संजय राऊतांच्या घराची रेकी करणारे ‘ते’ दोघे कोण? महत्त्वाची अपडेट समोर
शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांच्या घराची रेकी करण्यात आल्याचे प्रकरण नुकतंच समोर आले होते. या प्रकरणानंतर राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली होती. संजय राऊतांच्या घराबाहेर दहा मोबाईल कॅमेरे लावून शुक्रवारी सकाळी दहाच्या सुमारास ही रेकी करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला होता. हा घातपाताचा कट असल्याचा आरोप खुद्द संजय राऊतांनीही केला होता. यानंतर पोलीस आणि संरक्षण यंत्रणा अलर्ट झाली होती. आता संजय राऊतांच्या घराची रेकी नेमकी कोणी केली आणि कशासाठी केली होती, याची माहिती समोर आली आहे.
संजय राऊतांचे भाऊ आमदार सुनील राऊत यांनी काल त्यांच्या मैत्री बंगल्याची रेकी करण्याचा आल्याचा आरोप केला होता. शुक्रवारी सकाळी भांडुपमधील संजय राऊत यांच्या ‘मैत्री’ या बंगल्याची दोन मोटरसायकलवरून अज्ञातांनी संशयास्पदरित्या तपासणी केली होती. यानंतर पोलिसांनी या घटनेचा तपास सुरु केला. आता या प्रकरणी मुंबई पोलिसांनी मोठा खुलासा केला आहे. मुंबई पोलिसांनी याप्रकरणी एक पत्रक जारी केले आहे. त्यात त्यांनी सर्व माहिती दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या पत्रात काय?
संजय राऊत यांच्या घराबाहेर पाहाणी करणाऱ्या त्या चार व्यक्ती दुसऱ्या तिसऱ्या कोणी नसून मोबाईल नेटवर्क टेस्ट ड्रायव्ह करण्यासाठी आलेल्या असल्याचे पोलीस चौकशीत निष्पन्न झाले. मुंबई पोलिसांनी काल रात्री जारी केलेल्या आपल्या पत्रकामध्ये म्हटले की, “आज दिनांक २०/१२/२०२४ रोजी सकाळी ११.०० वाजताच्या सुमारास विक्रोळी विधानसभा मतदार संघाचे आमदार सुनिल राऊत यांचे स्वीय सहाय्यक हितेश पटेल यांनी फोनद्वारे कळविले की, आमदार सुनिल राऊत यांच्या मैत्री बंगल्यासमोर सकाळी ०९.१५ च्या सुमारास दोन संशयित इसम मोटार सायकलवर येऊन त्यांच्या घराची रेकी करुन निघून गेले आहेत. त्यांच्या तक्रारीवरुन मुंबई पोलिसांनी सदर घटनेची सखोल चौकशी केली. यामध्ये आढळलेले की, हे चार इसम सेलप्लॅन व इन्स्टा आयसीटी सोल्युशन या कंपनीचे कर्मचारी आहेत. ते ईरिक्सन कंपनीकडून जीओ मोबाईल नेटवर्कचे नेटवर्क टेस्ट ड्रायव्ह करीत असल्याचे निष्पन्न झाले असून, तशी संबंधीत कंपनीकडून खात्री करण्यात आली आहे.”
दरम्यान या घटनेवर प्रतिक्रिया देताना संजय राऊत यांनी आरोप केले होते. “भांडुपमधील त्यांचे निवासस्थानच नाही तर दिल्लीतील सामना कार्यालय आणि घरावरही पाळत ठेवण्यात आली होती. महाराष्ट्रात कायदा आणि सुव्यवस्था नाही. उद्धव ठाकरे यांनी पोलिसांशी संवाद साधला आहे. या प्रकरणाचा तपास सुरू आहे”, असा खळबळजनक आरोप संजय राऊतांनी केला होता.
संजय राऊत यांची सुरक्षा काढली
संजय राऊत यांना महाविकासआघाडी सरकार असताना वाय प्लस सुरक्षा होती. त्यानंतर महायुती सरकार आल्यावर ही सुरक्षा काढली. आता संजय राऊत यांना साधी सुरक्षा आहे. संजय राऊत यांनी सांगितले की, यापूर्वी मला धमकीचे फोन आले होते. तसेच रेकी करण्याची ही पहिलीच वेळ नव्हती. संजय राऊत यांचे बंधू सुनील राऊत म्हणाले, रेकी केली त्यावेळी घरात कोणीच नव्हते. परंतु रेकी करणारी दुचाकी ही उत्तर प्रदेश किंवा बिहारमधील असू शकते. तसे सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत असल्याचे त्यांनी सांगितले.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List