आभाळमाया- तेजस्वी ‘फायरबॉल’

आभाळमाया- तेजस्वी ‘फायरबॉल’

या महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात म्हणजे 4 डिसेंबरच्या रात्री रशियातील युकुशिया भागातल्या लोकांना एका अवकाशी ‘चमत्कारा’चा ‘साक्षात्कार’ झाला. म्हणजे काय झालं तर पहाटे किंवा मध्यरात्री सव्वा वाजण्याच्या सुमारास एक अग्निगोलक विलक्षण वेगाने पृथ्वीकडे येताना दिसला. सायबेरियात, रशियाच्या अतिपूर्व भागातल्या युकुशियामध्ये विरळ लोकवस्ती आहे. त्यातच दिवस-रात्र थंडीच्या. त्यामुळे मध्यरात्री कितीसे लोक जागे असतील! परंतु या संभाव्य ‘फायरबॉल’चं भाकित 12 तास आधीच झालेलं असल्यामुळे लोक त्याच्या प्रतीक्षेत होते.

त्यांच्या मनात प्रचंड कुतुहलाबरोबरच धास्तीही होती. हा एक मीटर लांबीचा अशनी नेमका वस्तीवर कोसळला तर? कारण अशा गोष्टी रशियाने पूर्वीही अनुभवल्या आहेत आणि त्याची माहितीही तिथल्या लोकांना अभ्यासक्रमातून मिळते. या छोटय़ा अशनीचा क्रमांक काहीतरी सीओडब्ल्यूईपीटी-5 असा आहे. तो ‘डेटा’ अभ्यासकांसाठी महत्त्वाचा. जनसामान्यांनी मात्र त्या आगीनगोलकाचा थरार अनुभवला.

इथे एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी ती म्हणजे, पृथ्वीभोवतीच्या अवकाशात प्रचंड प्रमाणावर धुलीकण, लहान-मोठे दगडगोटे इतस्ततः भरकटत असतातच. त्यातले अनेक क्षणभर चमकून पृथ्वीवासीयांसाठी एक नेत्रसुखद अनुभव देत असतात. रोज साधारण किती उल्का पृथ्वीकडे येतात. माहितेय? त्यांची एक-दोन अशी मोजदाद शक्यच नाही, परंतु सर्व लहानमोठ्या उल्कांची गणती केली तर त्यांचं एकत्रित वजन 48.5 टन एवढं होईल! याचाच अर्थ पृथ्वीचं ‘वजन’ रोज (24 तासांत) अर्धा क्विंटल वाढतं!

या उल्का रात्री दिसतात. कारण सूर्यप्रकाश नसतो. दिवसाही त्या पृथ्वीकडे झेपावत असतात, पण सूर्यतेजामुळे दिसत नाहीत इतपंच. प्रश्न असा येतो की, दिवसा न दिसणारा अशनी अचानक कोसळला तर? शक्यता नाकारता येत नाही. मात्र आता ‘नीअर अर्थ ऑब्जेक्टस्’ किंवा पृथ्वीभोवतीच्या अंतराळातील, संभाव्य टक्कर होऊ शकणाऱ्या अशनींची नोंद असल्याने ती गोष्ट आधी समजू शकते. प्रचंड अशनी, पृथ्वीपासून दूरवर असतानाच त्याची दिशा वळवणंही शक्य होऊ शकेल असे प्रयोग यशस्वी झाले आहेत. मात्र अगदी लहान (1 मीटर ते 20 मीटर) अशनींना अथवा मोठ्या उल्कांना तसं वेगळं वळण देणं शक्य नसतं. हे अशनी, उल्का पृथ्वीभेटीला येतातच.

प्रत्येक दिवशी 24 तासांत जर 48 टन धूळ, दगड अवकाशातून येत असेल तर आपल्याला जाणवत कसं नाही याचं उत्तर म्हणजे पृथ्वीवरचा मानवी वस्तीचा भाग खूपच कमी आहे. 75 टक्के भाग समुद्र, जंगल आणि दुर्गम डोंगर यांनी व्यापलेला असल्याने आणि उरलेल्या 25 टक्क्यांतही वस्ती सर्वत्र सारखीच दाट नसल्याने उल्का कोसळल्याचं आणि त्यामुळे त्रास झाल्याचं फारक क्वचित घडतं.

