श्री स्वामी समर्थचा थरारक विजय; पाच-पाच चढायांच्या संघर्षात अमर हिंदवर मात आंबेकर स्मृती कबड्डी
शेवटच्या चढाईपर्यंत हृदयाचे ठोके चुकवणाऱ्या सामन्यात श्री स्वामी समर्थ संघाने पाच-पाच चढायांच्या संघर्षात अमर हिंद मंडळावर 8-4 अशी मात करत कामगार महर्षी गं.द. आंबेकर स्मृती कबड्डी महोत्सवाच्या महिला गटात थरारक विजयाची नोंद केली. तसेच महिला गटात जिजामाता, डॉ. शिरोडकर संघांनीही दणदणीत विजय मिळवले. पुरुषांच्या व्यावसायिक गटात गंधेकर इलेक्ट्रिकल, रुबी कन्स्ट्रक्शन यांनी विजयी सलामी दिली.
राष्ट्रीय मिल मजदूर संघाने (आरएमएमएस) कामगार महर्षी आंबेकरांच्या स्मृतीनिमित्त ना. म. जोशी मार्गावरील श्रमिक जिमखान्यावर सुरू असलेल्या कबड्डी महोत्सवात महिलांच्या गटातील अमर हिंद आणि श्री स्वामी समर्थ यांच्यातील संघर्ष चांगलाच रंगला. श्रद्धा कदम आणि सलोनी नाकती यांच्या चढायांनी अमर हिंदला आघाडी मिळवून दिली होती. मात्र साक्षी जंगम आणि अदिती काविलकरने खोलवर चढाया करत श्री स्वामी समर्थला मध्यंतराला 21-21 अशी बरोबरी साधून दिली. मग दुसऱया डावात दोन्ही संघांनी आघाडी घेण्यासाठी जोरदार संघर्षपूर्ण खेळाचे दर्शन घडवले, पण अखेर हा सामना अनेक चढउतारांनंतर 39-39 असा बरोबरीत सुटला. त्यानंतर पाच-पाच चढायांचा डाव खेळला गेल्या. ज्यात श्री स्वामी समर्थच्या चढाईपटूंनी सुसाट खेळ करत 8-4 अशी आघाडी घेत आपल्या सनसनाटी विजयावर शिक्कामोर्तब केले.
महिलांच्या दुसऱया सामन्यात जिजामाता स्पोर्ट्स क्लबने इशा शिंदे, नाहिदा शेख यांच्या खेळाच्या जोरावर हिरकणी संघावर 39-22 अशी सहज मात केली. मात्र जिजामाताला डॉ. शिरोडकर स्पोर्ट्स क्लबकडून 27-46 अशी मात खावी लागली. मेघा कदम, कशिश पाटील आणि श्रावणीच्या वेगवान खेळाने डॉ.शिरोडकरला सामन्याच्या प्रारंभापासून जी आघाडी मिळवून दिली ती शेवटपर्यंत कायम राखली आणि मोठा विजय मिळवून दिला.
पुरुषांच्या व्यावसायिक गटात रुबी कन्स्ट्रक्शनने सद्गुरू इंटरप्राइजेसचा 50- 17 असा धुव्वा उडवला तर गंधेकर इलेक्ट्रिकल्सने को ऑपरेटिव्ह बॅँक संघाचा 37-18 असा फडशा पाडला. पुरुषांच्या स्थानिक गटात विजय क्लबने अक्षय सोनी आणि विजय दिवेकरच्या पल्लेदार चढायांच्या बळावर अमर क्रीडा मंडळाचे आव्हान 45-14 असे सहजगत्या मोडून काढले. अंकुर स्पोर्ट्स क्लबने दुर्गामाता संघाचा 39-20 असा पराभव केला. अभिषेक भोसले आणि सौरभ दिवेकरच्या खेळाने अंकुरचा विजय सोप्पा केला.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List