावीतील महिला खेळाडूंसाठी एक नवा अध्याय लिहिला आहे. “अगदी लहान वयापासूनच सिमरन धारावीतील अरुंद गल्ल्यांमध्ये मुलांसोबत क्रिकेट खेळायला लागली. शाळेतून आल्यावर देखील बऱ्याचदा ती गल्लीतील मुलांबरोबर थेट मैदानावर क्रिकेट खेळायला जायची. क्रिकेट खेळताना तिच्याकडून इतरांच्या खिडक्यांच्या काचा देखील फुटल्या आहेत. हळूहळू या तक्रारींची संख्या वाढायला लागल्यावर मला काळजी वाटू लागली. पुढच्या वेळेस पुन्हा अशी तक्रार यायला नको, असं सिमरनला सांगतानाच मनातून मात्र तिच्या क्रिकेटबद्दलच्या प्रेमाचं कुतूहल वाटायचं. तेव्हापासून मी तिच्या पाठीशी ठामपणे उभं राहण्याचा निर्णय घेतला” अशा शब्दांत सिमरनचे बाबा जावेद शेख यांनी आठवणींना उजाळा दिला.
स्वप्नांना आई-वडिलांचा भक्कम पाठिंबा
रूढी- परंपरांना अधिक महत्त्व देणाऱ्या आपल्या देशात कुटुंबाच्या भक्कम पाठिंब्याशिवाय महिला खेळाडूंना करियर करणे, आव्हानात्मक असते. मात्र याबाबतीत सिमरन सुदैवी ठरली. कारण तिला केवळ वडिलांचाच नाही तर आई अखतारी शेख यांचाही पूर्ण पाठिंबा आहे.
“मुलींनी क्रिकेट खेळणं, ही बाब आमच्या समाजासाठी नवी आहे. समाज आणि शेजाऱ्यांकडून आमच्या मुलीकडे वेगळ्याच दृष्टिकोनातून पाहिलं जायचं. बऱ्याचदा आम्हाला लोकांच्या टिकेचाही सामना करावा लागला. आम्ही परंपरेला सोडून वागतोय, अशीही ओरड काही लोकांनी केली. पण आम्हाला केवळ आमच्या मुलीचं स्वप्न पूर्ण करायचं होतं. तिला नेहमीच क्रिकेट खेळायचं होतं आणि तिच्या आनंदासाठी तिने खेळत राहावं, हे आमचं मत होतं” असे अखतारी शेख म्हणाल्या.
इतरांसाठी मुलीचं मन का मोडायचं ?
इतरांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत सिमरनच्या पालकांनी तिच्या खेळावर लक्ष केंद्रित केले. “क्रिकेटसाठी सिमरन जी मेहनत घेत होती, ती आम्ही बघत होतो. अशा परिस्थितीत मुलीचं मन मारून आम्ही इतरांचं का ऐकायचं? ” असा सवालही जावेद यांनी उपस्थित केला. “धारावीतील बहुतांशी लोकांना लवकर उठण्याची सवय नाही. मात्र, सिमरनच्या क्रिकेटसाठी मी आणि माझ्या बायकोचा दिवस सकाळी 5 वाजता सुरू व्हायचा” असे ते म्हणाले.
सिमरनला क्रिकेटप्रेमाचा वारसा तिच्या वडिलांकडूनच मिळाला आहे. उमेदीच्या काळात स्थानिक स्पर्धांमध्ये जावेद शेख यांनी केलेल्या चमकदार खेळीमुळे त्यांना ‘धारावीचा जावेद मियांदाद’ अशी ओळख मिळाली होती. “क्रिकेटचा वारसा सिमरनने माझ्याकडूनच घेतला असावा. अल्लाहने आमच्या पदरात हिरा दिलाय. तो हिरा साऱ्या जगभरात चमकेल, याची मला खात्री आहे” अशा शब्दांत जावेद यांनी सिमरनच्या भविष्याबाबत विश्वास व्यक्त केला.
अनेक आर्थिक आणि सामाजिक आव्हानांना तोंड देत सिमरनच्या आई-वडिलांनी तिच्या क्रिकेटप्रेमाला नेहमीच प्रोत्साहन दिले. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही विचलित न होता यशाच्या दिशेने वाटचाल करण्याची सिमरनची ही कथा म्हणजे धारावीकरांच्या ऊर्जेचे प्रतीक आहे. अनेक संकटांवर मात करून इथवर पोहोचलेली सिमरन लवकरच इंडियन क्रिकेट टीमची जर्सी घालून नवा इतिहास घडवेल. भारतीय क्रिकेट संघात स्थान मिळावे, हे सिमरनचे केवळ स्वप्न नसून तिचं ध्येय आहे. आणि ती लवकरच हे ध्येय गाठेल, असा विश्वास तिच्या आई-वडिलांना आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List