असं एक जगप्रसिद्ध उदाहरण आहे अ‍ॅन होजेस यांचं. 1954 मध्ये अमेरिकेतील अ‍ॅलाबामा राज्यात सायलॅकॉगा इथे राहणाऱ्या अॅना यांच्या घरावर एक मोठी उल्का आदळली आणि छप्पर फाडून आत घुसली. त्या परिणामी अ‍ॅन यांना दुखापत तर झालीच, पण आकस्मिकपणे असं काही घडू शकतं ही भीती त्यांच्या मनात कायमची घर करून बसली. या उल्केला होजेस यांचंच नाव देण्यात आलं. 30 नोव्हेंबर 1954 या दिवशी जे घडलं ते अ‍ॅना यांना स्पष्ट आठवतं. ‘भर दुपारी दोन वाजताची घटना. मी दुपारची थोडी झोप किंवा वामकुक्षी घ्यावी म्हणून कोचावर पहुडले होते आणि तो प्रचंड दगड कडाड् आवाज करत छप्पर पह्डून घरात घुसला आणि रेडिओवर आपटून उसळी मारून माझ्याकडे आला.’

या 3 फुटी उल्केने अ‍ॅना यांचा डावा हात आणि पायाला मोठी जखम केली. 34 वर्षांच्या अ‍ॅनाची आईसुद्धा या वेळी घरात होती. तिला वाटलं की फायर-प्लेसची चिमणी (धुरांडं) कोसळलं असावं, पण मुलीची किंकाळी आणि घरभर झालेला धूर आणि धुळीत त्यांना काही समजेना. धूळ खाली बसल्यावर त्याना तो लहान ‘अशनी’ दिसला आणि त्यांनी पोलिसांना कळवलं. संध्याकाळी मिस्टर होजेस कामावरून घरी आले तोपर्यंत सावरलेल्या अ‍ॅना त्यांना म्हणाल्या, ‘आज जरा विचित्रच घडलं.’ त्या रात्री त्यांना (अर्थातच) झोप लागली नाही. नंतर तो दगड अवकाशातून आल्याचं प्रयोगशाळेत सिद्ध झालं. मानवी इतिहासात ज्ञात असलेली माणसाला उल्काघात झाल्याची ही पहिली नोंद!

हा ‘अशनी’ आपल्याकडेच राहावा अशी होजेस यांची इच्छा होती, पण घरमालक बर्डी यांनीही त्यावर दावा सांगितला. शेवटी 500 डॉलरवर तडजोड होऊन अ‍ॅन यांना तो दगड मिळाला. तो त्यांनी नंतर नवऱ्याच्या इच्छेनुसार अ‍ॅलाबामा नॅचरल हिस्टरी म्युझियमला 1956 मध्ये विकला! नंतर अ‍ॅन यांनी 1972 मध्ये वयाच्या अवघ्या 52 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला.

रशियातल्या 4 डिसेंबरच्या मीटरभर उल्केने पृथ्वीला धडक दिलीच नाही. अ‍ॅन होजेस वगळता, उल्का किंवा अशनीने माणसाला त्यापूर्वी इजा केल्याची ठाम माहिती नाही. 2013 मध्ये मात्र 20 मीटर आकाराच्या अशनी आघाताने रशियात उत्पात घडवला. त्याविषयी पुढच्या लेखात.

वैश्विक  

[email protected]

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

मोठी बातमी! धनंजय मुंडेंच्या अडचणी वाढणार? तो Video समोर, एका हातात पिस्तूल तर गाडीत… मोठी बातमी! धनंजय मुंडेंच्या अडचणी वाढणार? तो Video समोर, एका हातात पिस्तूल तर गाडीत…
मोठी बातमी समोर येत आहे. राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री धनंजय मुंडे यांच्या अडचणीत आता आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. सामाजिक...
अनेक विवाहित पुरुषांच्या प्रेमात, सौरव गांगुलीशी अफेअर; अन् अचानक बॉलिवूडमधून ही अभिनेत्री गायब
सलमान खानने सर्वांसमोर स्वत:ला चाबकाचे फटके मारले; सेटवरील सगळे पाहतच बसले
काँग्रेस ‘संविधान बचाओ पद यात्रा’ काढणार, CWC च्या बैठकीत कोणते प्रस्ताव झाले मंजूर? जाणून घ्या
माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांची प्रकृती खालावली, एम्समध्ये दाखल
सत्ताधाऱ्यांमुळे महात्मा गांधींचा वारसा धोक्यात, सोनिया गांधी यांची भाजपवर टीका
दैनिक सामना दिनदर्शिकेचे खासदार संजय राऊत यांचे हस्ते प्रकाशन