जगाचा निरोप घेताना ठेवल्या अवयवरुपी स्मृती; अपघातात मृत पावलेल्या प्रशिक्षणार्थी वैमानिक चेश्ताच्या अवयवांचे दान
घरातील अतिशय लाडकी कन्या म्हणून तिचं अस्तित्व होतं. ती धाडसी होती, त्यामुळेच ती वैमानिक होण्यासाठी बारामतीत आली होती. मात्र, उराशी बाळगलेले स्वप्न पूर्ण होण्याआधीच तिचं अपघातात निधन झालं; परंतु तिच्या स्मृती कायमस्वरूपी राहाव्यात म्हणून कुटुंबीयांनी तिचे अवयव दान करण्याचा निर्णय घेतला. आठ दिवसांची जगण्याची लढाई संपली तरी हृदय, डोळे, किडनी यांसह आठ अवयव दान करण्यात आले. कुटुंबीयांच्या या निर्णयाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
9 डिसेंबरच्या पहाटे तीनच्या दरम्यान बारामतीतील पायलट ट्रेनिंग संस्थेत शिकणारे कृष्णाशू मंगल सिंग, दक्षु विष्णू शर्मा, चेश्ता ज्योतीप्रकाश बिष्णोई व आदित्य जयदास कणसे हे चौघेजण उजनी पाणवट्यावर निघाले होते. कृष्णाशू हा गाडी चालवत होता. त्याच्या शेजारी दक्षु शर्मा, चेश्ता व आदित्य बसले होते. गाडी जैनकवाडी येथील घाटाच्या पहिल्या वळणावर आली, कृष्णाशू याचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि गाडी रस्त्याकडेच्या झाडाला धडकून लोखंडी पाईपलाईनवर उलटली.
गाडीचा वेग तब्बल 190 किलोमीटर ताशी असा होता, त्यामुळे हा अपघात एवढा भीषण होता की, गाडी तब्बल 140 फूट अंतरापर्यंत घासत गेली. यात आदित्य कणसे व दक्षू शर्मा हे दोघे जागीच मृत झाले. तर, चेश्ता व कृष्णांश ही जखमी झाले. चेश्ता गंभीर जखमी झाल्याने तिला पुण्यातील रुबी हॉल रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल केले होते. तिचा उपचारादरम्यान आठ दिवसांनंतर मंगळवारी (दि. 17) मृत्यू झाला. कृष्णाशू याची प्रकृती ठीक असून, त्याला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.
राजस्थानमधल्या ज्योतीप्रकाश बिश्नोई या व्यावसायिकाची चेश्ता ही कन्या होती. त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी मुलगी अशी दोन अपत्ये आहेत. त्यामध्ये चेश्ता ही त्यांची लाडकी होती. ती शिक्षणासाठी बारामतीत आली होती. अपघातात तिचा ब्रेन डेड झाल्याने उपचारास प्रतिसाद देत नसल्याने तिच्या अवयव दानाचा निर्णय घेतला. यामध्ये हृदय, किडनी डोळे व यांसह आठ अवयव दान करण्याचा निर्णय घेण्यात आला. मंगळवारी तिला सहकाऱ्यांनी जड अंतःकरणाने निरोप दिला. ती धाडसी होती व ती नेहमीच दुसऱ्यांना मदत करण्यासाठी अग्रेसर असल्याची भावना तिच्या सहकारी विद्यार्थ्यांनी व्यक्त केली.
आमच्या कुटुंबातील चेश्ता ही मुलगी धाडसी होती. तिचा इतरांना मदत करण्याचा स्वभाव होता. आमच्या तिच्या या स्वभावाचा आदर व्हावा म्हणून आम्ही कुटुंबीयांनी मृत्यूनंतर तिचे अवयव दान करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामूळे गरजूंना त्याचा फायदा होईल.
सुषमा बिश्नोई, मृत चेश्ताची आई
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List