बोगस औषधांचे लोण नांदेडातही, अॅमॉक्सिलीनच्या सवा लाख गोळ्या सील
रुग्णांच्या जिवाशी खेळ करणाऱ्या बोगस औषधीचे लोण नांदेडातही पोहोचले आहे. ऑण्टिबायोटिक म्हणून वापरण्यात येणाऱया अॅमॉक्सिलीनच्या सवा लाख गोळय़ांचा साठा जिल्हा शल्यचिकित्सकांनी सील केल्याने एकच खळबळ उडाली आहे. तत्कालीन आरोग्य मंत्री ‘हाफकिन’ फेम तानाजी सावंत यांच्या शिफारशीवरून या बोगस गोळ्यांची खरेदी करण्यात आली होती.
तत्कालीन आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी प्रचंड दबाव आणून आरोग्य विभागाला बोगस औषधी खरेदी करण्यास भाग पाडले होते. राज्यातील जवळपास 11 जिल्हय़ांमध्ये निष्कृष्ट गोळय़ा, औषधांचा पुरवठा करण्यात आला होता. उत्तराखंड, गुजरात, केरळ, आंध्रातील कंपन्यांना औषधी पुरवठयांचे कंत्राट देण्यात आले होते. बोगस औषधींचा प्रकार चव्हाट्यावर आल्याने या सर्व कंपन्यांची चौकशी करण्यात आली असता एकही कंपनी अस्तित्वात नसल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला.
नांदेड जिल्हय़ातही अॅमॉक्सिलीन या ऑण्टिबायोटिक गोळय़ांचा पुरवठा करण्यात आला होता. मात्र या गोळय़ांच्या संदर्भात तक्रारी आल्या. मुंबईत दोन वेगवेगळे गुन्हे दाखल झाले. त्यानंतर जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नीळपंठ भोसीकर यांनी आज अॅमॉक्सिलीनच्या गोळय़ांचा साठा सील केला. यासंदर्भातील अहवाल आरोग्य विभागाला पाठवण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.
षड्यंत्राचा तपास सुरू
राज्यभरात याबाबत कारवाई झाल्याने व या गोळय़ांची तपासणी अन्न व औषध प्रशासन विभागाने केल्याने त्याबाबतचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर जिल्हा रुग्णालयाने या गोळय़ांचे वाटप बंद करून एक लाख 28 हजार गोळय़ा सील केल्या आहेत. याबाबत वरिष्ठांच्या सूचनांचे वेळोवेळी पालन करून अन्य कोणत्या गोळय़ा आणखी आहेत का, याचीही तपासणी करण्यात येत आहे. वैद्यकीय यंत्रणांशी व आरोग्य विभागाशी याबाबत चर्चा करून ही कारवाई करण्यात आली आहे. बोगस औषधीचा साठा नेमका कुठून आला, यामागे कोणाचे षड्यंत्र आहे, याची तपासणी करण्यात येत आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List